For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सिल्वरवूड, जयवर्धने यांचा प्रशिक्षकपदाचा राजीनामा

06:00 AM Jun 28, 2024 IST | Tarun Bharat Portal
सिल्वरवूड  जयवर्धने यांचा प्रशिक्षकपदाचा राजीनामा
Advertisement

वृत्तसंस्था /कोलंबो

Advertisement

2024 च्या आयसीसी टी-20 विश्वचषक स्पर्धेत लंकन संघाला प्राथमिक फेरीतच स्पर्धेतून बाहेर पडावे लागल्याने या संघाचे प्रमुख प्रशिक्षक ख्रिस सिल्वरवूड आणि प्रशिक्षक सल्लागार महेला जयवर्धने यांनी आपल्या पदाचा राजीनामा लंकन क्रिकेट मंडळाकडे पाठविला आहे. सध्या विंडीजमध्ये सुरू असलेल्या आयसीसीच्या या स्पर्धेत लंकन संघाची कामगिरी दर्जेदार होऊ शकली नाही. प्राथमिक फेरीतच लंकेला दोन सामने गमवावे लागले तर एक सामना जिंकला आणि  पावसामुळे एक सामना रद्द झाला.

आयसीसीच्या या स्पर्धेतील लंकन संघाची ही सर्वात खराब कामगिरी असल्याने त्याची नैतिक जबाबदारी घेवून आपण प्रमुख प्रशिक्षक पदाचा राजीनामा देत असल्याचे सिल्वरवूडने वृत्त संस्थेशी बोलताना सांगितले. 2022 साली झालेल्या टी-20 आशिया चषक क्रिकेट स्पर्धेचे अजिंक्यपद लंकन संघाने पटकविले होते. तर गेल्या वर्षी झालेल्या आशिया चषक वनडे क्रिकेट स्पर्धेत लंकेने अंतिम फेरी गाठली होती. पण भारताकडून त्यांना हार पत्करावी लागली होती. लंकन संघाबरोबर ऑस्ट्रेलिया आणि बांगलादेश संघांच्या झालेल्या द्विपक्षीय वनडे आणि कसोटी मालिकेत लंकेने विजय मिळविला होता.

Advertisement

लंकन क्रिकेट संघाचे प्रशिक्षक सल्लागार महेला जयवर्धने यांनीही आपल्या पदचा राजीनामा दिला आहे. माजी कर्णधार आणि प्रमुख फलंदाज जयवर्धने यांच्याकडे लंकन क्रिकेट मंडळाने प्रशिक्षक सल्लागार पदाची जबाबदारी सोपविली होती. पण टी-20 विश्वचषक स्पर्धेत लंकन संघाकडून पूर्णपणे अपेक्षा भंग झाल्याने आपण खूपच निराश झालो, असे जयवर्धनेने वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले. आता पुढील महिन्यात लंका आणि भारत यांच्यात वनडे मालिका खेळविली जाणार असून या मालिकेपूर्वी लंकन क्रिकेट मंडळाने नव्या प्रशिक्षकाची नियुक्ती करण्यासाठी त्वरीत शोधमोहीम हाती घेण्याचे ठरविले आहे.

Advertisement
Tags :

.