सिद्धूची पत्नी काँग्रेसमधून निलंबित
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
माजी क्रीकेटपटू आणि काँग्रेसचे नेते नवज्योतसिंग सिद्धू यांच्या पत्नी तसेच काँग्रेसच्या पंजाब विधानसभेतील आमदार नवज्योत कौर सिद्धू यांना काँग्रेसने पक्षातून निलंबित केले आहे. ही माहिती काँग्रेसच्या पंजाब शाखेचे अध्यक्ष अमरिंदरसिंग राजा यांनी ‘एक्स’ या सोशल मिडिवरील पोस्टच्या माध्यमातून दिली.
‘जो नेता 500 कोटी रुपये देईल त्याला मुख्यमंत्री केले जाते,’ असे विधान नवज्योत कौर सिद्धू यांनी रविवारी केले होते. त्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. त्यांच्या विधानामुळे काँग्रेसची मोठीच कोंडी झाली आहे. पक्षात निर्णय कशा प्रकारे होतात आणि पदे कशाप्रकारे वाटली जातात, यासंबंधी प्रश्नचिन्ह निर्माण झाले. राजकीय वर्तुळात या विधानाचे तीव्र पडसाद उमटल्याने काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींनी त्यांच्या विरोधात कठोर कारवाई करण्याचा निर्णय घेतला. सध्या त्यांना पक्षातून निलंबित करण्यात आले असले, तरी काही काळानंतर त्यांची हकालपट्टी केली जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. नवज्योतसिंग सिद्धू यांनी या प्रकरणी सारवासारवी करण्याचा प्रयत्न रविवारी रात्री केला होता. तथापि, तो सफल झाला नाही. त्यांची सारवासारवी कारवाई टाळू शकली नाही, असे दिसून येत आहे.
नवज्योत कौर सिद्धू यांचे स्पष्टीकरण
आपण केलेल्या विधानाचा विपर्यास करुन आपल्यावर कारवाई करण्यात आली आहे, असा नवा आरोप नवज्यो कौर सिद्धू यांनी केला आहे. आमच्याकडून कधीच पक्षाने अशा प्रकारे पैशाची मागणी पेलेली नाही. काँग्रेसकडून अशा प्रकारे पैसा मागितला जातो, असे आपण कधीच म्हटलेले नाही. नवज्योतसिंग सिद्धू अन्य कोणत्या पक्षात जाऊन मुख्यमंत्रीपदाचा चेहरा बनणार आहेत काय, या पत्रकाराने विचारलेल्या प्रश्नाला मी ‘आमच्याकडे हे पद मिळविण्याइतके पैसे नाहीत’, असे उत्तर दिले होते. पक्षाच्या वरीष्ठ नेत्यांनी आपल्या विधानाचा चुकीचा अर्थ काढून ही करवाई केली आहे, असे नवे वक्तव्य नवज्योत कौर सिद्धू यांनी केले आहे.