महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

वेदांचे सार अचूक असल्याने वेदांना कोणतीही व्यथा जाणवली नाही

06:40 AM Jan 04, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

अध्याय एकोणतिसावा

Advertisement

नाथमहाराज म्हणाले, कृपाळूदेव श्रीकृष्ण त्यांच्या भक्तावर सदैव कृपा करत असतात. भगवंतांनी उद्धवाला दिलेल्या भक्तीसारामृतामुळे भगवंत आणि उद्धव ह्यांचा संवाद भक्तीसाराचे गुह्यज्ञान वर्णन करणारा झाला. ह्याचे श्रवण, मनन आणि निदिध्यास करून जो सेवन करेल त्याला भवबंधनाची भीती म्हणून राहणार नाही. जन्ममरण हे त्याच्या स्वप्नातसुद्धा येणार नाही. जो ह्या कथेवर पूर्ण श्रद्धा ठेऊन ह्या कथेचे अनुसंधान ठेवेल तो जगाचा उद्धार करेल. ज्याला ह्या कथेच्या श्रवणाची गोडी लागून तो सतत ही कथा कुठे ऐकायला मिळेल ह्या अनुसंधानात राहील आणि जमेल तितके तिचे श्रवण करेल त्यालाही भवबंधन लागू होणार नाही. ज्याला काही कारणाने कथेचे श्रवण करणे शक्य होणार नाही त्याने नुसते ह्या ग्रंथाचे वाचन केले तर तो जसजसा ह्यातील श्लोक वाचत जाईल तसतसे त्याच्या दु:खाचे आणि दोषाचे दहन होत जाईल. ज्याला श्रवण किंवा पठणही जमणारे नसेल त्याने ह्या कथेच्या निरुपणाच्या गोष्टी लक्षात ठेवल्या तरी तो ह्या सृष्टीतील देव आणि माणसांना वंद्य होईल. ह्या कथेवर ज्यांचे प्रेम जडेल किंवा ह्या कथेवरील प्रेमाने जे ह्या कथेचे भक्त होतील आणि ह्या कथेची संगती करू लागतील ते काळावरही मात करतील. काळावर मात म्हणजे त्यांच्या देहाला मृत्यू येणार नाही असे नाही पण देहाचे अस्तित्व तात्पुरते असून ते ज्या ब्रह्माचा अंश आहेत ते ब्रह्मतत्व अमर आहे हे त्यांच्या लक्षात आल्याने त्यांना मृत्यूचे भय उरणार नाही. त्यामुळे त्यांना यमराजरुपी काळसुद्धा वंदन करेल. माणसाला मृत्यूचे भय सगळ्यात जास्त वाटत असते परंतु ह्या कथेच्या श्रवणाने, वाचनाने, मननाने ज्यांची ह्या कथेवर संपूर्ण श्रद्धा बसेल त्यांचे काळाचे भय नष्ट होईल मग इतर गोष्टींची वाटणारी भीती त्यामानाने फार किरकोळ असल्याने तो त्यांच्यावर सहजी मात करेल आणि तो अभय होईल. गीतेमधील सोळाव्या अध्यायात दैवी संपत्तीबद्दल बोलताना भगवंत अभय हा पहिला गुण सांगतात कारण जो निर्भय असतो त्याला दैवी संपत्तीचे इतर पंचवीस गुण आपोआपच प्राप्त होतात. तसं बघितलं तर भगवंतांच्या सांगण्यानुसार मनुष्य जन्माला येताना दैवी संपत्ती घेऊनच आलेला असतो परंतु पुढे मोठा झाल्यावर त्याला स्वार्थ मोठा वाटू लागल्याने त्याच्यात आसुरी संपत्तीचे सोळा गुण चोरपावलांनी प्रवेश करतात पण जो मनुष्य भागवत कथा श्रद्धेने ऐकेल त्याच्यातले आसुरी गुण हळूहळू कमी होत जाऊन त्याच्यात मुळातच असलेले दैवी गुण प्रकट होत जातात. म्हणून नाथमहाराज पुढे म्हणतात, ह्या कथेवर ज्यांची पूर्ण श्रद्धा बसेल आणि त्या श्रद्धेपोटी जे ह्या कथेचे सेवन करतील, श्रवण, मनन करतील त्यांची श्रीकृष्णाशी जवळीक इतकी वाढेल की, त्यांना तो त्यांच्या नातेवाईकापैकीच एक आहे असे वाटू लागेल. भगवान श्रीकृष्ण एव्हढे कृपाळू आहेत की, जे सहज जाताजाता ह्यातल्या कथा ऐकतील आणि ज्यांना त्याबद्दल अतीव श्रद्धा वाटेल त्या प्रत्येकाच्या पोटात ते प्रकट होतात आणि त्यांचा भवपाश तोडून टाकतात. संसारभयाने त्रासून जाऊन जे श्रीकृष्णाला शरण जातात त्यांचे भवभय हरण करण्यासाठी श्रीकृष्णाने वेदार्थाचे मंथन करून त्यातील ज्ञानविज्ञानाचे सार काढले आहे. त्यांच्यापूर्वी असे सार काढण्याचा कित्येक ज्ञानी, विद्वानांनी प्रयत्न केला पण त्यांना ते शक्य न झाल्याने ते शिणून गेले. विद्वानांनी वेदांचे सार काढण्यासाठी जेव्हा प्रयत्न केले तेव्हा ईश्वराचे मनोगताचे त्यांना नीट आकलन न होऊ शकल्याने त्यांचे प्रयत्न फोल ठरले. त्यामुळे वेदांना अतिशय वाईट वाटले पण जेव्हा वेदांचा आदिकर्ता असलेल्या श्रीकृष्णाने वेदांचे सार काढले ते एकदम अचूक असल्याने वेदांना कोणतीही व्यथा जाणवली नाही.

Advertisement

क्रमश:

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article