चांगल्या आश्वासक नोकर भरतीचे संकेत
विविध क्षेत्रातील कंपन्यांकडून यंदाही नोकर भरती चांगली राहणार आहे. आयटी उद्योगात म्हणावी तशी भरतीत वाढ पाहायला मिळालेली नाही, ती यावर्षी दिसेल अशी शक्यता आहे. जागतिक क्षमता केंद्रे, यांच्याशी निगडीत सहकारी क्षेत्रे, अभियांत्रिकी, उत्पादन क्षेत्रे आणि बँकिंग, वित्तसेवा व विमा क्षेत्रे ही येत्या काळात भारतीयांना रोजगार मिळवून देणारी असणार आहेत.
आर्थिक वर्ष 2026 हे नोकरभरतीच्या दृष्टीने चांगले राहणार असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. त्यामुळे भारतीयांसाठी ही तिसरी गुड न्यूज आहे असे म्हणायला हरकत नाही. याआधी रिझर्व्ह बँकेने रेपोदरात कपात करत बांधकाम क्षेत्रासह घर खरेदीदारांना दिलासा होता. त्यानंतर भारतीय हवामान खात्याने यंदा चांगला मान्सून बरसणार असल्याची आनंद वार्ता आपल्यापर्यंत पोहचवली. या दोन बाबींचा हर्ष होत असतानाच आता आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये भरतीचे प्रमाण 9.75 टक्के इतके अधिक असणार असल्याचे सांगितले जात आहे. मागच्या वर्षाच्या तुलनेत भरतीत वरील प्रमाण वाढ दिसणार असल्याचे म्हटले गेले आहे. तेव्हा रोजगार, नोकरीचा शोध घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी हीसुद्धा आनंद देणारीच वार्ता म्हणायला हवी. देशातील जास्तीत जास्त जणांना रोजगार प्राप्त होणं गरजेचं असून बेरोजगारीचं प्रमाण खाली आणण्याचेही आव्हान असणार आहे.
विविध क्षेत्रातील कंपन्यांकडून यंदाही नोकर भरती चांगली राहणार आहे. आयटी उद्योगात म्हणावी तशी भरतीत वाढ पाहायला मिळालेली नाही, ती यावर्षी दिसेल अशी शक्यता आहे. जागतिक क्षमता केंद्रे, यांच्याशी निगडीत सहकारी क्षेत्रे, अभियांत्रिकी, उत्पादन क्षेत्रे आणि बँकिंग, वित्तसेवा व विमा क्षेत्रे ही येत्या काळात भारतीयांना रोजगार मिळवून देणारी असणार आहेत. भरतीचे प्रमाण पाहिल्यास 30 टक्के इतकी भरती ही टायर 2 व टायर 3 शहरांमध्ये विविध उद्योगांमध्ये होते आहे. आगामी काळातही या शहरांमध्ये नोकर भरतीचे प्रमाण वाढण्याची चिन्हे आहेत. देशात जागतिक क्षमता केंद्रांच्या (ग्लोबल कॅपॅबिलीटी सेंटर)संख्येत वाढ होत असून सध्याला पाहता या उद्योगात 1.66 दशलक्ष जणांना रोजगार प्राप्त झाला असून या उद्योगाचा विकास 36 टक्क्यांनी वाढीव राहण्याची चिन्हे आहेत. तेव्हा जागतिक क्षमता केंद्रे मोठ्या शहरांसह टायर 2, टायर 3 शहरांमध्ये तयार होणार असून त्यातून पात्र उमेदवारांना रोजगाराच्या संधी प्राप्त होणार आहेत. या क्षेत्रात भरतीचे प्रमाण आर्थिक वर्षात 12 टक्के वाढीव राहणार असल्याचाही अंदाज सांगितला जात आहे. बँकिंग, वित्तसेवा व विमा क्षेत्रसुद्धा यंदा नोकर भरतीत कमाल करणार आहे. या क्षेत्रातही कर्मचारी भरतीचे प्रमाण मागच्या वर्षापेक्षा 12 टक्के वाढीव राहणार आहे. यावरुन नव्या दमाच्या उमेदवारांना कोणत्या क्षेत्रात यापुढे संधी असणार आहेत याचा अंदाज बांधता येईल हे नक्की. यासोबत एफएमसीजी व औषध कंपन्या ही क्षेत्रेही आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये भरतीत 10 टक्के वाढ करताना दिसतील. दुसरीकडे ऑटो, आयटी ही आणखी दोन क्षेत्रे भारतीयांना रोजगार मिळवून देण्यात महत्त्वाचे योगदान देत आहेत. या क्षेत्रातली नोकर भरती वाढ अनुक्रमे सरासरी 5.5 टक्के, 5 टक्के इतकी राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. भरतीचा विचार केल्यास मध्यम स्तरावरील अनुभवी उमेदवारांना भरतीत स्थान असेल. कामाचा प्रत्यक्ष अनुभव व कौशल्य या आधारावर उमेदवारांना जास्तीत जास्त चांगल्या रोजगाराच्या संधी प्राप्त होताना दिसतील, हे नक्की.
