मलेरियाच्या प्रकरणांमध्ये लक्षणीय घट : आरोग्यमंत्री
पणजी : राज्य आरोग्य खाते मलेरियाचे संपूर्ण उच्चाटन करण्यासाठी सक्रियपणे काम करत आहे. मलेरियाची प्रकरणे शोधून त्यांचे निराकरण करण्याचे प्रयत्न नेहमी सुरू आहेत. स्थानिक व्यक्तींमध्ये मलेरिया प्रकरणे नियंत्रणात असली तरी, स्थलांतरित कामगारांच्या गर्दीमुळे गोव्यात अजूनही आयातित मलेरियाच्या प्रकरणांची आव्हाने आहेत. गेल्या दहा वर्षांत मलेरिया प्रकरणांमध्ये लक्ष्यणीय घट झाली आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी दिली. आरोग्यमंत्री राणे यांनी सामाजिक माध्यमांवरून स्पष्ट केले की, आरोग्य संचालनालयाने विविध विभागांना स्वच्छतेसंबंधी सूचना केलेल्या आहेत. सार्वजनिक आरोग्य अधिनियमांतर्गत मजूरांना मलेरिया तसापणी सक्तीची करण्यात आली असून, त्यांच्याकडे आरोग्य कार्ड असणे बंधनकारक केले आहे.
2008 पासून रुग्णांत घट
गोव्याने मलेरिया निर्मूलनात लक्षणीय प्रगती केल्यामुळे राज्य मलेरियामुक्त होण्याच्या मार्गावर आहे. 2008 मध्ये राज्यात 9,822 रुग्ण आणि 21 मृत्यूंची नोंद झाली होती, परंतु त्यानंतर त्यात घट झाली आहे. 2023 मध्ये गोव्यात मलेरियाचे शून्य ऊग्ण आढळले होते. 2018 पासून एकही मलेरियापासून मृत्यू झाला नाही. राज्याच्या आरोग्यविभागाने 2025-26 पर्यंत पूर्णपणे मलेरिया निर्मूलनाचे लक्ष्य ठेवले आहे. साउथ एशिया इंटरनॅशनल सेंटर ऑफ एक्सलन्स फॉर मलेरिया रिसर्चने गोवा राज्यातील मलेरियाच्या साथीच्या रोगांचा अभ्यास केला होता. या अभ्यासात गोव्यात मलेरियाच्या प्रसाराचे प्रदेश, तात्पुरते नमुने आणि अशा नमुन्यांचे कारण ठरणारे घटक तपासले होते.