राजद-काँग्रेसमध्ये कलहाची चिन्हे
आघाडी केवळ निवडणुकीपुरती : काँग्रेस
वृत्तसंस्था/ पाटणा
निवडणुकीनंतर बिहार महाआघाडीला तडे जाण्यास सुरुवात झाली आहे. मागील दोन दिवसांमध्ये महाआघाडीतील दोन प्रमुख पक्ष राजद आणि काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी मोठी वक्तव्यं केली आहेत. राजदचे नेते मंगनी लाल मंडल यांनी काँग्रेसच्या जनाधारावर प्रश्न उपस्थित केला. तर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष राजेश राम यांनी आमची आघाडी संघटनात्मक नव्हे तर केवळ निवडणुकीसाठी होती असे म्हणत काँग्रेस आता स्वत:च्या पद्धतीने संघटनेला विस्तार देणार असल्याचे म्हटले आहे. राजेश राम यांच्या या वक्तव्यावर राजद प्रवक्ते मृत्युंजय तिवारी यांनी काँग्रेस आत्महत्या करू इच्छित असेल तर कुणी काय करू शकते अशी उपरोधिक टीका केली आहे.
पाटण्यातील सदाकत आश्रमात सोमवारी काँग्रेस नेत्यांची निवडणूक निकालाची समीक्षा आणि जिल्हाध्यक्षांकडून फीडबॅक घेण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली. पक्षश्रेष्ठींच्या निर्देशावर ही बैठक बोलाविण्यात आली होती. महाआघाडी केवळ निवडणुकीसाठी होती. याचा कुठलाही संघटनात्मक पैलू नाही. काँग्रेस पक्ष स्वत:ला मजबूत करणे आणि विस्तारासाठी काम करत असल्याचे वक्तव्य प्रदेशाध्यक्ष राजेश राम यांनी केले. काँग्रेसचे प्रवक्ते असितनाथ तिवारी यांनीही त्यांच्या भूमिकेचे समथंन पेल. निवडणुकीनंतर दोन्ही पक्षांदरम्यान कुठलीच चर्चा झालेली नाही. सभागृहात विरोधी पक्ष सरकारला कसे सामोरे जाणार यावरही विचारविनिमय झाला नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
बिहारमध्ये राजदचा जनाधार आहे, ज्याचा लाभ काँग्रेसलाही मिळतो. काँग्रेसला जी मते मिळाली आहेत, ती राजदची आहेत. काँग्रेस आत्महत्या करू इच्छित असेल तर कोण रोखू शकतो असे उपरोधिक विधान राजद प्रवक्ते मृत्युंजय तिवारी यांनी केले आहे.