For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

गंगावेशचा सिकंदर शेख जनसुराज्य शक्ती श्री वारणा कुस्ती महासंग्राम

06:54 AM Dec 14, 2023 IST | Tarun Bharat Portal
गंगावेशचा सिकंदर शेख जनसुराज्य शक्ती श्री वारणा कुस्ती महासंग्राम
Advertisement

वारणानगर / दिलीप पाटील

Advertisement

वारणेच्या कुस्ती महासंग्रामातील हजारो कुस्ती शौकीनांची उत्कंठा शिगेला पोहचलेल्या तुल्यबळ झालेल्या खडाखडी लढतीत गंगावेशचा महाराष्ट्र केसरी पैलवान सिंकदर शेखने विरेंद्र आखाडा दिल्लीचा भारत केसरी मोनू दाहियावर दुहेरी पट काढत निकाली डावावर विजय मिळवून या कुस्ती संग्रामातील प्रथम क्रमांकाचा मानाचा जनसुराज्य शक्ती श्री किताब पटकावला. या कुस्तीचे पंच म्हणून राष्ट्रीय पंच संभाजी वरुटे यानी काम पाहिले. पाच मिनटातच ही निकाली कुस्ती झाली.

वारणा समूहाचे संस्थापक सहकारमहर्षी तात्यासाहेब कोरे यांच्या 29 व्या पुण्यस्मरणार्थ वारणानगर ता. पन्हाळा येथील वारणा विद्यालयाच्या पंटागंणावर विश्वनाथ वारणा शक्ती श्री कुस्ती महासंग्राम मैदान राष्ट्रीय तालीम संघ, महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद पुणे, कोल्हापूर जिल्हा शहर तालीम संघाच्या मान्यतेने झाले. या आंतरराष्ट्रीय कुस्ती मैदानाचे पुजन वारणा साखर कारखान्याचे उपाध्यक्ष प्रतापराव पाटील, वारणा दूध संघाचे उपाध्यक्ष एच. आर. जाधव यांच्या हस्ते वारणा व्यायाम मंदीराचे वस्ताद पै.संदीप पाटील, पै. दिलीप महापुरे व मान्यवर मल्ल्यांच्या उपस्थितीत झाले. कुस्ती मैदानात 250 हून अधिक कुस्त्या पार पडल्या.

Advertisement

 वारणा साखर शक्ती श्री

दुसऱ्या क्रमांकाच्या वारणा साखर शक्ती श्री किताबासाठी झालेल्या लढतीत पुण्याच्या काका पवार आखाड्याच्या महाराष्ट्र केसरी पै. हर्षद सदगीर व इराणचा आंतरराष्ट्रीय विजेता पै.अहमद मिर्झा यांच्यात झालेल्या चुरशीच्या लढतीत एकेरी पट काढत अहमद मिर्झाने विजय मिळवत दुसऱ्या क्रमाकांचा वारणा साखर शक्ती श्री किताब पटकावला.

वारणा दूध संघ शक्ती

वारणा दूध शक्ती श्री किताबासाठी झालेल्या चुरशीच्या लढतीत देवठाणे कोल्हापूरचा महाराष्ट्र केसरी पै. पृथ्वीराज पाटीलने उलटी डावावर पंजाबचा भारत केसरी पै. लाली मांड (लुधियाना) याला चितपट करून तिसऱ्या क्रमाकांचा वारणा दूध संघ शक्ती श्री किताब पटकावला.

वारणा बँक शक्ती

वारणा बँक शक्ती श्री किताबासाठी उपमहाराष्ट्र केसरी हनुमान आखाड्याचा पैलवान माऊली कोकाटे याने घुटना डावावर पंजाबचा राजस्थान केसरी पैलवान भिम याला चितपट करून वारणा बँक शक्ती श्री किताब पटकावला.

