कोल्हापूरचा सिकंदर शेख जनसुराज्य शक्ती श्री
इजिप्तच्या अहमद तौफिकला घिस्सा डावावर दाखवले आस्मान : पृथ्वीराज पाटील वारणा साखर शक्ती
वारणानगर/ दिलीप पाटील
आंतरराष्ट्रीय कुस्ती महासंग्रामात प्रथम क्रमांकाच्या जनसुराज्य शक्ती किताबासाठी झालेल्या लढतीत कोल्हापूरचा महान भारत केसरी सिकंदर शेखने (गंगावेश) इजिप्तचा जागतिक विजेता अहमद तौफिकवर अवघ्या सहाव्या मिनिटाला घिस्सा डावावर नेत्रदीपक विजय मिळवला. सिकंदरने एकेरी पट काढून घिस्सा मारण्याचा प्रयत्न केला पण त्याला यश आले नाही. यानंतर तौफिकने खालून डंकी मारून फिरण्याचा प्रयत्न केला पण सिंकदरने त्यावर लगेच ताबा मिळवला. अखेर सहाव्या मिनिटाला सिंकदरने पाय लावून घिस्सा डावावर अहमद तौफिकला चितपट करुन हजारो कुस्ती शौकिनांची मने जिंकली.
दुसऱ्या क्रमांकाच्या वारणा साखर शक्तीसाठी झालेल्या कुस्तीत कोल्हापूरचा महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटीलने इजिप्तच्या सल्लाहिद्दीन अब्बासला नागपट्टी डावावर चितपट करत प्रेक्षणीय विजय मिळवला. पृथ्वीराजने पाचव्या मिनिटाला बगल डूग काढून इजिप्तचा जागतिक विजेता सल्लाहिद्दीन अब्बासला खाली घेत पाय लावून घिस्सा मारण्याचा प्रयत्न केला. बलदंड शरीराच्या सल्लाहिद्दीनला पृथ्वीराजने नागपट्टी लावून पुरेपूर चितपट करण्याचा प्रयत्न केला पण पृथ्वीराजला चित करणे कठीण बनले होते. अखेर पृथ्वीराजने नागपट्टी डावावर त्याला पराभूत करत वारणा साखर शक्ती किताब जिंकला.
भूपेंद्र अजनाळा वारणा दूध शक्ती श्री
वारणा दूध शक्तीसाठी उपमहाराष्ट्र केसरी माऊली कोकाटे (पुणे) हा आजारी असल्याने त्याच्या जागी सेनादलाचा शैलेश शेळके सहभागी झाला. दरम्यान या लढतीत पंजाबच्या मछवाडा आखाड्याचा भारत केसरी भूपेंद्र अजनाळा याने घुटना डावावर शैलेश शेळकेला चितपट करीत वारणा दूध संघ शक्ती किताब पटकावला.
वारणा बँक शक्तीचा मानकरी सेनादलाचा दिनेश गुलिया
कोल्हापूर गंगावेश तालमीचा उपमहाराष्ट्र केसरी प्रकाश बनकर विरुद्ध दिल्ली सेनादलचा हिंद केसरी दिनेश गुलिया यांच्यात कुस्ती झाली. यामध्ये दिनेश गुलियाने बनकरचा एकेरी पट काढत विजय मिळवला व तो वारणा बँक शक्ती किताबाचा मानकरी ठरला.
वारणा दूध-साखर वाहतूक शक्तीचा किताब दादा शेळकेला
पुणे काका पवार तालमीचा राष्ट्रीय विजेता दादा शेळके याने हरियानाच्या राष्ट्रीय विजेता मनजीत खत्रीला घिस्सा डावावर पराभूत केले व वारणा दूध-साखर वाहतूक शक्ती किताब पटकावला. तसेच पुण्याच्या काका पवार तालमीचा राष्ट्रीय विजेता रवि चव्हाण याने दिल्लीचा छत्रसाल आखाड्याच्या आशियाई विजेता प्रवीण चहरवर झोळी डावावर विजय मिळवला. या विजयासह तो वारणा ऊस वाहतूक शक्तीचा मानकरी ठरला.
जॉन्टी भाटिया वारणा बिलट्युब शक्तीचा मानकरी
दिल्ली हनुमान आखाड्याचा जागतिक विजेता जॉन्टी भाटिया याने डबल कर्नाटक केसरी कार्तिक काटे याच्यावर घिस्सा डावावर विजय मिळवत कार्तिकची विजयी परंपरा खंडित केली. या विजयासह जॉन्टी भाटिया वारणा बिलट्युब शक्तीचा मानकरी ठरला.
पवन कुमार वारणा शिक्षण शक्ती श्री
सांगलीचा राष्ट्रीय विजेता संदीप मोटे कुस्तीत जखमी झाल्याने पंजाबचा राष्ट्रीय विजेता पवन कुमार याला विजयी घोषित करून, वारणा शिक्षण शक्ती किताब दिला. पुणेचा राष्ट्रीय विजेता समीर शेख याने दुहेरी पट काढत ढाक डावावर पुणेचा राष्ट्रीय विजेता सेनादलच्या मुन्नाला चितपट केले. शेख वारणा बझार व वारणा महिला शक्ती किताबाचा मानकरी ठरला.
उत्तर प्रदेशचा राष्ट्रीय विजेता अमितकुमार याचा काही मिनिटात एकेरी पट काढत ढाक डावावर वारणेचा महाराष्ट्र चॅम्पियन नामदेव केसरे यांने विजय मिळवत ईडीएफमान शक्ती किताब पटकावला. गंगावेश तालमीचा महाराष्ट्र चॅम्पियन कालीचरण सोलणकर याने एकेरी पट काढत टेंभुर्णीचा महाराष्ट्र चॅम्पियन सतपाल सोनटक्के याच्यावर घिस्सा डावावार नेत्रदीपक विजय मिळवला व वारणा नवशक्ती किताब पटकावला. याशिवाय, मैदानात 250 वर लहान-मोठ्या लढती झाल्या.