सिद्धेश घोरपडेला सुवर्ण, आकांक्षा म्हेत्रेचा दुहेरी धमाका
खेलो इंडिया युवा स्पर्धा, बिहार 2025 : मल्लखांबमध्येही महाराष्ट्राची बाजी
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली, गया
सिद्धेश घोरपडेने 7 वी खेलो इंडिया युवा स्पर्धेतील सायकलिंकच्या स्क्रॅचरेस प्रकारात महाराष्ट्राला सुवर्णपदक जिंकून देत मंगळवारचा दिवस गाजविला. मुलींच्या गटात मराठमोळ्या आकांक्षा म्हेत्रे हिने मेडल टाईम ट्रायल प्रकारात रौप्य, तर स्क्रॅचरेस प्रकारात कांस्यपदकाची कमाई करीत दुहेरी धमाका केला.
राजधानी नवी दिल्लीतील यमुना वेलोड्रम इंदिरा गांधी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये मुलांच्या 10 किलो मीटर स्क्रॅचरेसमध्ये अतिशय चुरशीचा खेळ बघायला मिळाला. महराष्ट्राच्या सिद्धेश घोरपडेला महावीर सारन व सिताराम बेनिवले या राजस्थानी सायकलपटूंकडून कडवी लढत मिळाली. मात्र, अखेरच्या काही मीटरमध्ये सिद्धेशने जिवाचे रान करीत 13 मिनिटे 26.584 सेंकद वेळेसह सुवर्णपदकावर आपले नाव कोरले. महावीर सारनला 13 मिनिटे 26.601 सेंकद वेळेसह रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. फिनिशिंग लाईनला सिद्धेशने बाजी मारली. सितारामने 13 मिनिटे 27.933 सेंकद वेळेसह कांस्यपदक जिंकले. सिद्धेश घोरपडे हा पुण्याच्या क्रीडा प्रबोधिनीचा खेळाडू आहे.
आकांक्षा म्हेत्रेला रौप्य अन् कांस्य
मुलींच्या 7.5 किलो मीटरच्या स्क्रॅचरेस प्रकारात आकांक्षा म्हेत्रेला आपला राज्य सहकारी सिद्धेश घोरपडेच्या सोनेरी यशाची पुनरावृत्ती करता आली नाही. महाराष्ट्राच्या या सायकलपटूला (11 मिनिटे 51.649 से) एका सेंकदाच्या फरकामुळे कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. यावरून ही शर्यत किती अटीतटीची झाली असेल, याचा सहज अंदाज येतो. राजस्थानच्या हर्षिता जाखरने 11 मिनिटे 50.973 सेंकद वेळेसह सुवर्णपदक, तर यजमान बिहारच्या सुहानी कुमारी हिने 11 मिनिटे 51.558 सेंकद वेळेसह रौप्यपदकाला गवसणी घातली.
महाराष्ट्राच्या आकांक्षा म्हेत्रे हिला सायकलिंगच्या मेडल टाईम ट्रायल (केटीटी) प्रकारातही सुवर्णपदकाने हुलकावणी दिली. तिने 38.742 सेंकद वेळेसह रौप्यपदकाला गवसणी घातली. राजस्थानच्या हर्षिता जाखर हिने 38.631 सेंकद वेळेसह सुवर्णपदक जिंकले, तर तमिळनाडूची एस. थाबिथा 39.454 सेंकद वेळेसह कांस्यपदकाची मानकरी ठरली. महाराष्ट्राला सायकलिंगमध्ये दोन पदके जिंकून देणारी आकांक्षा म्हेत्रे मूळची जळगावची आहे. मात्र, ती पुण्यात दर्शन बारगुजे यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करत असते.
मल्लखांबमध्ये महाराष्ट्राला सलग सातव्यांदा पदक
मुलांच्या मल्लखांब सांघिक गटात सर्वच संघांनी एकाचढ एक रचना सादर करून 7 व्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत उपस्थित प्रेक्षकांना अचंबित केले. अतिशय चूरशीच्या या स्पर्धेत महाराष्ट्राच्या संघाने रौप्यपदक खेचून आणले. या स्पर्धेत मल्लाखांबमध्ये महाराष्ट्राला सांघिक गटात सलग सातव्या वर्षी पदक जिंकण्याचा करिश्मा घडविला आहे.
गया शहरातील आयआयएम संस्थेच्या सभागृहात सुरू असलेल्या सांघिक मल्लखांब प्रकारात महाराष्ट्राने केवळ पाईंट 45 गुणांनी छत्तिसगड संघाला मागे टाकत 122.50 गुणांची कामगिरी करीत रूपेरी यश मिळविले. आयुष काळंगे, निशांत लोखंडे, ओम गाढवे, निरंजन अमृते, आर्यन आबोडकर व प्रज्ञेश तावडे यांच्या संघाने सांघिक मल्लखांबच्या तिन्ही प्रकारात चमकदार खेळाचे प्रदर्शन घडवत महाराष्ट्राला हे रौप्यपदक जिंकून दिले. मध्यप्रदेश संघाने 123.60 गुणांची कमाई करीत सुवर्णपदक, तर छत्तीसगड संघाने 122.05 गुण संपादून कांस्यपदक कमवले.
मुलींच्या सांघिक गटातही लक्षवेधी कामगिरी करीत महाराष्ट्राने पदकाकडे वाटचाल सुरू केली आहे. तनश्री जाधव, आर्या साळुंके, सई शिंदे, तन्वी दवणे, हदया दळवी व हिरण्या कदमने दोरीवरच्या मल्लखांबात आकर्षक आणि थरारक प्रात्यक्षिके सादर करीत आघाडी कायम राखली आहे.