सिध्दनाथ जोगेश्वरी रथोत्सव उत्साहात
म्हसवड :
‘सिध्दनाथाच्या नावानं चांगभल’ ‘चांगभलं चांगभलं नाथांच्या घोड्याचं चांगभलं’ ‘सिंदूबाच्या नावानं चांगभलं’ ‘नाथाच्या हत्तीचं चांगभलं’चा जयघोष, गुलाल खोबऱ्याची उधळणीत आणि ढोलाचा निनाद करत सुमारे लाखो भाविकांच्या उपस्थितीत म्हसवडच्या सिद्धनाथाचा रथोत्सव उत्साहात साजरा झाला. दुपारी 3 वाजता मंदिरातून वाजतगाजत पालखीतून श्रींची उत्सव मूर्ती सालकरी महेश गुरव, मानकरी राजेमाने परिवार, माण खटावचे अधिकारी, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत मूर्ती यात्रा पटांगणावर नगरप्रदक्षिणेसाठी रंगीबेरंगी निशाने, नारळाची तोरणे, पेढ्यांसाठी तोरणांनी सजलेल्या रथामध्ये उत्सव मूर्ती ठेवताच एकच श्रींचा गजर होताच उपस्थित भक्त रथावर गुलाल खोबऱ्याची उधळण झाली. अन् मानकरी मंडळीनी रथ ओढत प्रदक्षिणेस सुरवात दुपारी 3 वाजून 15 मिनिटांनी करण्यात आली.
तत्पूर्वी दुपारी बारा वाजता राजेमाने परिवाराचा नैवेद्य मंदिरात नेण्यात आला त्यानंतर दुपारी 1 वाजता श्रीमंत अजितराव राजेमाने, गणपतराव राजेमाने, प्रतापसिंह राजेमाने, पृथ्वीराज राजेमाने, सयाजीराव राजेमाने या रथाचे मानकरी परिवाराकडुन रथोत्सवास आलेल्या राष्ट्रवादीचे नेते प्रभाकर देशमुख, प्रांताधिकारी उज्वला गाडेकर, पोलीस उपअधिकारी अश्विनी शेंडगे, तहसीलदार सचिन अहिर, खटावच्या तहसीलदार बाई माने, दहिवडी पोलीस स्टेशनचे सपोनि अक्षय सोनवणे, म्हसवडचे सखाराम बिराजदार, माणचे नायब तहसीलदार शेंडे, पुरवठा अधिकारी राहुल जाधव, गजानन कुलकर्णी, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते युवराज सुर्यवंशी, म्हसवडचे सर्कल उत्तमराव आखडमल, कर्णे, खेताडे, म्हसवड ग्राम महसूल अधिकारी मालोजी भोसले, विरकरवाडीचे ग्राम महसूल अधिकारी गुलाबराव उगलमोगले, तालुका काँग्रेसचे बाबासाहेब माने, राजेंद्र माने, एन. डी. मासाळ, राजू पिसे सोमा केले, शिवाजी केवटे, प्रविण भोसले, कांता ढाले, बाळासाहेब माने, किशोर सोनवणे आदींचा सत्कार करण्यात आले. माणगंगेला पाणी असल्याने यावर्षी रथ नदी पात्रातून न जाता मंदिराच्या पाठीमागील रस्त्याने बायपासने ओढत नेहण्यात आला.
यावर्षी पाऊस पाणी सर्वत्र झाल्याने यात्रा मोठ्या प्रमाणात भरणार यासाठी प्रशासनाच्या वतीने तगडी व्यवस्था करण्यात आली होती तर पोलिस विभागाने हि तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. यात्रा पटांगणावर मोठ्या प्रमाणात व्यावसायिक, व्यापारी, मिठाई दुकान, गुलाल खोबरे, कटलरी, मनोरंजक खेळणी, हॉटेल, हळद कुंकू, खाण्याची दुकाने, आकाश पाळणा, ब्रेक डान्स, मिकी माऊ, झिक जॅक आदी खेळणी यात्रेची आकर्षण ठरत होती. श्रींच्या रथावर भाविकांनी उधळण केलेल्या गुलाल-खोबऱ्याने संपुर्ण यात्रा परिसर गुलालमय होऊन गेला. महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र, मध्यप्रदेश राज्यामधील लाखो भाविकांचे कुलदैवत असलेले म्हसवड येथील श्री सिध्दनाथ व माता जोगेश्वरीचं मंदीर माण नदीच्या काठावर आहे.
दीपावली पाडव्यापासून एक महिनाभर सुरु असलेला हा आगळावेगळा पारंपारिक शाही विवाह सोहळ्याची सांगता रथोत्सवाने सोमवारी झाली. या सोहळ्यास चार ते साडे पाच लाख भाविकांची उपस्थिती लावली होती. रथ बायपास मार्गाने डांबरी रोडने ओडढत नेहमी जात होता रथ विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या चौकात आल्यावर बुलढाणा बॅके तर्फे सर्वाना चहा व बिस्किटे वाटप केली. सांयकाळी 5 वाजता रथ पालिकेच्या समोर आल्यानंतर पालिका प्रशासनाच्या वतीने प्रशासक डॉ. सचिन माने यांनी फुलाचा रथावर वर्षाव करून स्वागत केले. यावेळी आमदार जयकुमार गोरे यांनीही रथावर जाऊन सिद्धनाथ जोगेश्वरी यांचे दर्शन घेतले. मानकरी राजेमाने यांनी आ. गोरे यांचे स्वागत करत सत्कार केला. यानंतर रथ सांयकाळी सहा वाजता रथ बसस्थानकासमोर आला. रात्री साडे आठ वाजता देवी वडजाई हिला श्री सिध्दनाथ जोगेश्वरी देवीच्या वतीने साडी चोळी अर्पण करून नवसाची मुले रथावर झेलण्याची नवस अनेकांनी फेडले. लक्ष्मी देवी मंदिर परिसरात रात्री 10 वाजता रथ आला. त्यानंतर मरीमाता देवीला साडी चोळीची भेट देवून रथ पुन्हा यात्रा पटांगण येथे रात्री साडे आकरा वाजता नेहण्यात आला.
तरुण भारतच्या विशेषांकांचे प्रकाशन
‘तरुण भारत’ने सिध्दनाथ जोगेश्वरी यांच्या रथोत्सवानिमित्ताने दरवर्षीप्रमाणे विशेष पुरवणी काढली. सर्वांगसुंदर असणाऱ्या विशेषांकाचे प्रकाशन मानकरी श्रीमंत अजितराव राजेमाने, श्रीमंत गणपतराव आबासाहेब राजेमाने, श्रीमंत शिवराज आबासाहेब राजेमाने, श्रीमंत प्रतापसिंह राजेमाने, पृथ्वीराज राजेमाने, श्रीमंत सयाजीराजे राजेमाने, बाबासाहेब माने, बाळासाहेब माने, तहसीलदार सचिन अहिर, बाई माने, मुख्याधिकारी सचिन माने, सोमनाथ केवटे, शिवाजी केवटे, तरुण भारत प्रतिनिधी एल. के. सरतापे आदी उपस्थित होते.