विवानला रौप्य, नरुकाला कांस्य
नवी दिल्ली : येथे सुरू असलेल्या आयएसएसएफच्या विश्वचषक फायनल नेमबाजी चॅम्पियनशीप स्पर्धेत भारताचा नेमबाजा विवान कपूरने रौप्य पदक तर अनंतजीत सिंग नरुका यांनी कास्य पदक पटकाविले. या स्पर्धेत गुरुवारअखेर भारताने एकूण 4 पदकांची कमाई केली आहे. पुरुषांच्या ट्रॅप नेमबाजीत अंतिम सुवर्ण पदकाच्या लढतीत चीनच्या यांग क्विने सुवर्णपदक पटकाविले. तर भारताच्या विवान कपूरने 44 शॉटस् अचूक नोंदवित रौप्य पदक पटकाविले. पात्र फेरीमध्ये विवानने 125 पैकी 120 गुण नोंदवित अंतिम फेरीत प्रवेश मिळविला होता. या क्रीडा प्रकारात राजस्थानच्या 26 वर्षीय नेरुकाने 43 शॉटस् नोंदवित कास्यपदक मिळविले. महिलांच्या 10 मी. एअर रायफल नेमबाजी स्पर्धेत मंगळवारी भारताच्या सोनम मस्करने रौप्य पदक तर पुरुषांच्या 15 मी. रायफल-3 पोझीशन नेमबाजी प्रकारात अखिल शेरॉनने बुधवारी कास्यपद मिळविले होते.