पुन्हा नंदिनी दूध दरवाढीची चिन्हे
तूप दरात प्रतिकिलो 90 रुपयांनी वाढ
बेंगळूर : राज्यात पुन्हा नंदिनी दूध दरात वाढ होण्याची शक्यता आहे. बुधवारी नंदिनी ब्रँडच्या तुपाची किंमत प्रतिकिलो 90 रुपयांनी वाढविण्यात आली आहे. त्यामुळे नंदिनी तुपाची किंमत 610 रुपयांवरून 700 रुपये झाली आहे. बुधवारपासूनच सुधारित दर लागू करण्यात आला आहे. यापाठोपाठ आता दूध दरातही वाढ होण्याचे स्पष्ट संकेत बेमुलचे अध्यक्ष डी. के. सुरेश यांनी दिले आहेत. इतर राज्यांमध्ये दूध दर कर्नाटकापेक्षा अधिक आहे. त्यामुळे आमच्याकडेही दूध दरवाढ करण्याची विनंती कर्नाटक दूध मंडळाकडे करण्यात आली आहे. दरवाढीचा प्रस्ताव सादर करण्यात आलेला नाही, मात्र विनंती करण्यात आली आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
बेंगळूरमध्ये बुधवारी पत्रकारांशी ते बोलत होते. खासगी कंपन्यांचे दूध ऑनलाईन विक्री वाढली आहे. आम्ही शेतकऱ्यांकडून दूध खरेदी करून वेळोवेळी बिले देतो. इतर राज्यांत मोठ्या प्रमाणावर थकबाकी आहे. आमच्याकडे दूध कर इतर राज्यांच्या तुलनेत कमी आहे. त्यामुळे केएमएफकडे प्रस्ताव सादर केला नसला तरी दरवाढीबाबत विनंती केली आहे. अर्धा लिटर दूध विक्री केली तर नुकसान होत आहे तर एक लिटर पाकिटातून विक्री केली तर लाभ होत आहे. तूप दरात आजपासून (बुधवार) वाढ करण्यात आली आहे. तरी सुद्धा बाजारपेठ दरापेक्षा नंदिनी तुपाचा दर कमी आहे. शिवाय दर्जाच्या बाबतीत आम्ही अग्रेसर आहे, असेही ते म्हणाले.