कार-कंटेनर अपघातात सहाजण जखमी
रामनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घटना : दोघे गंभीर
कारवार : गोव्याहून हल्याळकडे नेत असलेल्या इनोव्हा कारला कंटेनरने जोराची धडक दिल्याने इनोव्हा कारमधील सहाजण जखमी झाल्याची घटना रामनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. जखमीपैकी दोघे गंभीर जखमी झाले आहेत. तर अन्य चारजण किरकोळ जखमी झाले आहेत. हल्याळ पोलीस ठाण्याचे हेड कॉन्स्टेबल एम. एम. मुल्ला, होमगार्ड रवी मीरजकर हे गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी धारवाड येथील एसडीएम रुग्णालयात दाखल केले आहे. अपघातात हल्याळ पोलीस ठाण्यातील क्राईम ब्रँचचे पीएसआय अमीन अख्तर, कॉन्स्टेबल इस्माईल कोटनकेरी, एक आरोपी व वाहनचालक किरकोळ जखमी झाले आहेत. सर्वांना उपचारासाठी हल्याळ येथील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. एका प्रकरणी आरोपींना गोव्याहून हल्याळकडे इनोव्हा कारमधून नेत असताना विरूद्ध दिशेने अतिवेगाने आणि चुकीच्या साईडने येणाऱ्या कंटेनरने इनोव्हाला जोराची धडक दिल्याने हा अपघात घडल्याचे सांगण्यात आले. कंटेनर व चालकाला रामनगर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या अपघातात इनोव्हा कारचा चेंदामेदा झाला आहे. रामनगर पोलीस अधिक तपास करीत आहेत.