मुडा प्रकरणी सिद्धरामय्यांची ईडीकडूनही होणार चौकशी
प्रतिनिधी/ बेंगळूर
म्हैसूर नगरविकास प्राधिकरणाशी (मुडा) संबंधीत मनी लाँन्ड्रिंग प्रकरणी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्यासमोर आणखी एक संकट उभे राहिले आहे. सिद्धरामय्या आणि इतर आरोपींविरुद्ध अंमलबजावणी संचालनालयाच्या अधिकाऱ्यांनी गुन्हा (ईसीआयआर) दाखल केला आहे. त्यामुळे सिद्धरामय्या यांची आता ईडीकडून चौकशी होण्याची शक्यता आहे.
मुडा प्रकरणात न्यायालयाच्या आदेशानुसार लोकायुक्त पोलिसांनी 27 सप्टेंबर रोजी मुख्यमंत्री आणि इतरांविरुद्ध एफआयआर दाखल केला आहे. म्हैसूरमधील स्नेहमयी कृष्ण यांनी मुडा प्रकरणाची ईडीकडून चौकशी व्हावी, अशी मागणी केली होती. त्यानुसार ईडीने ईसीआयआर दाखल केला आहे. त्यामुळे सिद्धरामय्या यांच्या मागे आता लोकायुक्त बरोबरच ईडीच्या चौकशीचाही ससेमिरा लागणार आहे.
मागील आठवड्यात सिद्धरामय्या, त्यांची पत्नी पार्वती बी. एम., मेहुणे मल्लिकार्जुन स्वामी आणि जमीन व्यवहारातील मध्यस्थ देवराजू यांच्याविरुद्ध म्हैसूर लोकायुक्त पोलिसांत एफआयआर दाखल झाला होता. आता तक्रारदार स्नेहमयी कृष्ण यांच्या तक्रारीच्या आधारे ईडीने मुडा गैरव्यवहारासंबंधी सिद्धरामय्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. शिवाय मनी लाँन्ड्रिंग प्रतिबंधक कायदा (पीएमएलए) सेक्शनअंतर्गत खटला दाखल करण्याची शक्यता आहे.
दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अबकारी धोरण प्रकरणात कारावासात जावे लागले होते. आता कर्नाटकाचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या बाबतीत असा प्रकार घडल्यास ते राजीनामा देण्याऐवजी कारागृहातूनच कारभार पाहतील का?, असे प्रश्न उपस्थित केले जात आहे.
एकीकडे भाजप नेते सिद्धरामय्यांवर मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देण्यासाठी अबाव आणत आहेत. मात्र, सिद्धरामय्या यांनी मी चूक केलेली नाही, त्यामुळे राजीनाम्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असे सांगत आहेत. मात्र, लोकायुक्तनंतर ईडीकडून गुन्हा नोंदविण्यात आला आल्याने त्यांच्यावरील संकट आणखी गडद झाले आहेत.
सीबीआय चौकशीची मागणी
मुख्यमंत्र्यांच्या अडचणीत दिवसेंदिवस भर पडत चालली आहे. लोकायुक्तनंतर ईडीने त्यांच्यावर गुन्हा दाखल केल्यानंतर आता सीबीआय चौकशीची मागणीही होत आहे. लोकायुक्त विभाग राज्य सरकारच्या अंतर्गत येत असल्याने त्यांच्याकडून नि:पक्षपातीपणे चौकशी होईल, यावर मला विश्वास नाही, असे तक्रारदार स्नेहमयी कृष्ण यांनी केली होती. मुडा प्रकरण सीबीआयकडे सोपवावे, अशी याचिका त्यांनी दाखल केली आहे. त्यावर दसऱ्यानंतर सुनावणी होण्याची शक्यता आहे.