Satara : सिद्धनाथ-जोगेश्वरीचा आज विवाह सोहळा!
म्हसवड नगरी सजली सिद्धनाथ–जोगेश्वरींच्या विवाहासाठी
म्हसवड : म्हसवड नगरीचे ग्रामदैवत श्री सिध्दनाथ व माता जोगेश्वरी यांच्या शाही विवाह सोहळ्याचा रुखवत सुरेश माने पाटील परिवाराकडुन सुवासिनींनी डोक्यावर विविध पदार्थ, हार, तुरे, पोषाख, साडी, हिरवा चुडा, आदी शुक्रवारी दुपारी ढोल ताशांच्या वाद्यांच्या निनादात बाजत गाजत मंदिरात आणण्यात आला.
दक्षिण काशी म्हणून प्रसिध्द असलेल्या लाखो भाविकांचे कुलदैवत, म्हसवड गावाचे ग्रामदैवत श्री सिध्दनाथ व माता जोगेश्वरी यांच्या संपूर्ण एक महिना चालणाऱ्या शाही विवाह सोहळ्याची धामधूम सध्या सुरु आहे. रबिबार दि. २ रोजी रात्री १२ वाजता श्रींचा विवाह सोहळा होणार आहे.
श्रींच्या या पारंपारिक पध्दतीचा शाही विवाह सोहळ्याची मंदिरात लगबग सुरु असून मंदिरास रंगरंगोटी स्वच्छता, लाईट सजावट, दिपमाळा आदी कामकाज सुरू असून या विवाह सोहळ्याच्या निमित्ताने दरवर्षी रुखवताचा मान पिढ्या पिढ्यांपासून येथील सुरेश रामचंद्र माने पाटील यांना असून श्रींच्या लग्नाआधी दोन दिवस हा रुखवत देण्याची प्रथा असते. तो शुक्रवारी दुपारी मंदिराचे सालकरी रामचंद्र गुरव यांच्याकडे रुखवत देण्यात आल्यानंतर तो रुखवत श्रींच्या चरणी ठेवण्यात आला.
या रुखवतामध्ये सुमारे १५ वेगवेगळे पदार्थ, श्रीचा पोषाख, माता जोगेश्वरी यांना साडी, सालकरी यांना संपूर्ण पोशाख, हार, मुंडबळ्या, हिरवा चुडा, आदी यांचा समावेश असतो. माने-पाटील यांच्या घरापासून शहरातील मुख्य पेठेतून बाजतगाजत माने-पाटील कुटूंबातील सुवासिनी आणिअनेक महिला श्री सिध्दनाथ मंदिरात घेऊन जातात. त्यानंतर मंदिरात सालकरी यांच्याकडे सुपूर्द करण्यात येतो. मंदिरातील गाभाऱ्यात श्रींच्या मूर्ती समोर ठेवण्यात येतो.
रविवारी २ रोजी तुलसी विवाह पहाटे साडेपाच वाजता श्रींची आरती झाल्यानंतर मंदिरातील गरुड खांबानजिक असलेल्या म्हातारबाबा यांच्या मूर्ती जवळ बसवलेले घट उठविले जातात. त्यांनंतर १२ दिवस उभे राहून नवरात्रीचे उपवास सोडले जातात. १२ दिवसाची अणवाणी पायाची रथ मार्गाची नगरप्रदक्षिणेचा शेवट होते आणि त्याच रात्री रविवारी १२ वाजता श्रींचा विवाह सोहळा हजारो नाथ भक्तांच्या उपस्थितीत सनई चौघड्यांच्या मधुर स्वरात, गजी नृत्याच्या तालाबर ओव्या गाऊन खेळ दाखवतात आणि फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये श्रींच्या जयघोषात सिध्दनाथ माता जोगेश्वरीचा विवाह संपन्न होणार आहे. या विवाहानंतरची 'वरात' म्हणजेच रथयात्रा २१ रोजी होणार आहे.