माधुरीच्या समर्थनार्थ म्हैसाळकरांचा मूक मोर्चा
म्हैसाळ :
"एक लढा माधुरीच्या अस्तित्वाचा!" या बॅनरखाली म्हैसाळ येथील तमाम जैन बांधव आणि सकल ग्रामस्थांनी एकत्र येत गावातील प्रमुख मार्गांवरून मूक मोर्चा काढत आंदोलन केले. नांदणी मठातील माधुरी उर्फ महादेवी ही हत्तीण, जी जैन समाजाच्या धार्मिक श्रद्धेशी जोडलेली आहे, तिला तात्काळ परत आणावे, अशी जोरदार मागणी यावेळी करण्यात आली.
मूक मोर्चाला गावातील आबासाहेब शिंदे चौकात सुरुवात झाली. गांधी चौक, पिरकट्टा गल्ली, सटवाई गल्ली, धनगर गल्ली, जैन मंदिर, मगदूम गल्ली, बस स्थानक या मार्गावरून हा मोर्चा पुन्हा शिंदे चौकात येऊन सभेत रूपांतरित झाला.

सभेमध्ये उपस्थित मान्यवरांनी माधुरी हत्तीण गुजरातमधील वनतारा येथे नेण्यात आल्याबद्दल तीव्र भावना व्यक्त केल्या आणि या प्रकाराचा निषेध केला. समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्या असून, माधुरीला तिच्या मूळ स्थानी परत आणले पाहिजे, असे ठाम मत यावेळी व्यक्त करण्यात आले.
शिंदे चौकात "माधुरीला तिचे प्रेमळ घर परत मिळावे" या मागणीसाठी स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली. अनेकांनी स्वाक्षऱ्या करून आपली भावना व्यक्त केली.
या मूक मोर्चात उपसरपंच सौ. पद्मश्री पाटील, माजी सरपंच आबासाहेब शिंदे म्हैसाळकर, माजी उपसरपंच परेश शिंदे म्हैसाळकर, भाजपचे धनंजय कुलकर्णी, सरंजामदार धनराज शिंदे, डॉ. बापूसो पाटील, माजी उपसभापती दिलीपकुमार पाटील, अनिल कबुरे, जिनेश्वर पाटील, अजित कबुरे, राष्ट्रवादीचे प्रणव पाटील, अभय कबुरे, महावीर देसाई, भूपाल कोंगनोळे, ए.टी. पाटील, एन.डी. पाटील, केसगोंडा पाटील, बापू कोगनोळे, बापू खोत, महावीर पाटील, एस.बी. पाटील, महावीर अंकलगे, मुबारक सौदागर यांच्यासह वीर सेवादल कार्यकर्ते, जिनमती महिला मंडळाच्या सदस्या, तमाम जैन बांधव, आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.