सिंधू, लक्ष्य, त्रीसा-गायत्री विजेते
पुरुष दुहेरीत पृथ्वी कृष्णमूर्ती-साई प्रतीक, मिश्र दुहेरीत तनिशा क्रॅस्टो-ध्रुव कपिला उपविजेते
वृत्तसंस्था/ लखनौ
विश्व बॅडमिंटन फेडरेशनच्या रविवारी येथे झालेल्या सईद मोदी आंतरराष्ट्रीय 300 पुरुष आणि महिलांच्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या पीव्ही. सिंधू, लक्ष्य सेन यांनी आपल्या बऱ्याच दिवसातील जेतेपदाचा दुष्काळ संपुष्टात आणला. लक्ष्यने पुरुष एकेरीचे तर पीव्ही. सिंधूने महिला एकेरीचे अजिंक्यपद पटकाविले. या स्पर्धेत त्रीसा जॉली आणि गायत्री गोपिचंद यांनी महिला दुहेरीचे विजेतेपद मिळविले. पुरुष दुहेरीत भारताच्या पृथ्वी कृष्णमुर्ती रॉय आणि साईप्रतीक यांना तसेच मिश्र दुहेरीत तनिषा क्रॅस्टो आणि ध्रुव कपिला यांना उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. या स्पर्धेमध्ये भारतीय बॅडमिंटनपटूंनी आपले निर्विवाद वर्चस्व राखले.
महिला एकेरीच्या रविवारी झालेल्या अंतिम सामन्यात भारताच्या टॉप सिडेड आणि दोन वेळा ऑलिम्पिक पदक मिळविणाऱ्या पीव्ही. सिंधूने चीनच्या वु लुओ यु हिचा 21-14, 21-16 अशा सरळ गेम्समध्ये पराभव करत जेतेपद पटकाविले. सिंधूचे या स्पर्धेतील हे तिसरे विजतेपद आहे. सिंधूने यापूर्वी 2017 साली आणि 2022 साली ही स्पर्धा जिंकली होती. या अंतिम लढतीत पहिल्या गेममध्ये सिंधूने सुरुवातीला 8-5 अशी आघाडी लुओवर मिळवली. त्यानंतर सिंधूने आपल्या स्मॅश फटक्याच्या जोरावर ही आघाडी 11-9 पर्यंत वाढवली. आणि सिंधूने पहिला गेम 21-14 असा जिंकत आघाडी घेतली त्यानंतर दुसऱ्या गेममध्ये चीनच्या यु ने कडवी लढत दिली. यु ने तोडीस तोड खेळ करीत सिंधूशी 10-10 अशी बरोबरी साधली होती. पण सामन्याच्या उत्तरार्धात सिंधूने तिला वरचढ होऊ न देता आघाडी वाढविली आणि एका अप्रतिम स्मॅशवर हा गेम 21-16 असा जिंकून विजेतेपद पटकाविले. तब्बल दोन वर्षापूर्वी पीव्ही सिंधूने या स्पर्धेत विजेतेपद पटकाविले होते. त्यानंतर तिला आतापर्यंत विविध स्पर्धांमध्ये जेतेपदाची हुलकावणी मिळाली. सध्या महिला बॅडमिंटनपटूंच्या मानांकन यादीत सिंधू 18 बॅडमिंटन स्पर्धेत सिंधूने अंतिम फेरीपर्यंत मजल मारली होती.
लक्ष्य सेन विजेता
पुरुष एकेरीच्या अंतिम सामन्यात 2021 साली विश्व बॅडमिंटन चॅम्पियनशिप स्पर्धेत कांस्यपदक मिळविणाऱ्या लक्ष्य सेनने सिंगापूरच्या जिया हेंग जेसन तेहचा 21-6, 21-7 अशा सरळ गेम्समध्ये एकतर्फी पराभव करत विजेतेपद मिळविले. या अंतिम सामन्यात लक्ष्यने सुरुवातीपासून शेवटपर्यंत आपले वर्चस्व राखले होते. 23 वर्षीय लक्ष्य सेनने या अंतिम लढतीतील पहिल्या गेममध्ये 8-0 अशी आघाडी मिळविल्यानंतर त्याच्या प्रतिस्पर्ध्याला आपल्या फटक्यावर नियंत्रण राखता न आल्याने लक्ष्यने हा पहिला गेम 21-6 असा एकतर्फी जिंकला. दुसऱ्या गेममध्ये सिंगापूरच्या तेहने केवळ 7 गुण मिळविले. लक्ष्यने शेवटी क्रॉसकोर्ट फटक्यावर विजयी गुण नोंदवत जेतेपद पटकावले. लक्ष्य सेनला पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत कांस्यपदकाच्या लढतीत पराभव पत्करावा लागला होता. लक्ष्य सेन अलिकडच्या कालावधीतील हे पहिले विजेतेपद आहे.
त्रीसा-गायत्री विजेते
महिला दुहेरीच्या अंतिम सामन्यात त्रीसा जॉली आणि गायत्री गोपिचंद यांनी चीनच्या बाओ ली जिंग आणि ली क्युयान यांचा 21-18, 21-11 अशा सरळ गेम्समध्ये पराभव करत विजेतेपद पटकाविले. सुपर 300 दर्जाच्या बॅडमिंटन स्पर्धेतील त्रीसा आणि गायत्री यांचे हे पहिलेच जेतेपद आहे. या स्पर्धेत महिला दुहेरीचे जेतेपद मिळविणारी त्रीसा आणि गायत्री ही पहिली भारतीय महिला जोडी आहे. यापूर्वी या जोडीने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत कांस्यपदक मिळविले होते. तर 2022 साली झालेल्या सईद मोदी बॅडमिंटन स्पर्धेत उपविजेतेपद पटकाविले होते.
पृथ्वी-साईप्रतीक, तनिशा-ध्रुव उपविजेते
पुरुष दुहेरीच्या अंतिम सामन्यात चीनच्या हुआंग डी आणि लियु यांग यांनी भारताच्या पृथ्वी कृष्णमुर्ती रॉय आणि साईप्रतीक यांचा 21-14, 19-21, 21-17 अशा गेम्समध्ये पराभव करत जेतेपद पटकाविले. हा अंतिम सामना 71 मिनिटे चालला होता. या अंतिम लढतीत पृथ्वी आणि प्रतीक यांनी सलामीचा पहिला गेम गमविल्यानंतर त्यांनी दुसरा गेम 21-19 अशा फरकाने जिंकून बरोबरी साधली. पण तिसऱ्या आणि शेवटच्या गेममध्ये भारतीय जोडीला परतीचे फटके मारण्यात अपयश आल्याने त्यांना उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.
मिश्र दुहेरीच्या अंतिम सामन्यात थायलंडच्या सहाव्या मानांकित पी. देचपोल आणि पी. सुफिसेरा यांनी भारताच्या पाचव्या मानांकित तनिशा क्रॅस्टो आणि ध्रुव कपिला यांचा 18-21, 21-14, 21-8 अशा गेम्समध्ये पराभव करुन विजेतेपद पटकाविले.