For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

दक्षिण आफ्रिका पुन्हा चोकर्सच

06:58 AM Jun 30, 2024 IST | Tarun Bharat Portal
दक्षिण आफ्रिका पुन्हा चोकर्सच
Advertisement

विश्वचषकाच्या अंतिम लढतीत 7 धावांनी पराभूत : टीम इंडियाचे चौथे विजेतेपद 

Advertisement

वृत्तसंस्था/ ब्रिजटाऊन, वेस्ट इंडिज

सूर्यकुमार यादवने अखेरच्या षटकात पकडलेल्या डेव्हिड मिलरच्या झेलच्या जोरावर भारताने टी 20 वर्ल्ड कप जिंकला. मिलर हा भारताच्या विजयातील मोठा अडसर होता. पण हार्दिकच्या गोलंदाजीवर तो बाद झाला आणि भारताच्या बाजूने सामना झुकला. भारताने यावेळी 13 वर्षांच्या आयसीसी ट्रॉफीचा दुष्काळ संपवला. भारताने यापूर्वी 2011 साली वर्ल्ड कप जिंकला होता. प्रारंभी, विराट कोहलीच्या अर्धशतकाच्या जोरावर भारताने 176 धावांपर्यंत मजल मारली होती. भारताने गोलंदाजीची दमदार सुरुवात करत दक्षिण आफ्रिकेची 2 बाद 12 अशी अवस्था केली होती. पण त्यानंतर दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांनी दमदार फलंदाजी करत विजयाच्या आशा पल्लवित केल्या. पण अखेरच्या षटकात जेव्हा मिलर बाद झाला, त्यानंतर भारताने 7 धावांनी हा सामना जिंकला.

Advertisement

टीम इंडियाने विजयासाठी दिलेल्या 177 धावांचा पाठलाग करताना आफ्रिकेची सुरुवात खराब झाली. बुमराहने आपल्या पहिल्याच षटकात भारताला यश मिळवून दिले. बुमराहने यावेळी सलामीवीर रीझा हेंड्रिक्सला चार धावांवर बाद केले. त्यानंतर अर्शदीप सिंगने आफ्रिकन कर्णधार एडन मार्करमला बाद करत भारताला मोठे यश मिळवून दिले. यावेळी दक्षिण आफ्रिकेची 2 बाद 12 अशी अवस्था झाली होती. पण त्यानंतर स्टब्स आणि डिकॉक यांनी आफ्रिकेच्या डावाला आकार दिला. दोघांनी चौफेर फटकेबाजी करत धावसंख्या वाढवली. अक्षर पटेलने स्टब्सचा अडथळा दूर केला. स्टब्जने 31 धावा केल्या. स्टब्ज बाद झाल्यानंतर क्लासेनने डिकॉकच्या साथीने धावसंख्या वेगानं वाढवली. क्लासाने आणि डी कॉक यांनी वादळी फलंदाजी करत सामना फिरवला. क्लासेनने 27 चेंडूमध्ये 52 धावांची खेळी केली. डिकॉकने 31 चेंडूत 39 धावा जोडल्या. मिलरने 21 धावांचे योगदान दिले. अखेरच्या 24 चेंडूत आफ्रिकेला 26 धावांची गरज होती. यावेळी बुमराह, हार्दिक व अर्शदीप यांनी शानदार गोलंदाजी केली व टीम इंडियाला 7 धावांनी विजय मिळवून दिला. आफ्रिकन संघाला 8 बाद 169 धावापर्यंत मजल मारता आली.

 

टीम इंडिया अजिंक्य

ब्रिजटाऊन येथील केन्सिंग्टन ओव्हल मैदानावर भारताने नाणेफेक जिंकून आधी फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र भारताची अपेक्षेप्रमाणे सुरुवात झाली नाही. ऑस्ट्रेलिया व इंग्लंडविरुद्ध धमाकेदार खेळी साकारल्यानंतर या सामन्यातही रोहितकडून शानदार खेळीची अपेक्षा होती. रोहितने सुरुवातही तशी केली पण केशव महाराजच्या एका चेंडूवर तो फसला व 9 धावांवर स्वस्तात बाद झाला. त्यानंतर ऋषभ पंत मैदानात आला, पण त्यानेही निराशा केली. तो फक्त दोन चेंडू खेळू शकला. त्याला एकही धाव करता आली नाही. दोन गडी बाद झाले तेव्हा भारताच्या अवघ्या 23 धावा होत्या. त्यामुळे सूर्यकुमार यादव भारताचा डाव सांभाळेल अशी आशा होती. पण तोही फक्त तीनच धावा करु शकला. त्यानंतर मात्र विराट आणि अक्षर पटेल यांच्या जोडीने नेत्रदीपक कामगिरी करत भारताला सावरले.

विराटची शानदार अर्धशतकी खेळी, अक्षरचाही जलवा

विश्वचषकाच्या फायनलमध्ये विराटने 76 धावांची खेळी करत भारतीय संघाच्या धावसंख्येत मोलाचा वाटा उचलला. सुरुवातीला लागोपाठ विकेट पडल्यानंतर विराट कोहलीने संयमी फलंदाजी केली. त्यानं एकेरी दुहेरी धावसंख्या काढत डावाला आकार दिला. अक्षर पटेलसोबत आधी निर्णायक 72 धावांची भागिदारी केली. त्यानंतर अखेरच्या षटकात शिवम दुबे याच्यासोबत अर्धशतकी भागिदारी केली. अर्धशतक ठोकण्यासाठी विराट कोहलीने 48 चेंडू घेतले, पण त्यानंतर चौकार षटकारांचा पाऊस पाडला. विराटने 59 चेंडूमध्ये दोन षटकार आणि सहा चौकारांच्या मदतीने 76 धावा फटकावल्या.

