यंदे खूट येथे सिग्नलची मागणी
वाहतूक कोंडीने वाहनचालक त्रस्त
प्रतिनिधी/ बेळगाव
यंदे खूट येथील सिग्नल मागील अनेक दिवसांपासून बंद आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी वाढत आहे. काही बेशिस्त वाहनचालकांमुळे अनेक अपघातही घडत आहेत. या सिग्नलवर वाहनांची संख्या अधिक असल्यामुळे लवकरात लवकर पुन्हा सिग्नल सुरू करावा, अशी मागणी वाहनचालकांतून केली जात आहे.
शहरातील एक महत्त्वाचा चौक असणारा यंदे खूट येथील सिग्नल काही दिवसांपूर्वी कोसळला होता. तेव्हापासून अद्याप याठिकाणी नवा सिग्नल बसविण्यात आला नाही. अनेकवेळा मागणी करूनदेखील सिग्नल बसविण्यात आला नाही. सध्या नवरात्रोत्सव असल्यामुळे शहरातील गर्दीत वाढ झाली आहे. कोकण, तसेच चंदगडमधून येणारे नागरिक यंदे खूट मार्गे शहरात येतात. त्यामुळे वाहतूक कोंडी दिवसेंदिवस वाढत आहे. धर्मवीर संभाजी चौकातून चन्नम्मा चौकाकडे जाणारी वाहने भरधाव जात असतात. सिग्नल नसल्यामुळे वाहनांची गती वाढली असून रहदारी पोलिसांची डोकेदुखी वाढली आहे.
सिग्नल नसल्यामुळे परिसरातील दुकानदारांनाही फटका बसत आहे. मोठा अपघात घडण्यापूर्वी याठिकाणी सिग्नल बसविण्याची मागणी वाहनचालकांतून केली जात आहे.