Karad : नवीन कवठे येथे कृष्णा नदीपात्रात मगरीचे दर्शन ; नागरिकांनी सावध राहण्याचे आवाहन
मगर वावरल्याने शेतकरी आणि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
मसूर : नवीन कवठे (ता. कराड) परिसरात कृष्णा नदीपात्रात मगर दिसल्याची घटना समोर आली आहे. त्यामुळे शेतकरी व नदीकाठावरील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
नदीवरील मोटरचे काम पाहण्यासाठी गेलेल्या अतुल चव्हाण यांनी त्यांच्या मोटरसमोरील नदीपात्रात मगर हालचाल करत असल्याचे दृश्य पाहिले. त्यांनी तातडीने मगर वावर करत असलेल्या घटनेचे मोबाईलमध्ये शूटींग केले व ही माहिती स्थानिक नागरिकांना दिली. यामुळे नदीपात्राकडे नेहमी मोटर चालू करण्यासाठी जाणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. कृष्णा नदीकाठावर शेती करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी ही घटना चिंताजनक असली तरी सावधगिरी बाळगण्याचे आवाहन जाणकारांनी केले आहे.
दरम्यान, गेल्या महिन्यात स्थानिक नागरिक बाबासो रामचंद्र माने यांनाही मगरीचे दर्शन घडले होते. त्यांनीही दूरवरून मोबाईलमध्ये शूटींग केले होते. तो व्हिडिओ व्हायरल झाला होता. या परिसरात मगर सातत्याने वावरत असल्याचा निष्कर्ष काढण्यात येत आहे. त्यामुळे वनविभागाने याकडे तातडीने लक्ष घालावे, अशी मागणी स्थानिकांमधून होत आहे.