For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

राष्ट्रवादीची पंचविशी...

06:37 AM Jun 12, 2024 IST | Tarun Bharat Portal
राष्ट्रवादीची पंचविशी
Advertisement

जयपराजयाचे पडलेले प्रतिबिंब पाहता यंदाचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा  रौप्यमहोत्सवी वर्धापनदिन काहीसा वेगळाच ठरावा. पक्षाच्या ऐन पंचविशीतील दुफळी, तऊण तुर्कांचा स्वतंत्र होण्याचा निर्णय, जुन्या जाणत्या नेतृत्वाचा राखीव डाव अन् त्यातून अधोरेखित झालेले वेळेचे अचूक भान यामुळे एक वर्तुळ पूर्ण झाले. मात्र, या सगळ्या राजकीय झटापटीत अर्थात निवडणुकीच्या लढाईत या वयातही शरद पवार हे दादांपेक्षा कितीतरी सरस आहेत, हेच ठळकपणे सिद्ध झाले आहे. 1999 मध्ये काँग्रेसमधून शरद पवार यांनी राष्ट्रवादीची मुहूर्तमेढ रोवली. तेव्हापासून आजपर्यंतचा राष्ट्रवादीचा प्रवास हा चढउताराचा राहिला आहे. असे असले, तरी या अडीच दशकांच्या प्रवासात राष्ट्रवादीने महाराष्ट्रात आपला प्रभाव कायम ठेवल्याचे दिसून येते. तथापि, अजिदादांनी राष्ट्रवादीत अभूतपूर्व फूट घडवली नि सगळी समीकरणेच बदलली. या फुटीनंतर वास्तविक पक्षाच्या अस्तित्वाबद्दलचा प्रश्न निर्माण झाला होता. पवारांचा अनुभव गाढा असला, तरी एकूणच दादांचा महाराष्ट्राच्या राजकारणावरील प्रभाव, तऊण नेतृत्वाचा त्यांच्याकडे असलेला कल पाहता जनमानस कुणाकडे वळणार, याबाबत मतमतांतरे व्यक्त होत होती. प्रत्यक्षात वय, अनुभव, बेरजेचे राजकारण, रणनीती अशा सगळ्याच बाबतीत आपण आपल्या पुतण्याच्या कैक पट पुढे आहेत, हे पवार यांनी या निवडणुकीतून सप्रमाण दाखवून दिले. राष्ट्रवादीतील फुटीनंतर जवळपास सगळेच नेते दादांच्या वळचणीला गेले होते. त्यामुळे खरेतर लोकसभेत कुणाला उमेदवारी द्यायची, असा प्रश्न पवारांपुढे होता. परंतु, महाराष्ट्राचा सखोल अभ्यास असलेल्या पवार यांनी विचारपूर्वक उमेदवार निवडले व नेमक्या जागा लढवून 80 च्या स्ट्राईक रेटने त्या निवडूनही आणल्या. हे त्यांच्या तेजतर्रार व तल्लख राजकारणाचेच गमक म्हणावे लागेल. लोकसभेत ठाकरे सेनेने 21, काँग्रेसने 17 जागा लढविल्या. तर पवार यांनी केवळ 10 जागा लढविणे पसंत केले. तथापि, दहापैकी दहा जागा कशा जिंकता येतील, यावर पवार यांनी फोकस केला. यातील बारामतीशिवाय माढा, शिरूर, नगर, भिवंडी, वर्धा, बीड, दिंडोरी अशा आठ जागा पवारांच्या राष्ट्रवादीने जिंकल्या. केवळ सातारा व रावेरची जागा त्यांना गमवावी लागली. यातली सातारची जागा थोडक्यात गेली, असे म्हणावे लागेल. पवारांना महाराष्ट्राची नस अन् नस माहीत आहे. कधी, कुठे केव्हा कोणता पॅक्टर चालेल, कुठली निवडणूक कशी फिरवायची, कुठे शांत रहायचे, कुठे नेमका संदेश द्यायचा, हे जाणणारा त्यांच्याइतका मुरब्बी राजकारणी महाराष्ट्रात दुसरा नाही. तसे दादांनी त्यांच्याकडूनच राजकारणाचे धडे घेतले. पण, दादा त्यांच्याकडून फार काही शिकले, असे म्हणणे धारिष्ट्याचे ठरेल. तसे त्यांचे राजकारण हे बरेचसे दादागिरीच्या वळणाने जाणारे. अति फटकळपणा, तुसडेपणा ही त्यांचे स्वभाववैशिष्ट्यो. त्याला शिस्तबद्धता, प्रशासकीय कमांड, परखडपणाचे कोंदण लाभले असेलही. पण, शेवटी नम्रता, सुसंस्कृतपणा, आपुलकी या गोष्टीही महत्त्वाच्या असतात. त्यामुळे दादांना