विश्व पॅराअॅथलेटिक्समध्ये भारताला रौप्य, कांस्यपदक
वृत्तसंस्था/ कोबे (जपान)
येथे सुरु असलेल्या विश्व पॅरा अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेत रविवारी भारताने 1 रौप्य आणि 1 कांस्य अशी दोन पदकांची कमाई केली.
स्पर्धेच्या तिसऱ्या दिवशी पुरुषांच्या टी 47 उंच उडी प्रकारात भारताच्या निषाद कुमारने 1.99 मी. चे अंतर नोंदवित रौप्यपदक मिळविले. टोकियोत झालेल्या पॅरा ऑलिम्पिक स्पर्धेत निषाद कुमाने या क्रीडा प्रकारात रौप्यपदक मिळविले होते. या क्रीडा प्रकारात अमेरिकेच्या रॉड्रीक टाऊनसेंडने 2.05 मी. चे अंतर नोंदवित सुवर्णपदक पटकाविले. या क्रीडा प्रकारात भारताच्या रामपालला सहाव्या स्थानावर समाधान मानावे लागले. 2023 साली पॅरिसमध्ये झालेल्या विश्व पॅरा अॅथलेटिक्स स्पर्धेत निषाद कुमारने या क्रीडा प्रकारात रौप्यपदकाची कमाई केली होती.
महिलांच्या टी-35 200 मी. धावण्याच्या प्रकारात भारताच्या प्रीती पालने कांस्यपदक घेतले. या क्रीडा प्रकारात तिने 30.49 सेकंदाचा अवधी घेतला. महिलांच्या टी-20 400 मी. धावण्याच्या प्रकारात भारताच्या दिप्ती जीवनजीने अंतिम फेरीत प्रवेश मिळविला. या स्पर्धेत तिसऱ्या दिवसाअखेर पदक तक्त्यात चीनने 10 सुवर्ण, 8 रौप्य आणि 8 कांस्यपदकांसह 26 पदके मिळवित पहिले स्थान घेतले आहे. तर या पदक तक्त्यात भारत 29 व्या स्थानावर आहे. सदर स्पर्धा 25 मेपर्यंत चालणार आहे.