तुषार भेकणेला ॲथलेटिक्समध्ये रौप्य
वार्ताहर/हिंडलगा
बिहार ॲथलेटिक्स असोसिएशनतर्फे आयोजित पाटणा येथे 28 ते 30 सप्टेंबर रोजी झालेल्या चौथ्या इंडियन ओपन यु-23 ॲथलेटिक्स स्पर्धेमध्ये भरतेश महाविद्यालयाचा विद्यार्थी व मण्णूर गावचा उदयोन्मुख धावपटू तुषार भेकणे याने 800 मीटर धावण्याच्या स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळवून रौप्यपदक पटकावले आहे. तुषारने म्हैसूर येथे झालेल्या कर्नाटक राज्य आंतर जिल्हा ज्युनियर आणि 23 वर्षांखालील ॲथलेटिक्स स्पर्धेत 800 मीटर धावणेत 1 मिनिट 49.71 सेकंदात अंतर कापत प्रथम क्रमांक पटकावून राज्यात नवीन विक्रम प्रस्थापित केला आहे. त्यामुळे त्याची बिहारमधील पाटणा येथे होणाऱ्या राष्ट्रीय ॲथलेटिक स्पर्धेसाठी निवड झाली होती. त्यानंतर सोमवारी (दि. 30) झालेल्या स्पर्धेत त्याने द्वितीय क्रमांक पटकावला. तर राजस्थानचा धावपटू शकील याने प्रथम आणि कर्नाटकच्या लोकेश के. याने तृतीय क्रमांक पटकावला. तुषारच्या या यशाबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे. त्याला स्टँडर्ड ट्रॅक स्पोर्ट्स बेळगावचे प्रशिक्षक प्रदीप जुवेकर, खेलो इंडिया बेंगळूरचे प्रशिक्षक वसंत यांचे मार्गदर्शन लाभत आहे. तर वडील मार्कंडेय सोसायटीचे सेक्रेटरी वसंत भेकणे यांचे प्रोत्साहन लाभत आले.