सिंधू, लक्ष्य, क्रेस्टो-कपिला अंतिम फेरीत
वृत्तसंस्था/ लखनौ
2024 च्या बॅडमिंटन हंगामातील येथे सुरु झालेल्या विश्व बॅडमिंटन फेडरेशनच्या सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय सुपर 300 दर्जाच्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या पीव्ही. सिंधूने महिला एकेरीची अंतिम फेरी गाठली. तसेच मिश्र दुहेरीत भारताच्या तनिषा क्रेस्टो आणि ध्रुव कपिला यांनीही अंतिम फेरीत प्रवेश मिळविला आहे. त्याचप्रमाणे पुरुष एकेरीत भारताच्या लक्ष्य सेनने अंतिम फेरीत प्रवेश मिळविताना उपांत्य लढतीत जपानच्या ओगेवाचा पराभव केला.
शनिवारी झालेल्या महिला एकेरीच्या उपांत्य सामन्यात पीव्ही. सिंधूने आपल्या देशाच्या उनाती हुडाचा 21-12, 21-9 अशा सरळ गेम्समध्ये 36 मिनिटांच्या कालावधीत पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश मिळविला. थायलंडची चेवॉन आणि चीनची लुओ वु यांच्यात दुसरा उपांत्य फेरीचा सामना खेळविला जाणार असून या सामन्यातील विजयी खेळाडूबरोबर पीव्ही. सिंधूचा अंतिम सामना होईल.
मिश्र दुहेरीच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात तनिषा क्रेस्टो आणि ध्रुव कपिला यांनी चीनच्या झोयु आणि यांग या चौथ्या मानांकित जोडीचा 21-16, 21-15 अशा सरळ गेम्समध्ये पराभव करत अंतिम फेरी गाठली. हा उपांत्य फेरीचा सामना 42 मिनिटे चालला होता. महिला दुहेरीत भारताच्या त्रिशा जॉली आणि अश्विनी पोनाप्पा यांनीही यापूर्वी उपांत्य फेरी गाठली आहे. तसेच पुरुष दुहेरीत भारताचे पृथ्वी कृष्णमूर्ती रॉय आणि साई प्रतिक यांचा सामना इशान भटनागर आणि उदयकुमार यांच्याबरोबर होणार आहे.
पुरुष एकेरीच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात भारताच्या लक्ष्य सेनने जपानच्या शोगो ओगेवाचा 21-8, 21-14 अशा सरळ गेम्समध्ये पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश मिळविला. हा उपांत्य फेरीचा सामना 42 मिनिटे चालला होता.