यमकनमर्डी मतदारसंघाचा शैक्षणिक क्षेत्रात लक्षणीय विकास
खासदार प्रियांका जारकीहोळी : विविध विकासकामांची सुरुवात : मतदार संघातील विकासकामांसाठी 18 कोटी निधी मंजूर
बेळगाव : मंत्री सतीश जारकीहोळी यांनी शिक्षण क्षेत्राला प्राधान्य दिल्यामुळे यमकनमर्डी मतदारसंघाचा शैक्षणिक क्षेत्रात लक्षणीय विकास झाला असल्याचे मत खासदार प्रियांका जारकीहोळी यांनी व्यक्त केले. यमकनमर्डी मतदारसंघातील कडोली जिल्हा पंचायत कार्यक्षेत्रात सुमारे 18 कोटी खर्चाच्या विविध विकासकामांची सुरुवात खासदार प्रियांका जारकीहोळी यांच्या हस्ते शुक्रवारी (दि. 31) झाली. याप्रसंगी त्या बोलत होत्या.
यमकनमर्डी मतदारसंघातील शाळा-महाविद्यालयांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. सार्वजनिक बांधकाम खात्याकडून सर्वाधिक अनुदान उपलब्ध करून देऊन नूतन शाळा इमारती बांधण्यात येत आहेत. विद्यार्थ्यांतील सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी मागील 20 वर्षांपासून सतीश अवॉर्डस्, सतीश प्रतिभा पुरस्कार कार्यक्रम आयोजित करण्यात येत असतात. यामध्ये प्रत्येक विद्यार्थ्यांने सहभाग होऊन आपल्या गुणांना वाव द्यावा, असेही खासदार जारकीहोळी म्हणाल्या.
यमकनमर्डी मतदारसंघ आदर्श बनविण्याचा ध्यास
प्रदेश काँग्रेस समितीचे सदस्य व मंत्री जारकीहोळी यांचे स्वीय सचिव मलगौडा पाटील म्हणाले, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण उपलब्ध व्हावे या उद्देशाने शाळा, इमारतींच्या विकासाला मंत्री जारकीहोळी यांनी प्राधान्य दिले आहे. सरकारच्या प्रमुख योजना आपल्या मतदारसंघातील जनतेला उपलब्ध करून देऊन यमकनमर्डी मतदारसंघ आदर्श बनविण्याचा ध्यास त्यांनी घेतला आहे.
दरम्यान, यमकनमर्डी विधानसभा मतदारसंघातील बोडकेनट्टी, म्हाळेनट्टी, चलवेनहट्टी, अगसगे, कडोली, गुंजेनहट्टी या गावांमध्ये 18 कोटी खर्चातून विविध कामांचा प्रारंभ खासदार जारकोळी यांनी केला. अगसगे येथील शाळा इमारतीच्या विकासाचा प्रारंभही त्यांनी केला. यावेळी हंदिगनूर ग्रा. पं. अध्यक्ष उज्ज्वला सुतार, दयानंद बसरर्गी, ग्रा. पं. सदस्य माधुरी पाटील, पुंडलिक पाटील, अनिता चौगुले, सुनीता नायक, अगसगा ग्रा. पं. अध्यक्ष अमृत मुद्देण्णवर, शोभा कुरेण्णवर आदी यावेळी उपस्थित होते.