For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बेडकीहाळचे आंतरराष्ट्रीय कुस्ती मैदान सिकंदरने मारले निकाली डावावर

09:57 AM Oct 16, 2024 IST | Tarun Bharat Portal
बेडकीहाळचे आंतरराष्ट्रीय कुस्ती मैदान सिकंदरने मारले निकाली डावावर
Advertisement

दुसऱ्या क्रमांकाची कुस्ती मल्ल पृथ्वीराज पाटील यांनी गाजविली : बेडकिहाळ ऐतिहासिक कुस्ती मैदानाला लाभला कुस्ती शौकिनांचा प्रचंड प्रतिसाद

Advertisement

वार्ताहर/बेडकिहाळ 

येथील ग्रामदैवत श्री कल्याणा सिद्धेश्वर देवाच्या ऐतिहासिक दसरा महोत्सवानिमित्त सोमवार 14 रोजी सिद्धेश्वर कुस्ती मैदानात आंतरराष्ट्रीय कुस्ती मैदानाचे आयोजन दसरा कमिटी व ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले होते. हे मैदान महान भारत केसरी मल्ल सिकंदर शेख याने गाजवले. पहिल्या क्रमांकाची कुस्ती  इराणचा मल्ल इरफान विरुद्ध भारताचा महान भारत केसरी मल्ल सिकंदर शेख यांच्यात लावण्यात आली होती. 2 मिनिटात मल्ल इरफान याला निकाल डावावर चितपट करून पहिल्या क्रमांकाचा मानकरी ठरला. यास पंच म्हणून ऑल इंडिया चॅम्पियन तानाजी यांनी काम पाहिले. ही कुस्ती शिवलिंगेश्वर महास्वामीजी, युवा नेते दत्तकुमार पाटील, माजी आमदार काका पाटील, समर्थ पाटील यांच्या हस्ते लावण्यात आली.

Advertisement

दुसऱ्या क्रमांकाची कुस्ती महाराष्ट्र केसरी मल्ल पृथ्वीराज पाटील विरुद्ध ऑल इंडिया गोल्ड मेडलिस्ट मल्ल सुरज चौधरी यांच्यात लावली होती. यामध्ये मल्ल पृथ्वीराज पाटील याने मल्ल सुरज चौधरी (याला 11 मिनिट 96 सेकंदात एकेरी कस डावावर चितपट करून दुसऱ्या क्रमांकाचे मानकरी ठरले. यास पंच म्हणून संजय देवाचे यांनी काम पाहिले. तर परमपूज्य शिवलिंगेश्वर महास्वामी, कृषी पंडित सुरेश देसाई व दसरा कमिटीच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या हस्ते ही कुस्ती लावण्यात आली. मल्ल दीपक पंजाब विरुद्ध सांगलीचा मल्ल संदीप मोठे यांच्यात झाली. या कुस्तीमध्ये मल्ल संदीप मोठेने मल्ल दीपक पंजाब याला 14 मिनिटे 48 सेकंदात गुणांवर विजय खेचून आणून कुस्ती जिंकली. यास पंच म्हणून संदीप वाळकुंजे यांनी काम पाहिले. तर निपाणी मतदारसंघाचे युवा नेते उत्तम पाटील यांच्या हस्ते ही कुस्ती लावण्यात आली.

चौथ्या क्रमांकाची कुस्ती कर्नाटक डबल केसरी मल्ल कार्तिक काटे व मल्ल कमलजीत यांच्यात झाली. यामध्ये मल्ल कार्तिक काटे याने 3 मिनिटे 51 सेकंदात एकलांगी डावावर मल्ल कमलजीत याला चितपट करून चौथ्या क्रमांकाचे बक्षीस पटकाविले. यास पंच म्हणून शहाजी पवार यांनी काम पाहिले तर बाळासाहेब देसाई बेडकिहाळ यांच्या हस्ते ही कुस्ती लावण्यात आली. पाचव्या क्रमांकाची कुस्ती मल्ल बाळू अपराज विरुद्ध मल्ल लक्ष्मण भागवत यांच्यात लावण्यात आली होती. ही कुस्ती मल्ल लक्ष्मण भागवत याने 7 मिनिटे 45 सेकंदात घुटना डावावर विजय मिळविला. यास पंच म्हणून विलास टिपुगडे यांनी काम पाहिले. ही कुस्ती अजित चौगुले यांच्या हस्ते लावण्यात आले.