विविध उद्योगांमध्ये नव्या फ्रेशरना नोकरी मिळण्याचे प्रमाण 45 टक्के राहणार असल्याचे बोलले जात आहे. तात्पुरत्या कर्मचारी भरतीचे प्रमाण यंदा 26 टक्के राहील. हे कर्मचारी पंत्राटी स्तरावर किंवा प्रकल्पांवर असतील. एकंदर विविध संघटनांच्या आढाव्यातून लक्षात घेतल्यास 53 टक्के संघटना 5 ते 10 टक्के भरती वाढवतील तर 33 टक्के संघटनांनी मात्र 10 ते 15 टक्के यंदा नोकर भरतीत वाढ केली जाणार असल्याचे म्हटले आहे.
भरती करण्यात येणाऱ्या उद्योगांचा विचार केल्यास रिटेल, इ-कॉमर्स आणि क्यु कॉमर्स ही क्षेत्रे यंदा जास्तीत जास्त उमेदवारांना सामावून घेण्यासाठी उत्सुक असतील. यासोबत लॉजिस्टीक्स व वेअरहाऊसिंग ही क्षेत्रेही देशात विविध शहरांमध्ये विस्तारणार असून त्यांच्याकडूनही अनेकांना रोजगार मिळवून दिला जाणार आहे. ऑटोमोबाईल क्षेत्रातील भरती 15 टक्के वाढू शकते तर इलेक्ट्रीक वाहन क्षेत्र 11 टक्के भरतीचे प्रमाण वाढवू शकते, असे एका अहवालात म्हटले आहे. याव्यतिरीक्त आयटी सेवा, टेलिकॉम व टेक्नॉलॉजी क्षेत्रात 13 टक्क्यांची भरतीत वाढ राहू शकते. उत्पादन, अभियांत्रिकीत 11 टक्के तसेच पायाभूत सुविधा, वाहतूक आणि बांधकाम क्षेत्र 10 टक्क्यांचा वाटा उचलतील. याशिवाय आरोग्य, हॉस्पिटॅलिटी, माध्यम व मनोरंजन व शिक्षण या क्षेत्रात तुलनेने कमी भरती झालेली दिसेल. 2024 मध्ये पाहता अॅप्लीकेशन टेक सपोर्ट प्रॅक्टीशनर, बिझनेस डेव्हलपमेंट स्पेशॅलिस्ट, एआय/एमएल इंजिनियर, आयटी आर्किटेक्ट, अॅप्लीकेशन डेव्हलपर या उमेदवारांना अधिक संधी मिळाली आहे. यंदा हवाई उद्योग, आयटी सेवा, बांधकाम क्षेत्र, व्यवसाय सल्ला, वैद्यकीय, ट्रॅव्हल व्यवस्थापन, मशिन निर्मिती, हॉस्पिटॅलिटी या क्षेत्रांमध्ये नोकरीच्या संधी चालून येतील. एकूणच संभाव्य उमेदवारांनी आता नोकरीची संधी साधण्यासाठी तयार असायचं आहे.
-दीपक कश्यप