नेमबाज खंडेलवालला रौप्यपदक
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
येथे सुरू असलेल्या विश्वचषक पॅरा नेमबाजी स्पर्धेत तिसऱ्या दिवशी भारताने 1 रौप्य आणि 1 कास्य अशी दोन पदकांची कमाई केली. मिश्र 50 मि. पिस्तूल नेमबाजी (एसएच 1) प्रकारामध्ये भारताच्या रुद्रांश खंडेलवालने रौप्यपदक तर निहाल सिंगने कास्यपदक मिळविले.
खंडेलवाल आणि निहाल हे भारताचे पॅरा नेमबाज अलिकडच्या कांही आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सातत्याने चांगली कामगिरी करत आहेत. त्याचप्रमाणे टोकिओ पॅरा ऑलिंपिक स्पर्धेतील रौप्यपदक विजेता नेमबाज सिंगराजने मिश्र 50 मि. पिस्तूल सांघिक (एसएच 1) प्रकारात रौप्यपदक पटकाविले. खंडेलवालने 223.2 गुणांसह रौप्यपदक तर इटलीच्या डेव्हिड फ्रान्सेटीने 230 गुणांसह सुवर्णपदक मिळविले. निहाल सिंगने या क्रीडाप्रकारात 202.8 गुणांसह कास्यपदक घेतले. मिश्र सांघिक 50 मि. पिस्तूल नेमबाजी (एसएच 1) प्रकारात भारताच्या खंडेलवाल, निहाल आणि सिंगराज यांनी 1573 गुण नोंदवित रौप्यपदक घेतले. या क्रीडाप्रकारात चीनने 1611 गुणांसह सुवर्णपदक मिळविले. या स्पर्धेमध्ये आतापर्यंत भारताची नेमबाज मोना अगरवालने एकमेव सुवर्णपदक मिळविले आहे.