तुलसीमथीला रौप्य तर मनिषाला कांस्य
पॅराबॅडमिंटनपटूंचा धमाका : स्पर्धेच्या पाचव्या दिवशी पदकांचा पाऊस
वृत्तसंस्था/ पॅरिस
भारताने सोमवारी एकाच दिवशी बॅडमिंटनमध्ये सुवर्ण, रौप्य आणि कांस्यपदकाची कमाई केल्याचे पाहायला मिळाले. सोमवारी दुपारी नितेश कुमारने सुवर्णपदकाला गवसणी घातली. यानंतर भारताच्या तुलसीमथीने रौप्यपदकाची कमाई केली, याचबरोबर रामदास मनीषाने कांस्यपदक पटकावले. यामुळे भारताला बॅडमिंटनमध्ये एकाच दिवशी तिन्ही पदकांची कमाई करता आली. याशिवाय, बॅडमिंटनमध्ये तीन पदकांचा निकाल बाकी आहे.
सोमवारी सकाळच्या सत्रात नितेश कुमारने धमाका केल्यानंतर दुपारच्या सत्रात महिलांच्या अंतिम लढतीत तुलसीमथनी मुरुगेशनला रौप्यपदक मिळाले. भारताची मुरुगेशन ही अंतिम फेरीत पोहोचली होती. पण अंतिम फेरीत तिला चीनच्या यांग हिच्याकडून पराभव पत्करावा लागला. चीनच्या यांगने मुरुगेशनला 21-17, 21-10 असे पराभूत केले. यामुळे यांगला सुवर्णपदक जिंकता आले, तर मुरुगेशनला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. संपूर्ण स्पर्धेत शानदार खेळ साकारणाऱ्या मुरुगेशनकडून अंतिम लढतीत काही चुका झाल्या, याचा तिला फटका बसला.
मनीषा रामदासला कांस्य
दुसरीकडे, मुरुगेशनपाठोपाठ मनीषाने डेन्मार्कच्या कॅथेरीनवर 21-12, 21-8 असा सहज विजय मिळवत कांस्यपदक आपल्या नावावर केले. मनीषाने या सामन्यात सुरेख खेळ साकारला, याचा तिला फायदा झाला. दरम्यान, स्पर्धेत बॅडमिंटनमधील तीन पदकांचे सामने बाकी आहेत. यामध्ये एक सुवर्ण व दोन कांस्यपदक मिळण्याची शक्यता आहे.