व्हिएतनामसोबत 9 करारांवर स्वाक्षरी
पंतप्रधान मोदींची समकक्षांशी चर्चा : आर्मी सॉफ्टवेअर पार्कचे उद्घाटन
वृत्तसंस्था /नवी दिल्ली
व्हिएतनामचे पंतप्रधान फाम मिन्ह चिन्ह सध्या तीन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात त्यांनी विविध मुद्यांवर द्विपक्षीय चर्चा केल्या. भारतीय परराष्ट्रमंत्र्यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशीही चर्चा केली. पंतप्रधान मोदींसोबतच्या भेटीत त्यांनी एकूण 9 करारांवर स्वाक्षऱ्या केल्या. तसेच, दोन्ही देशांच्या पंतप्रधानांनी व्हिएतनाममधील आर्मी सॉफ्टवेअर पार्कचे उद्घाटन केले.
दोन्ही देशांनी संयुक्तपणे एक नवीन कृती योजना बनवली आहे. संरक्षण आणि सुरक्षा क्षेत्रात नवे पाऊल टाकले आहे. व्हिएतनाममधील चांग येथे आर्मी सॉफ्टवेअर पार्कचे उद्घाटन करण्यात आले. 300 दशलक्ष डॉलर्स व्रेडिट लाइनवर सहमती झाली असून व्हिएतनामची सागरी सुरक्षा सक्षम होणार असल्याचेही मोदींनी स्पष्ट केले. दोन्ही देशांनी हरित अर्थव्यवस्थेवर लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच कृषी आणि मत्स्यपालन क्षेत्रातील संशोधनाला चालना दिली जाईल, असेही चर्चेत ठरविण्यात आले.
मुक्त व्यापारावर परराष्ट्रमंत्र्यांशी चर्चा
व्हिएतनामचे पंतप्रधान फाम मिन्ह चिन्ह मंगळवारी भारतात दाखल झाले होते. भारतात पोहोचल्यावर परराष्ट्र राज्यमंत्री पवित्रा मार्गेरिटा यांनी विमानतळावर त्यांचे स्वागत केले होते. आपल्या तीन दिवशीय दौऱ्यादरम्यान त्यांनी राजघाट गाठून महात्मा गांधींना आदरांजली वाहिली. त्यानंतर त्यांनी परराष्ट्रमंत्री जयशंकर यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी भारत-व्हिएतनाम मुक्त व्यापारावर भर दिला.