मनपाच्या प्रवेशद्वारावरील तिन्ही भाषांतील फलक गायब
इंग्रजी, मराठी हटविण्यासाठी महानगरपालिका प्रशासनाचा खटाटोप : मराठी भाषिकांतून तीव्र संताप
बेळगाव : बेळगाव शहराचा मानबिंदू असलेल्या बेळगाव महानगरपालिकेवर कानडी वरवंटा फिरविला जात आहे. सरकारने जारी केलेल्या आदेशाची ढाल करत अधिकाऱ्यांकडून सर्वत्र कानडीकरण केले जात आहे. त्यातच मुख्य प्रवेशद्वारावर कन्नड, मराठी आणि इंग्रजी या तिन्ही भाषांमध्ये असलेला फलक अचानक गायब झाला आहे. त्यामुळे सदर फलक महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी हटविला असल्याची चर्चा असून त्यावरील मराठी व इंग्रजी अक्षरे हटवून केवळ कन्नड भाषेतील फलक लावला जाणार असल्याची माहिती मिळाली आहे. राज्य सरकारने कन्नड भाषेलाच शासकीय कार्यालयांमध्ये अधिक प्राधान्य द्यावे, असा फतवा काढला आहे. यापूर्वीदेखील सरकारच्या आदेशाचे कारण सांगत शहरातील व्यापारी आस्थापनांबाहेर लावण्यात आलेले इंग्रजी व मराठी भाषेतील फलक बळजबरीने काढण्यात आले आहेत.
सदर फलकांवर 60 टक्के कन्नड तर उर्वरित 40 टक्के जागेत इतर भाषेतील अक्षरे लिहिण्यात यावीत, असे सांगितले जात होते. यानंतर आता सरकारच्या मुख्य सचिव शालिनी रजनीश यांनी चार दिवसांपूर्वी कन्नडसक्ती संदर्भात आणखी एक आदेश जारी केला आहे. सरकारी कार्यालयातील इतर भाषेत असलेले फलक हटवून केवळ कन्नड भाषेतील फलक लावण्यात यावेत, शासकीय कामकाज कन्नड भाषेतूनच केले जावे, पत्रव्यवहार व इतर कामकाज करताना कन्नड भाषेलाच प्रथम प्राधान्य दिले पाहिजे, असे आदेशात म्हटले असल्याने तातडीने सदर आदेशाची अंमलबजावणी करण्याची सूचना मनपा अधिकाऱ्यांनी केली आहे. आदेश मिळालेल्या दुसऱ्या दिवशीपासूनच विविध कक्षाबाहेरील इंग्रजी व मराठी भाषेतील फलकांवर पांढरे कागद चिकटविण्यात आले आहेत. केवळ कन्नड भाषेतील फलक ठेवण्यात आले आहेत.
एवढ्यापुरतेच मर्यादित न राहता महापालिकेच्या मुख्य प्रवेशद्वारावर कन्नड, मराठी आणि इंग्रजी भाषेत असलेला फलकदेखील गायब झाल्याचे दिसून येत आहे. सदर फलक जाणीवपूर्वक काढण्यात आल्याचे बोलले जात असून त्यावरील मराठी व इंग्रजी अक्षरे काढून केवळ कन्नड भाषेतील फलक लावला जाणार असल्याची माहिती मिळाली आहे. बेळगाव महानगरपालिका ही शहराचा मानबिंदू आहे. बेळगाव शहर आणि तालुक्यात मराठी भाषिकांची संख्या लक्षणीय आहे. तसेच सध्या कार्यरत असलेले महापौर व बहुतांश नगरसेवक मराठी भाषिक आहेत. असे असताना मराठीची गळचेपी महानगरपालिकेत होत असतानाही लोकप्रतिनिधी गप्प का? त्यांच्याकडून याबाबत आवाज उठविण्यात येणार आहे की नाही? असा सवाल बेळगावकरांतून उपस्थित केला जात आहे. म. ए. समितीचे नगरसेवक रवी साळुंखे व इतर नगरसेवक मराठीसाठी येत्या सर्वसाधारण बैठकीत आवाज उठविणार आहेत.