वारणा दूध साखर वाहतूक शक्ती

उपमहाराष्ट्र केसरी गंगावेश तालमीचा पै.प्रकाश बानकर याने दिल्ली बंद्री आखाड्याचा पै. अभिनायक सिंग यांचेवर निकाली डाव टाकून विजय मिळवत  वारणा दूध साखर वाहतूक शक्ती श्री किताब पटकावला.

वारणा ऊस वाहतूक शक्ती

पुण्याचा राष्ट्रीय विजेता पै.दादा शेळके याने घिस्सा डाव टाकत हिमाचल केसरी पैलवान पालिंदर-मथुरा याला चितपट करत वारणा ऊस वाहतूक शक्ती किताब पटकावला.

वारणा बिलट्युब शक्ती

कर्नाटकचा कर्नाटक केसरी व वारणेच्या मैदानावर सलग सात वेळा विजय मिळवणाऱ्या पै. कार्तिक काटे याने हरियानाचा आंतरराष्ट्रीय विजेता भारत केसरी  पै.जितेंद्र त्रिपुडी याला चितपटकरत वारणा बिलट्युब शक्ती किताब मिळवला.

वारणा शिक्षण शक्ती ...

सांगलीचा राष्ट्रीय विजेता पै. सुबोध पाटील याने घुटणा डावावर हनुमान आखाडा दिल्लीचा राष्ट्रीय विजेता पै. संदीप कुमार याच्यावर विजय मिळवत वारणा शिक्षण शक्ती श्री किताब पटकावला.

वारणा बझार व वारणा महिला शक्ती श्री

राष्ट्रीय विजेता पै.सतपाल सोनटक्के (टेंभुर्णी) विरुद्ध इराणचा आतंरराष्ट्रीय विजेता पै. रिजा इराणी यांच्यामध्ये झालेल्या लढतीत पै. सतपालने एकचाकी डावावर चितपट करत  वारणा बझार-वारणा महिला शक्ती श्री किताब पटकावला.

ई. डी. एफ मान शक्ती श्री

महाराष्ट्र चॅम्पीयन पै. कालीचरण-सोलनकर, (गंगावेश) याने इराणी डाव टाकत  दिल्लीचा राष्ट्रीय विजेता देव नरेला यांच्यावर एकलांगी डावावर विजय मिळवत कालीचरणने ई. डी. एफ मान शक्ती श्री किताब पटकावला.

वारणा नवशक्ती

महाराष्ट्र चॅम्पीयन वारणा आखाड्याचा पै. नामदेव केसरे याने निकाली डावावर हरियानाचा राष्ट्रीय विजेता पै. रवी कुमार याचेवर विजय मिळवून वारणा नवशक्ती श्री किताब पटकावला.

पै. शंकरराव पुजारी यांची निवृत्ती

प्रसिद्ध असलेले मल्ल व वस्ताद मार्गदर्शक असलेले पै. शंकरराव पुजारी हे गेली तीन दशके कुस्ती मैदानावर समालोचन करीत होते. त्यांच्या समालोचनाने मैदानात वेगळीच उर्जा मिळत होती. कुस्तीचा चालता बोलता इतिहास असलेले पै. शंकरराव पुजारी यानी वारणेच्या आंतरराष्ट्रीय कुस्ती मैदानात निवृत्ती जाहिर केली. यावेळी वारणा समूहाचे प्रमुख आमदार विनय कोरे यांच्या हस्ते त्यांचा फेटा बांधून सत्कार करण्यात आला.

विद्युत रोषनाई, संयोजन

मैदानामध्ये आकर्षक विद्युत रोषणाई, लेझर शो, फायर शॉट डॉलबीचा बजरंग बलीचा निनाद ‘साऊंड, फ्लोरलाईटसह एक लाख कुस्ती शौकीन बसतील इतक्या आकर्षक रचनेच्या गॅलरीसह बैठक व्यवस्था होती. मैदानाच्या मध्यभागी उंचीवर लावलेले इलेक्ट्रॉनिक्स क्रीनवर स्व. तात्यासाहेब कोरे तसेच आमदार विनय कोरे यांच्या छबीसह खेळाचे वैशिष्ट दिसणारे चित्र सर्वांत आकर्षक दिसत होते.

