‘डीकें’ना दिल्ली पोलिसांची नोटीस
19 डिसेंबरपूर्वी चौकशीसाठी दिल्ली पोलिसांसमोर हजर राहण्याची सूचना
प्रतिनिधी/ बेंगळूर
नॅशनल हेराल्ड प्रकरणी नवी दिल्ली पोलिसांनी उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांना नोटीस बजावली आहे. नॅशनल हेराल्ड प्रकरणाची चौकशी करणाऱ्या दिल्ली पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने (ईओडब्ल्यू) शुक्रवारी डी. के. शिवकुमार यांना नोटीस बजावून तपशीलवार आर्थिक आणि व्यवहारांची माहिती मागितली आहे.
नॅशनल हेराल्ड प्रकरणी 3 ऑक्टोबर रोजी काँग्रेस नेत्या सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्याविरुद्ध प्रकरण दाखल झाले होते. या प्रकरणासंबंधी महत्त्वाची माहिती शिवकुमार यांना असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे शिवकुमार यांना या संदर्भात 29 नोव्हेंबर रोजी नोटीस जारी करण्यात आली आहे. 19 डिसेंबरपर्यंत त्यांना तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्यास किंवा मागितलेली कागदपत्रे सादर करण्यास सांगण्यात आले आहे, असे समजते.
दिल्ली पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने शिवकुमार यांची वैयक्तिक आणि राजकीय पार्श्वभूमी, काँग्रेसशी असलेले त्यांचे संबंध, त्यांनी हस्तांतरित केलेल्या कथित पैशाची संपूर्ण माहिती किंवा यंग इंडियाशी असलेले संबंध यांची माहिती मागितली आहे.
या पैशांच्या हस्तांतरणाचा उद्देश आणि स्रोत, यंग इंडिया किंवा एआयसीसी अधिकाऱ्यांशी या संदर्भात काही चर्चा झाली का? किंवा इतरांच्या सूचनेनुसार पैसे पाठवले गेले का, याचीही माहिती तपास अधिकाऱ्यांनी मागितली आहे. प्राप्तिकर, आर्थिक विवरणपत्रे आणि व्यवहारांशी संबंधित देणगी प्रमाणपत्रे देखील मागितली आहेत.
शिवकुमार यांचे बंधू माजी खासदार डी. के. सुरेश यांनाही दिल्ली पोलिसांनी नोटीस बजावली असून किती रक्कम दिली, कोणत्या कारणासाठी त्याचा वापर झाला, पैसे कसे दिले, अशी विचारणा करण्यात आली आहे.
राजकीयदृष्ट्या प्रेरित
उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्या निकटवर्तीयांनी नोटीस राजकीयदृष्ट्या प्रेरित आहे. भाजपशी हातमिळवणी न केल्याने शिवकुमार यांना लक्ष्य केले जात आहे असा आरोप केला आहे. शिवकुमार हे अत्यंत दडपणाचा सामना करणाऱ्यांपैकी एक आहेत. तरी सुद्धा त्यांना स्वत:च्या नियंत्रणाखाली आणण्यात भाजप यशस्वी ठरलेले नाहीत, अशी टिकाही त्यांच्या समर्थकांनी केली आहे.