सिद्धरामय्यांची आता भोजनावळ बैठक
काँग्रेसचे मुख्य सचिव के. सी. वेणुगोपाल यांच्याशी चर्चा : राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चा
बेंगळूर :
राज्यातील सत्ताधारी काँग्रेसमध्ये मुख्यमंत्रिपद हस्तांतरावरून निर्माण झालेला गोंधळ दूर झाला आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या व उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी एकमेकांच्या निवासस्थानी ब्रेक फास्ट मिटींग घेऊन आपल्यात मतभेद नसल्याचे सांगितले होते. ब्रेक फास्ट मिटींगनंतर आता भोजनावळीला ऊत येण्याची शक्यता नाकारता येत नाही. बुधवारी एका कार्यक्रमासाठी सिद्धरामय्या मंगळूरला आले होते. तेथील अतिथीगृहात त्यांनी काँग्रेसचे मुख्य सचिव के. सी. वेणुगोपाल यांची भेट घेऊन चर्चा केली आहे. सिद्धरामय्या मंगळूरला असताना इकडे डी. के. शिवकुमार दिल्लीला गेल्याने राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा रंगली आहे.
मागील आठवड्यात मुख्यमंत्री सिद्धरामय्या व उपमुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्यात ब्रेक फास्टच्या निमित्ताने दोन वेळा बैठका झाल्या. आता मंगळूरमध्ये भोजनाच्या निमित्ताने बैठक झाली आहे. मंगळूरमधील ‘कावेरी’ अतिथीगृहात 12 आसनांची व्यवस्था करण्यात आली. मुख्यमंत्री व वरिष्ठ काँग्रेस नेते वेणुगोपाल यांच्यासोबत काही मंत्रीही बैठकीत सामील झाले होते. सिद्धरामय्या व शिवकुमार यांच्यात मागील दोन बैठकांमध्ये झालेल्या चर्चेची माहिती यावेळी वेणुगोपाल यांनी घेतल्याचे सूत्रांकडून समजते.
मुख्यमंत्री बदल, मंत्रिमंडळ पुनर्रचनेसंदर्भात राज्य काँग्रेसमधील नेत्यांनी उघडपणे भाष्य केल्याने गोंधळ निर्माण झाला होता. पक्षहित आणि सरकारच्या प्रतिमेला धक्का बसू नये यासाठी काँग्रेस हायकमांडने हस्तक्षेप केला. सिद्धरामय्या व शिवकुमार यांना एकत्र बसून चर्चेद्वारे गोंधळ दूर करण्याची सूचना दिली होती. त्यानुसार दोन्ही नेत्यांनी परस्परांशी चर्चा करून आमच्यात मतभेद नाहीत, आम्ही एकत्र काम करत असल्याचा संदेश रवाना केला होता. याच मुद्द्यावर सिद्धरामय्यांनी वेणुगोपाल यांच्याशी चर्चा करून मुख्यमंत्रिपदाच्या अधिकार हस्तांतराचा गोंधळ दूर करावा, अशी विनंती केली होती.
पक्षातील गोंधळ निवळला!
ब्रेक फास्ट मिटींगमध्ये सिद्धरामय्या व डी. के. शिवकुमार यांच्यात काय चर्चा झाली हे मला ठाऊक नाही. मात्र, पक्षातील गोंधळ निवळला आहे. आमच्यात कोणताही गोंधळ नाही. तथापि, अनावश्यक गोंधळ निर्माण झाला होता, त्याला प्रसारमाध्यमांनी हातभार लावला. आता सर्वकाही ठिकठाक आहे.
- डॉ. जी. परमेश्वर, गृहमंत्री
सिद्धरामय्या-शिवकुमारांच्या समर्थकांकडून घोषणाबाजी
मंगळूरमधील शिवगिरी मठ आणि मंगळूर विद्यापीठाच्या नारायणगुरु अध्ययन केंद्राने आयोजिलेल्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री सिद्धरामय्या, काँग्रेसचे वरिष्ठ नेते के. सी. वेणुगोपाल, ज्येष्ठ नेते बी. के. हरिप्रसाद, मंत्री डॉ. जी. परमेश्वर, दिनेश गुंडूराव, सतीश जारकीहोळी, लक्ष्मी हेब्बाळकर उपस्थित होते. कार्यक्रमासाठी विमानतळावर आलेल्या वेणुगोपाल यांच्या स्वागतावेळी जमलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी “डीके...डीके...” अशी घोषणाबाजी सुरू केली. तर काहींनी सिद्धरामय्यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केली. दोन्ही नेत्यांनी यापूर्वीच आमच्यात मतभेद नसल्याचे स्पष्ट केले होते. तरी सुद्धा त्यांच्या समर्थकांनी आपल्या नेत्याच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केल्यामुळे गोंधळ निर्माण झाला.
पक्षातील गोंधळ निवळला!
एआयसीसीचे सचिव के. सी. वेणुगोपाल यांच्याशी राजकीय मुद्द्यांवर चर्चा झालेली नाही. शिवकुमार यांना दिल्लीला जाण्यास नको म्हटलेले नाही. पक्षश्रेष्ठींनी मला दिल्लीला बोलावले तरच मी दिल्लीला जाईन.
- सिद्धरामय्या, मुख्यमंत्री
सत्ता कायमस्वरुपी नसते; कधीतरी सोडावीच लागेल!
मुख्यमंत्री बदलावरून निर्माण झालेला गोंधळ तात्पुरता दूर झालेला असतानाच बुधवारी मंत्री सतीश जारकीहोळी यांनी केलेले वक्तव्य राजकीय वर्तुळात तीव्र चर्चेचा विषय बनला आहे. यापूर्वी सिद्धरामय्या यांनी केलेल्या वक्तव्याचे समर्थन करताना मंत्री जारकीहोळी यांनी, सत्ता कायमस्वरुपी नसते. ती कधीतरी सोडलीच पाहिजे. 10 वर्षांनंतर तरी सत्ता सोडली पाहिजे. पण केव्हा हे हायकमांड ठरवेल, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.