For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बिहारमध्ये राजकीय स्थित्यंतराची चिन्हे

07:00 AM Jan 26, 2024 IST | Tarun Bharat Portal
बिहारमध्ये राजकीय स्थित्यंतराची चिन्हे
Advertisement

नितीश कुमारानंतर लालूप्रसाद यादवही सक्रीय : भाजप प्रदेशाध्यक्षासह संजद नेता दिल्लीत दाखल

Advertisement

वृत्तसंस्था /पाटणा

बिहारच्या राजकारणात मागील 18 वर्षांपासून केंद्रस्थानी असणारे मुख्यमंत्री नितीश कुमार हे पुन्हा मोठा निर्णय घेणार असल्याचे मानले जात आहे. नितीश कुमार हे पुन्हा रालोआत दाखल होतील अशी चर्चा आहे. बिहारमध्ये आता संजद आणि राजद नेत्यांच्या वेगवेगळ्या बैठका गुरुवारी झाल्या आहेत. याचदरम्यान राजद अध्यक्ष लालूप्रसाद यादव सक्रीय झाले असून त्यांनी विधानसभा अध्यक्ष अवधबिहारी चौधरी यांच्याशी फोनवरून संपर्क साधला आहे. तर विधनासभा उपाध्यक्ष महेश्वर हजारी यांचा दौरा रद्द झाला आहे. राजद नेत्या राबडी देवी यांच्या निवासस्थानी राजदच्या नेत्यांनी चर्चा केली आहे. उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव हे सध्या वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहेत.

Advertisement

नितीश कुमार यांची ‘तयारी’ पाहता तेजस्वी यादव यांनी राजदच्या पदाधिकाऱ्यांची बैठक बोलाविली आहे. राज्य सरकारला कुठलाच धोका नसल्याचा दावा राजद नेते शक्ति यादव यांनी केला आहे. परंतु राजदने तातडीने पावले उचलत नितीश कुमार यांच्या संभाव्य निर्णयाच्या पार्श्वभूमीवर सत्ता राखण्याचे प्रयत्न चालविले आहे. राजद हा बिहारमधील सर्वाधिक संख्याबळ असलेला पक्ष आहे. काँग्रेस आणि डाव्या पक्षांच्या पाठिंब्यानंतर राजदला बहुमतासाठी केवळ 8 आमदार कमी पडत आहेत. एआयएमआयएम तसेच अपक्षांचा पाठिंबा गृहित धरला तरीही राजदला बहुमत मिळविणे अवघड ठरले आहे. अशा स्थितीत राजद संजदमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करणार असल्याचे मानले जात आहे.

तर दुसरीकडे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या निवासस्थानी संजदचे माजी अध्यक्ष ललन सिंह, प्रदेशाध्यक्ष उमेश कुशवाह, मंत्री संजय झा, विजय चौधरी समवेत अनेक नेते दाखल झाले होते. या नेत्यांदरम्यान कुठल्या मुद्द्यांवर चर्चा झाली हे सांगणे टाळण्यात आले आहे. परंतु बिहारमध्ये सत्तापरिवर्तन होणार असल्याचा अनुमान व्यक्त होत आहे. संजदने स्वत:च्या सर्व आमदारांना पुढील काही दिवसांपर्यंत पाटण्यातच थांबण्याची सूचना केली आहे. तर ‘हम’चे अध्यक्ष जीतनराम मांझी यांनीही स्वत:च्या आमदारांना राज्याच्या राजधानीत थांबण्याची सूचना केली आहे. तर दुसरीकडे भाजप अध्यक्ष जगतप्रकाश न•ा यांचा शुक्रवारी होणारा केरळ दौरा रद्द झाला आहे. या निर्णयामागे बिहारमधील घडामोडी कारणीभूत असल्याचे मानले जात आहे.

लवकरच निर्णय शक्य

राजद अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांनी मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्याशी फोनवरून चर्चा केल्याचे समजते. मुख्यमंत्री नितीश कुमार हे येत्या काही दिवसात अंतिम निर्णय घेणार आहेत. यानंतरच वर्तमान सरकार कायम राहणार का संजद रालोआत परतणार हे स्पष्ट होणार आहे.

Advertisement
Tags :

.