अक्षर पटेलने 31 चेंडूमध्ये 47 धावांची खेळी साकारत विराटला चांगली साथ दिली. अक्षरने आपल्या खेळीत  खेळीला एक चौकार आणि चार षटकार लगावले. अक्षरच्या आक्रमक खेळीमुळे टीम इंडियाची धावसंख्या झटपट वाढली. अक्षरचे अर्धशतक मात्र तीन धावांनी हुकले. अक्षर बाद झाल्यानंतर शिवम दुबेने आक्रमक फलंदाजी करत 16 चेंडूत 3 चौकार व 1 षटकारासह 27 धावा केल्या. दुबेच्या फटकेबाजीमुळे टीम इंडियाने पावणेदोनशेचा टप्पा पार केला. हार्दिक पंड्या 5 धावांवर नाबाद राहिला. भारतीय संघाने 20 षटकांत 7 बाद 176 धावा केल्या.

संक्षिप्त धावफलक

भारत 20 षटकात 7 बाद 176 (रोहित शर्मा 9, विराट कोहली 59 चेंडूत 6 चौकार व 2 षटकारासह 76, रिषभ पंत 0, सुर्यकुमार यादव 3, अक्षर पटेल 31 चेंडूत 1 चौकार व 4 षटकारासह 47, शिवम दुबे 27, हार्दिक पंड्या नाबाद 5, जडेजा 2, केशव महाराज व नोर्तजे प्रत्येकी दोन बळी, यान्सेन व रबाडा प्रत्येकी 1 बळी).

दक्षिण आफ्रिका 20 षटकांत 8 बाद 169 (रिझा हेंड्रिक्स 8, डिकॉक 39, स्टब्ज 31, हेन्रिक क्लासेन 27 चेंडूत 52, डेव्हिड मिलर 17 चेंडूत 21, अर्शदीप सिंग व जसप्रीत बुमराह प्रत्येकी दोन बळी, हार्दिक पंड्या 20 धावांत 3 बळी)

 विराटच फायनलचा किंग

जेव्हा जेव्हा विश्वचषक फायनलसारखे दबावाचे सामना असतात, तेव्हा विराट कोहली टीम इंडियाचा तारणहार म्हणून समोर येतो. यंदाच्या वर्ल्डकप फायनलमध्येही कोहलीने आपल्या शानदार खेळीसह सर्व टीकाकारांची तोंडं बंद केली.  कोहलीने आतापर्यंत 7 डावात केवळ 75 धावा केल्या होत्या, मात्र आता आफ्रिकेविरुद्धच्या विजेतेपदाच्या लढतीत त्याने 59 चेंडूत 76 धावांची खेळी करत भारताला संकटातून सोडवले. यंदाच्या विश्वचषक स्पर्धेत कर्णधार रोहित शर्माने सुरुवातीपासूनच त्याच्यावर विश्वास दाखवला, तो आज किंग कोहलीने सार्थ ठरवला.

विराट टी 20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा दुसरा खेळाडू

विराट कोहलीने द. आफ्रिकेविरुद्ध अंतिम सामन्यात अर्धशतकी खेळीसह बाबर आझमचा विक्रम मोडला आणि तो टी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत दुसऱ्या स्थानावर पोहोचला.

टी-20 मध्ये सर्वाधिक धावा करणारे टॉप 3 फलंदाज

रोहित शर्मा - 4231 धावा

विराट कोहली - 4188 धावा

बाबर आझम - 4145 धावा

विजेत्या, उपविजेत्या संघावर पैशांचा पाऊस

टी-20 विश्वचषक ट्रॉफी जिंकणाऱ्या भारतीय संघाला बक्षीस म्हणून 2.45 मिलियन अमेरिकन डॉलर्स म्हणजे भारतीय चलनात अंदाजे 20.4 कोटी रुपये दिले जातील. उपविजेत्या आफ्रिका संघाला 1.28 मिलियन अमेरिकन डॉलर्स म्हणजेच 10.6 कोटी रुपये दिले जाणार आहेत. याशिवाय, उपांत्य फेरीत पराभूत झालेल्या इंग्लंड व अफगाणिस्तान संघांना प्रत्येकी 6.54 कोटी रुपये देण्यात येतील. तसेच सुपर 8 फेरी गाठणाऱ्या संघाचा देखील आयसीसीकडून गौरव करण्यात येणार आहे. सुपर 8 फेरी गाठणाऱ्या प्रत्येक संघाला 3.17 कोटी मिळणार आहेत.

सात महिन्यात दुसरी वर्ल्डकप फायनल

भारतीय संघाचा 19 नोव्हेंबर 2023 रोजी अहमदाबादच्या मैदानावर एकदिवसीय क्रिकेट वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यात पराभव झाला होता. एकही सामना पराभूत न होता अंतिम सामन्यापर्यंत पोहोचलेल्या रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील संघाला अंतिम सामन्यातच पराभवाला सामोरे जावे लागले होते. आता, सात महिन्यानंतर भारतीय संघाने एकही सामना न गमावता टी 20 वर्ल्डकपच्या फायनलमध्ये धडक मारली. यानंतर 29 जून रोजी टीम इंडियाने आफ्रिकेला पराभूत करत वर्ल्डकप जिंकण्याची किमया केली आहे. विशेष म्हणजे, सात महिन्यातच टीम इंडियाने वर्ल्डकप फायनल जिंकत मागील पराभवाचे उट्टे काढले आहेत, याशिवाय, 13 वर्षापासूनचा आयसीसी ट्रॉफी न जिंकण्याचा दुष्काळ देखील संपुष्टात आणला आहे.

Advertisement
Tags :

.