यूट्युब वर गाजलेला नेपाळचा मल्ल थापा व मल्ल प्रिन्स कुमार यांच्यात सहाव्या क्रमांकाची कुस्ती लावण्यात आली होती. ही कुस्ती 11 मिनिटात मल्ल थापा याने गाजवून बेडकिहाळच्या ऐतिहासिक मैदानातील हजारो प्रेक्षकांना खुश केले. सर्वांत रंगतदार कुस्ती झाल्याने मल्ल थापावर कुस्ती शौकिनांनी पैशाची बरसात केली. यास पंच म्हणून प्रदीप देसाई यांनी काम पाहिले. ही कुस्ती दसरा कमिटीच्या सर्व सदस्यांच्या हस्ते लावण्यात आली. याचबरोबर जाहिरात ब्लॉकवरील सातव्या क्रमांकाची कुस्ती प्रशांत शिंदे याने जिंकली तर आठव्या क्रमांकाची कुस्ती व नवव्या क्रमांकाची कुस्तीही बरोबरीत सोडविण्यात आली. दहाव्या क्रमांकाची कुस्ती बेडकिहाळचा मल्ल अभिनंदन नाईक विरुद्ध कोल्हापूरचा मल्ल रुपेश कदम यांच्यात लावण्यात आली होती. ही कुस्ती अभिनंदन नाईकने 5  मिनिटात डंकी डावावर जिंकली. यास पंच म्हणून नेज येथील लक्ष्मण निंबाळकर यांनी काम पाहिले. एसबीआय बँकेचे निवृत्त अधिकारी अब्दुलकादिर जुनेदि पटेल, व निवृत्त शिक्षक आर बी खोत यांच्या हस्ते लावण्यात आली.

दुपारी 3 वाजता सिद्धेश्वर ऐतिहासिक कुस्ती मैदानात मान्यवर, दसरा कमिटीचे सदस्यांचे वाद्यासह आगमन झाले. यावेळी पूजन संदीप पोलीस पाटील, प्रणव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. सुरेश देसाई यांच्यासह दसरा कमिटीच्या सर्व सदस्यांनी कुस्ती मैदानात पुष्पवृष्टी करून कुस्तीला चालना दिली. आदिराज बंडगर व संग्राम मुधाळे यांच्यात उद्घाटनाची कुस्ती लावण्यात आली होती. यास पंच म्हणून बाळू जाधव यांनी काम पाहिले. ऐतिहासिक कुस्ती मैदानात युवा नेते उत्तम पाटील, माजी आमदार काका पाटील, डॉ. विजय पाटील, डॉ. विलास जोशी, हर्षवर्धन जाधव, प्रकाश किणीकर, शितल अम्मनावर, इंद्रजीत पाटील, पासगौडा पाटील, नाभीराज खोत, निरंजन पाटील, सदलगा पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक शिवकुमार बिरादार यांच्यासह मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.

कुस्ती कार्यक्रमास बेळगाव, नेज, खडकलाट, बिजगर्णा, मुनोळी, येळ्ळूर कुस्ती कमिटी यांच्यासह गावातील विविध संघ संस्थांचे पदाधिकारी, ग्रामपंचायत  सदस्य, दसरा कमिटीचे सदस्य, विविध युवक मंडळाचे कार्यकर्ते, व ग्रामस्थ, कुस्ती शौकीन हजारोंच्या संख्येने उपस्थित होते. कुस्ती मैदान यशस्वी पार पाडण्यासाठी दसरा महोत्सव कमिटी यांच्यासह सदलगा पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक शिवकुमार बिरादार यांनी मोलाचे सहकार्य केले. यावेळी पोलीस खात्याकडून कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता. कुस्ती मैदानात पंच म्हणून बाबासाहेब कागे, दगडू नेज, बसू घोडगिरी, कल्लू कारले आदींनी काम पाहिले. निवेदक म्हणून सांगलीचे मल्ल ज्योतीराम वाझे यांनी काम पहिले. तर हलगी साथ बजरंग अबदागीर यांनी दिली.

बेडकिहाळातील मल्लांनी मैदान गाजवले..

या ऐतिहासिक कुस्ती मैदानात बेडकिहाळचे मल्ल अभिनंदन नाईक, सार्थक हराळे, वैभव आरगे, यश कामन्ना, वरद पाटील, आदर्श तारदाळे, आदित्य काकडे,  सुरज आंबी यांनी बेडकिहाळ कुस्ती मैदान गाजविले.

Advertisement
Tags :

.