अनुयायी तर भरपूर मिळाले. पण, पवारांसारखे अजोड कार्यकर्ते मिळविता आले नाहीत. त्यामुळे ढीगभर नेते असूनही दादांची डाळ लोकसभेत शिजू शकली नाही. वर्धापनदिनाच्या कार्यक्रमात दादा काहीसे भावूक झालेले दिसले. शरद पवार यांनी राष्ट्रवादीला दिलेल्या नेतृत्वाबद्दलही त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. पण, आपण पक्षाला नेतृत्व देण्यास तितके सक्षम आहोत का, याचेही दादांनी एकदा आत्मपरीक्षण केले पाहिजे. लोकसभेला अपयश आले असले, तरी खचून जाऊ नका. नव्या जोमाने कामाला लागा, असे आवाहन दादांनी कार्यकर्त्यांना केले आहे. कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण करण्याचा दादांचा हा प्रयत्न समयोचितच ठरावा. तसा कुठलाही नेता एका निवडणुकीतून संपत नसतो. हे उदाहरण दादांनाही लागू होते. परंतु, त्यांच्यापुढे विधानसभेचे आव्हान आणखी कठीण असेल, हे त्यांनी ध्यानात घेतले पाहिजे. मंत्रिमंडळ विस्तारात दादांच्या पक्षाला स्थान देण्यात आलेले नाही. लोकसभेत अवघ्या चार जागा मिळालेल्या दादांच्या पक्षाला विधानसभेतही फार जागा मिळतील, असे मानायचे कारण नाही. इतकेच नव्हे, तर विधानसभेपर्यंत महायुतीत त्यांचा पक्ष असेल का, असाही प्रश्न निर्माण होतो. हे पाहता त्यांची पुढची वाटचाल ही नक्कीच अवघड वळणाची असू शकते. याउलट लोकसभेतील विजयाने  आत्मविश्वास दुणावलेली शरद पवारांची राष्ट्रवादी फ्रेश मूडमध्ये दिसत आहे. पक्षाच्या वर्धापनदिनाच्या कार्यक्रमातील वातावरण बरेच काही सांगून जाते. निवडून आलेल्या खासदारांचा पवार यांनी अष्टप्रधान मंडळ असा केलेला उल्लेख, जायंट किलर लंकेंची बॅटिंग बरेच काही सांगून जाते. मागच्या काही दिवसांत कार्याध्यक्ष सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाचीही राष्ट्रवादीत सहजगत्या ऊजवात झाल्याचे पहायला मिळते. या पार्श्वभूमीवर घड्याळापेक्षा तुतारी हाती घेणे अधिक सोयीचे असल्याचा संदेश जाणे, दादांकरिता अडचणीचे ठरावे. दुसरीकडे लोकसभा निवडणुकीतील पराभवाच्या धक्क्यातून अजितदादा सावरले नसतानाच बारामतीत आमदार बदलण्याच्या चर्चेने जोर धरला आहे. बारामतीचा दादा बदला, अशी थेट मागणी येथील नागरिकांनी शरद पवार यांच्याकडे केली आहे. त्याचबरोबर संभाव्य उमेदवार म्हणून युगेंद्र पवार यांचेही नाव पुढे केल्याचे दिसते. त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीत शरद पवार बारामतीत दादांच्याच पुतण्याला त्यांच्याविरोधात उतरवणार का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. लोकसभा निवडणुकीत आमदार रोहित पवार, श्रीनिवास पवार, सुनंदा पवार, शर्मिला पवार, युगेंद्र पवार यांच्यासह संपूर्ण पवार पॅमिलीने चांगलाच जोर लावला होता. त्याची फलश्रुती काय, याचा निकाल सर्वांसमोर आहे. आता दादांना त्यांच्या गृहभूमीतूनच आव्हान मिळाले, तर आश्चर्य वाटून घेण्याचे कारण नाही. 1991 पासून बारामतीत दादांचा प्रभाव आहे. मागच्या निवडणुकीत तर दादा 1 लाख 65 हजारांच्या मताधिक्याने निवडून आले होते. परंतु, ज्येष्ठश्रेष्ठ दादांना युगेंद्र यांच्या ऊपाने त्यांच्याच घरातून आव्हान मिळाले, तर काका पुतण्यामधील दुसरी लढाईदेखील अटळ असेल.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :

.