Political News: राज्यातील राजकारणात राजकीय दांडगाईची लक्षणे
महाराष्ट्राने व येथील राजकारण्यांनी विरोधी विचाराचे नेहमीच स्वागत केले
By : प्रशांत चव्हाण
पुणे : महाराष्ट्रातील ‘राजकीय दांडगाई’ हा सध्या मोठा प्रश्न होऊन बसला आहे. संजय गायकवाड यांनी कँटिन कर्मचाऱ्याला केलेली मारहाण, प्रवीण गायकवाड यांच्यावरील शाईहल्ला, विधिमंडळामधील पडळकर व आव्हाड समर्थकांमधील हाणामारी ही सर्व त्याचीच लक्षणे म्हणावी लागतील. स्वाभाविकच भविष्यात दांडगाईमुक्त महाराष्ट्र निर्माण करणे, हेदेखील राज्यापुढचे आव्हान असेल.
महाराष्ट्राच्या राजकारणाला एक समृद्ध अशी परंपरा राहिली आहे. यशवंतराव चव्हाण यांच्या या महाराष्ट्राने इतर राज्यांपुढे सुसंस्कृत राजकारणाचा नवा मानदंड निर्माण केला. परंतु, तोच महाराष्ट्र सध्या दांडगाईच्या राजकारणाने ग्रासल्याचे पहायला मिळते. वास्तविक, महाराष्ट्राने व येथील राजकारण्यांनी विरोधी विचाराचे नेहमीच स्वागत केले.
आंदोलन, मोर्चे, निदर्शने याकडे पाहण्याचा त्या काळातील राजकारण्यांचा दृष्टीकोन हा अत्यंत निकोप होता. सभागृहात शाब्दिक चकमकी होत. परस्परांविरोधात टीका टिप्पण्याही होत. तथापि, त्यात कुठेही द्वेषाचा लवलेष नव्हता. टीका, प्रतिटिका वा प्रश्नोत्तरांमधूनही अभ्यास, चिकित्सा याचे दर्शन घडत असे. मात्र, हा सुसंवादी इतिहास सोडून आता हाणामाऱ्या, दांडगाईवर भर दिला आहे.
यातील राष्ट्रवादीचे निलंबित युवा प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांची दांडगाई गंभीरच म्हटली पाहिजे. मागच्या काही दिवसांपासून राज्यात कृषिमंत्री माणिकराव कोकाटे हे वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. त्यात कोकाटे यांचा सभागृहातील रमी खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आणि त्यांच्याविरोधात राज्यभर नकारात्मक वातावरण तयार झाले.
रमी खेळताना सापडलेल्या कोकाटेंचा निषेध म्हणून राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या समोर लातुरात पत्ते फेको आंदोलन झाले. त्याने चिडलेल्या सूरज चव्हाण यांनी छावाच्या विजय घाटगे यांना केलेली बेदम मारहाण अंगावर काटा आणणारी होती.
अर्थात या प्रकरणात पक्षाचे सर्वेसर्वा अजित पवार यांनी सूरज चव्हाण यांच्यावर निलंबनाची कारवाई केली, हे बरेच झाले. परंतु, प्रश्न केवळ एकट्या सूरज चव्हाण यांच्यापुरता मर्यादित नाही, तर दांडगाई करणाऱ्या प्रवृत्तीचा आहे. ही प्रवृत्ती दूर करण्याकरिता राजकीय पक्षांना व पक्षाच्या नेतृत्वाला गंभीरपणे पावले उचलावी लागतील.
शिंदे गटाचे आमदार व इतर नेते तर कायम या ना त्या कारणामुळे वादात असतात. आमदार संजय गायकवाड यांची मारधाड हे अगदी प्रकरण. त्याआधीही या पक्षाचे संतोष बांगर वगैरे मंडळींची फ्री स्टाईल कुस्ती महाराष्ट्राने पाहिली आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या काळात नेतृत्वाचा धाक व पकड पक्षावर होती.
उद्धव ठाकरे यांचे नेतृत्व सौम्य असले, तरी त्यांच्या कारकिर्दीतही सेनेच्या आमदारांवर लगाम होता. परंतु, एकनाथ शिंदेंच्या काळात ही मंडळी चौखूर उधळलेली दिसतात. भाजप हा राज्यातला सर्वांत मोठा पक्ष. देवेंद्र फडणवीस यांच्याकडे राज्याचे नेतृत्व आहे. मात्र, या शिस्तबद्ध पक्षाची शिस्त मागच्या काही वर्षांत बिघडत चालल्याचे दिसते. राजकीय पक्षांनी समाजभान असलेले नेते, कार्यकर्ते घडवण्यावर लक्ष केंद्रित करावे.