सिंधू दुसऱ्या फेरीत, सेन, रुतुपर्णा-श्वेतपर्णा पहिल्याच फेरीत पराभूत
वृत्तसंस्था/ पॅरिस
भारताचा अव्वल बॅडमिंटनपटू लक्ष्य सेनला येथे सुरू असलेल्या बीडब्ल्यूएफ वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये एकेरीच्या पहिल्याच फेरीत पराभवाचा धक्का बसला. चीनच्या अग्रमानांकित शि यु कीविरुद्ध संघर्षानंतर पराभूत झाला. महिला एकेरीत भारताच्या पीव्ही सिंधूला विजयासाठी संघर्ष करावा लागला. तिने दुसरी फेरी गाठताना बल्गेरियाच्या कालोयाना नालबंटोव्हाचा पराभव केला.
मंगळवारी झालेल्या महिला एकेरीच्या सामन्यात जागतिक 15 व्या मानांकित पीव्ही सिंधूने नालबंटोव्हावर 23-21, 21-6 अशी मात केली. तिने अडखळत सुरुवात केली. पण लय मिळाल्यानंतर तिने वेग वाढवला आणि आक्रमक फटकेही लगावले. सुरुवातीला सिंधूने अनेक चुका केल्याने ती 0-4 अशी पिछाडीवर पडली होती. नालबंटोव्हाने ही आघाडी नंतर 9-5 अशी केली आणि ब्रेकला ती 11-7 अशी पुढे गेली. ब्रेकनंतर सिंधूला लय सापडली आणि स्मॅशेसचा भडिमार करीत 12-12 वर तिला गाठले. नालबंटोव्हाने नंतर दोनदा गेमपॉईंट मिळविले. पण त्याचा लाभ तिला घेता आला नाही. सिंधूने मिळालेल्या गेमपॉईंटवर हा गेम जिंकला. दुसऱ्या गेममध्ये सिंधूने पूर्ण वर्चस्व राखत 21-6 असा एकतर्फी जिंकत दुसरी फेरी गाठली.
सेनची झुंज
24 वर्षीय सेनने 2021 मध्ये झालेल्या स्पर्धेत कांस्यपदक जिंकले होते. पण यावेळी त्याला शि यु कीने 21-17, 21-19 असे 54 मिनिटांच्या खेळात हरविले. सेनने त्याला दीर्घ रॅलीजमध्ये गुंतवताना काही शानदार आक्रमक फटकेही मारले. पण महत्त्वाच्या क्षणी त्याच्याकडून चुका झाल्याने शि यु कीचा बचाव त्याला भेदता आला नाही. गेल्या वर्षीच्या ऑगस्टमध्ये पॅरिसमध्येच झालेल्या ऑलिम्पिकमध्ये स्पर्धेत सेनचे कांस्यपदक थोडक्यात हुकले होते. ती आठवण पुसून काढण्याच्या इराद्याने तो येथे उतरला होता. पण त्याला पहिल्याच सामन्यात शि यु कीसारख्या तगड्या प्रतिस्पर्ध्याशी मुकाबला करावा लागला. तरीही त्याने कठोर संघर्ष केला. पण अखेर त्याला पराभवाला सामोरे जावे लागले. शि यु कीने जानेवारी 2024 पासून शी यु कीने आतापर्यंत झालेले नऊही अंतिम सामने गमविलेले नाहीत. येथील सामन्यात त्याने पूर्ण नियंत्रण ठेवले होते. शि व सेन यांच्यात आतापर्यंत पाच लढती झाल्या असून त्यापैकी चार सामने शि यु कीने जिंकल्या आहेत.
येथील सामन्यात दोघांनीही शानदार सुरुवात केली. 47 फटक्यांची एक रॅली सेनला अंदाज चुकल्याने गमवावली लागली. यामुळे शि ने 3-2 अशी आघाडी घेतली. नंतर शि ने दोन जोरदार स्मॅशेस मारत सेनवर 10-6 अशी आघाडी घेतली. पण त्याच्याकडून झालेल्या काही चुकांचा लाभ घेत सेनने 11-11 वर त्याला गाठले. मात्र हा जोम सेनला पुढे चालू ठेवता आला नाही. स्मॅशेसची मालिका फटकावत शि ने 14-11 अशी आघाडी घेताना सेनच्या बॅकहँड कॉर्नरला टार्गेट केले. सेनने 14-16 अशी त्याचा आघाडी कमी केली. नंतर 52 फटक्यांची एक दीर्घ रॅली सेनने जिंकली. शि ने नंतर बॉडी स्मॅशेसच्या जोरावर 20-17 वर ती गेमपॉईंट्स मिळविले. सेनने लांबवर परतीचा फटका मारल्याने शि ने पहिला गेम जिंकला. दुसऱ्या गेममध्येही दोघांची 5-5 अशी बरोबरी झाली होती. शि ने वेग वाढवत स्लाईसेस व हाफ स्मॅशेसचा हुशारीने वापर करीत 14-9 अशी बढत घेतली. सेननेही जोरदार प्रतिकार करीत 10-15 वरून 16-17 अशी शि यु कीची आघाडी कमी केली. सेन हा गेम जिंकून निर्णायक गेमवर जाणार असे वाटत असतानाच त्याच्याकडून दोनदा अनियंत्रित चुका झाल्याने 19-16 अशी यु कीला बढत मिळाली. तरीही सेनने झुंज देत आणखी दोन गुण मिळविले. त्याच्याकडून सलग चुका झाल्याने त्याची झुंज अखेर अपयशी ठरली.
महिला दुहेरीच्या सामन्यात रुतुपर्णा व श्वेतपर्णा या पांडा भगिनींना पहिल्या फेरीत पराभवाला सामोरे जावे लागले. बल्गेरियाच्या गॅब्रिएला व स्टेफानी या स्टोएव्हा भगिनींनी त्यांना 21-12, 21-11 असे हरवित दुसरी फेरी गाठली.