मैदानाचे समन्वयक प्रा. जीवनकुमार शिंदे, विकास चौगले, संग्राम दळवी, राजेंद्र पाटील, नामदेव चोपडे यासह वारणा व्यायाम मंदीराच्या मल्लांनी नेटक्या संयोजनाला विशेष सहकार्य केले.

देशी टारझन पै. संजयसिंह यांचे दणक्यात स्वागत

जागतिक 11 विक्रमाची नोंदवलेले देसी टारझन म्हणून जागतिक ख्याती असणारे गोसेवक पै. संजय सिंग यांचे मैदानामध्ये सवांद्याच्या गजरात जंगी स्वागत करण्यात आले. त्यानी छत्रपती शिवाजी महाराज व कोल्हापूर संस्थानचे लोकराजा शाहू महाराज यांच्या कार्याचा विशेष गौरव करून कुस्ती महासंग्रामाचे आयोजक आमदार विनय कोरे यांचे विशेष कौतुक केले. पै. संजयसिंह यानी मैदानावर टाकलेल्या मॅटवर प्रात्यक्षिक दाखवले. या प्रात्यक्षिकात नातेपुते येथील राजेंद्र पवार आखाड्याचा बेनापूर येथील संतोष सरगर यानी सहभाग घेतला होता. त्याचा आमदार विनय कोरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

मान्यवरांची उपस्थिती

यावेळी पन्हाळा-शाहुवाडीचे आमदार व वारणा समुहाचे नेते डॉ. विनय कोरे, युवा नेते विश्वेश कोरे, जनसुराज्यचे प्रदेशाध्यक्ष समित कदम, पोलीस अधीक्षक महेंद्र पंडीत, शाहूवाडी विभागाचे पोलीस उपअधिक्षक जयकुमार सुर्यवंशी, लोकमान्य मल्टीपर्पज सोसायटीचे संचालक गजानन धामणेकर, केडीसीसी बँकेचे संचालक विजयसिंह माने, दलितमित्र अशोकराव माने, गोकुळचे संचालक कर्णसिंह गायकवाड, पन्हाळा-शाहुवाडीचे प्रांताधिकारी समीर शिंगटे, वारणा समूहातील व परिसरातील विविध संस्थांचे पदाधिकारी, संचालक, अधिकारी यांच्यासह राजकीय सामाजिक क्षेत्रातील मान्यवर यांची उपस्थिती होती.

नामवंत मल्ल उपस्थित

हिंदकेसरी दिनानाथ सिंह, महारष्ट्र केसरी विष्णू जोशिलकर, आप्पा कदम, चंद्रहार पाटील,ऑलम्पिक वीर बंडा पाटील, संभाजी पाटील कुडित्रेकर संभाजी नरुटे यांच्यासह 18 पंचांनी या आखाड्यात पंच म्हणून न्यायदानाचे काम केले.

तात्यासाहेब कोरे कुस्तीभूषण पुरस्काराने शेळके, केसरे सन्मानित

शाहूवाडी तालुक्यातील पै.सदाशिव शेळके रा. डोणोली व पै. महिपती केसरे रा.कापशी या नामवंत मल्लांना आमदार विनय कोरे यांच्या हस्ते तात्यासाहेब कोरे कुस्ती भूषण पुरस्कार प्रदान करून मैदानावर सन्मानित करण्यात आले. पश्चिम महाराष्ट्र व कर्नाटक सीमा भागातील विविध जिह्यातून हजारो कुस्ती शौकीनांनी या मैदानावर हजेरी लावली होती.

Advertisement
Tags :

.