सिंध होऊ शकतो भारताचा हिस्सा : राजनाथ सिंह
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
सिंध क्षेत्र आज भारताचा हिस्सा नाही, परंतु सीमा बदलून हे क्षेत्र पुन्हा भारताचा हिस्सा होऊ शकतो असे वक्तव्य संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी रविवारी एका कार्यक्रमादरम्यान म्हटले आहे. 1947 च्या फाळणीनंतर सिंध प्रांत पाकिस्तानात सामील करण्यात आला होता. यादरम्यान तेथे राहणारे सिंधी लोक भारतात आले होते.
सिंधी हिंदू खासकरून लालकृष्ण अडवाणी यांच्या पिढीच्या लोकांनी आजपर्यंत भारतापासून सिंध वेगळा होण्याची बाब स्वीकारलेली नाही. अडवाणी यांनी या गोष्टीचा उल्लेख स्वत:च्या पुस्तकातही केला आहे. केवळ सिंधमध्येच नव्हे तर पूर्ण भारतात हिंदूधर्मीय सिंधू नदीला पवित्र मानतात. सिंधमधील अनेक मुस्लीमही सिंधू नदीच्या जलाला पवित्र मानतात असे संरक्षणमंत्र्यांनी दिल्लीत सिंधी समाज संमेलनात बोलताना म्हटले आहे.
सध्या सिंध भारताचा हिस्सा नसलातरीही सांस्कृतिक स्वरुपात सिंध नेहमीच भारताचा हिस्सा राहिले. जोपर्यंत भूमीचा प्रश्न आहे, सीमा बदलू शकतात. भविष्यात सिंध पुन्हा भारतात सामील होऊ शकते. आमचे सिंधचे लोक जे सिंधू नदीला पवित्र मानतात, ते नेहमीच आमचे स्वकीय राहतील. ते कुठेही राहत असले तरी ते नेहमी आमचे असतील असे राजनाथ सिंह यांनी म्हटले आहे.
सिंध क्षेत्र सिंधी लोकांचे होमलँड म्हणून ओळखले जाते. हे क्षेत्र भारताच्या संस्कृतीचा एक महत्त्वाचा हिस्सा राहिले आहे. सिंधू खोरे संस्कृतीचे हे केंद्र देखील होते. 1947 मध्ये फाळणीसोबत हा भाग पाकिस्तानचा हिस्सा झाला होता असे उद्गार राजनाथ सिंह यांनी काढले होते.