Kolhapur News : अंबप येथे बाळासाहेब माने व तात्यासाहेब कोरे पुण्यतिथीनिमित्त भव्य मॅरेथॉन
अंबप मॅरेथॉन स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद
अंबप : माजी खासदार कै. बाळासाहेब माने व सहकारमहर्षी कै. तात्यासाहेब कोरे यांच्या पुण्यतिथीनिमित्त अंबप येथे आयोजित भव्य मॅरेथॉन स्पर्धा उत्साहात पार पडली. या स्पर्धेत प्रदेश खुल्या पुरुष गटातून वारणानगरच्या अनिकेत शिंगाडे यांनी प्रथम क्रमांक पटकावला, तर महिला गटातून कोल्हापूरच्या स्नेहल खरात यांनी बाजी मारली.
ही स्पर्धा बाळासाहेब माने शिक्षण प्रसारक मंडळ व जनता कुक्कुटपालन व पशुखाद्य निर्मिती संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आली होती. विजेत्यांना आमदार विनय कोरे यांच्या हस्ते पारितोषिकांचे वितरण करण्यात आले.
यावेळी आमदार अशोकराव माने, जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुमित कदम, जिल्हा बँकेचे संचालक विजयसिंह माने (अध्यक्षस्थानी) यांची प्रमुख उपस्थिती होती.
आमदार विनय कोरे यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, “दरवर्षी सातत्याने असे उपक्रम राबवून कै. बाळासाहेब माने व कै. तात्यासाहेब कोरे यांच्या कार्यातून प्रेरणा देण्याचे काम अंबप येथील माने कुटुंबीय करत आहेत. त्यांच्या माध्यमातून शेकडो विद्यार्थी घडले आहेत.”
अध्यक्षीय भाषणात विजयसिंह माने म्हणाले, “आठवडाभर चाललेल्या विविध स्पर्धांना कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.”
यावेळी राजेंद्र माने, रवींद्र जाधव, शरद बेनाडे, प्रसाद पाटील, डी. के. माने, डी. वाय. पाटील, ए. बी. पाटील, विश्वनाथ पाटील, संतोष उंडे, पंढरीनाथ गायकवाड, उपसरपंच आशिफ मुल्ला आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संभाजी पाटील यांनी केले, तर विनायक गुरूव यांनी आभार मानले.