लग्नपत्रिकेत चांदीचे देवघर, सोन्याचे देव
जगप्रसिद्ध भारतीय उद्योगपती मुकेश अंबानी यांचे पुत्र अनंत यांचा राधिका मर्चंट यांच्याशी लवकरच विवाह होणार आहे. या विवाहाची वृत्ते सध्या वृत्तपत्रे आणि प्रसारमाध्यमांमधून अनेकदा प्रसिद्ध होत आहेत. हे विवाहकार्य ‘समर्था’घरचे आहे. त्यामुळे त्याचा दिमाख अतिभव्यच असणार यात शंका नाही. याच विवाहाच्या पत्रिकेची चर्चा सध्या मोठ्या प्रमाणात होत आहे. अलिकडच्या काळात मोठ्या बहुढंगी आणि महागड्या विवाहपत्रिका बनविण्याची पद्धत आहे. पण अंबानींच्या घरातील या विवाहाची पत्रिका या सर्वांवर कडी करणारी आहे.
ही विवाहपत्रिका एखाद्या अलमारीच्या स्वरुपातील आहे. कपाट उघडल्यानंतर आपल्याला वेगवेगळे भाग दिसतात. तसे या पत्रिकेत आहेत. या पत्रिकेत एक चांदीचे मंदीर आहे. या मंदिरात भगवान गणपती, राधा-कृष्ण आणि दुर्गादेवीच्या सोन्याच्या मूर्ती आहेत. मंदिराच्या छताल घंटाही टांगलेल्या आहेत. शुद्ध चांदीपासून बनविलेल्या या मंदिरावर सुरेख नक्षीकामही केलेले दिसून येते. तसेच, भगवान नारायणासह एक चांदीचे आमंत्रण पत्र यात आहे. भगवान नारायण अनंत अंबानी यांना आशीर्वाद देत आहेत, असे दृष्य या चांदीच्या पत्रावर आहे. लाल रंगाच्या आतील भागात वधू-वर यांची माहिती आणि मूहूर्त, विवाहस्थळ आदी आशय आहे. खालच्या भागात आमंत्रितांसाठी देण्यात आलेल्या भेटवस्तू आहेत. या भेटवस्तूंमध्ये चांदीचा डबा, प्रार्थनेसाठी चटई आणि दुपट्टा इत्यादी साधने आहेत.
हीच पत्रिका अनंत अंबानी यांच्या माता नीता अंबानी यांनी काशी विश्वेश्वराला अर्पण करुन त्यांनाही विवाहाचे आमंत्रण दिले आहे. त्यासाठी त्या आवर्जून काशी विश्वेश्वराच्या दर्शनासाठी गेल्या होत्या. त्यानंतरच या अद्भूत विवाह पत्रिकेची चर्चा सर्वत्र होऊ लागली आहे. अनेक धनवान व्यक्तींनी त्यांच्या घरच्या विवाहकार्यासाठी महागड्या पत्रिका आजवर बनविल्या आहेत. तथापि, या पत्रिकेची रचना मात्र, खरोखरच कल्पनातीत अशी आहे, असे अनेकांचे म्हणणे आहे. हा विवाह 12 जुलैला होणार आहे, अशी माहिती देण्यात आली आहे.