सिद्धीची राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड
वार्ताहर/कंग्राळी बुद्रुक
सार्वजनिक शिक्षण खात्याच्यावतीने बेंगळूर येथे झालेल्या राज्यस्थरीय शालेय कुस्ती स्पर्धेत कंग्राळी खुर्द गावची कन्या व मराठी विद्यानिकेतन शाळेची विद्यार्थिनी सिद्धी प्रशांत निलजकरने 54 किलो वजनी गटात सुवर्णपदक मिळवून बेळगावसह कंग्राळी खुर्दचे नाव उज्ज्वल केले आहे. तिची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. बेंगळूर (रामनगर) येथे झालेल्या महिला कुस्ती स्पर्धेत सिद्धीने 54 किलो वजनी गटात साखळीत निर्विवाद वर्चस्वासह 3 कुस्त्या जिंकून उत्तर कन्नडा जिल्ह्dयाची मार्शलीन एस. एस. हिच्याशी अंतिम लढत झाली. अंतिम लढतीतही तिने नेत्रदीपक विजय मिळवून विजेतेपदासह सुवर्ण पदक पटकाविले.
आता ती दिल्ली येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी पात्र ठरली आहे. सिद्धी निलजकरचे सोमवारी संध्याकाळी बेळगाव रेल्वे स्थानावर आगमन झाले. यावेळी तिची आई अनिता व इतर महिलांनी तिचे स्वागत केले. गावातही तिचा ग्रामस्थांच्यावतीने व ग्राम पंचायत अध्यक्ष कल्लाप्पा पाटील व माजी ग्रा. प. अध्यक्ष यल्लाप्पा पाटील, अन्य ग्राम पंचायत सदस्य व कुस्तीप्रेमी नागरिकांच्यावतीने शाल, श्रीफळ व पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला. सिद्धी बेळगाव येथील स्पोर्टस् हॉस्टेलमध्ये कुस्तीचा सराव करत असून तिला एकलव्य पुरस्कार विजेत्या कुस्ती प्रशिक्षिका स्मिता पाटील व डबल कर्नाटक केसरी कृष्णा पाटील यांचे मार्गदर्शन लाभत आहे.