घटप्रभा साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी सिद्धलिंगप्पा कंबळी बिनविरोध
उपाध्यक्षपदी मल्लिकार्जुन कब्बूर यांची निवड : कारखान्यातर्फे अध्यक्ष-उपाध्यक्षांचा सत्कार
बेळगाव : घटप्रभा सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी जोकानट्टी गावातील सिद्धलिंगप्पा सिद्धप्पा कंबळी तर उपाध्यक्षपदी रंगापूर येथील मल्लिकार्जुन भिमप्पा कब्बूर यांची बिनविरोध निवड झाली आहे. शनिवारी घटप्रभा साखर कारखान्याच्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत एकेक अर्ज दाखल झाला होता. त्यामुळे दोन्ही पदांची निवडणूक बिनविरोध झाली. सोमवारी गोकाक सहकार विकास अधिकारी एस. बी. बिरादार यांनी याबाबत अधिकृत घोषणा केली. आतापर्यंत कारखान्यावर अध्यक्ष असलेले अशोक पाटील व उपाध्यक्ष रामण्णा महारेड्डी यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या दोन्ही पदांसाठी निवडणूक घेण्यात आली. बिनविरोध निवडून आलेल्या सिद्धलिंगप्पा कंबळी आणि मल्लिकार्जुन कब्बूर यांचा कार्यकाळ 2028 पर्यंत असेल.
आमदार भालचंद्र जारकीहोळी व त्यांच्या भावंडांच्या मार्गदर्शनाखाली साखर कारखान्याचा विकास करण्यात येईल. त्याकरिता शेतकऱ्यांचे सहकार्य आवश्यक आहे, असे घटप्रभा साखर कारखान्याचे नूतन अध्यक्ष सिद्धलिंगप्पा कंबळी यांनी सांगितले. याप्रसंगी सिद्धलिंगप्पा कंबळी व मल्लिकार्जुन कब्बूर यांचे कारखान्याच्या व्यवस्थापन मंडळाच्या सदस्यांनी अभिनंदन केले. त्यानंतर नवनिर्वाचित अध्यक्ष-उपाध्यक्षांनी आमदार व बेमूलचे अध्यक्ष भालचंद्र जारकीहोळी यांचा सत्कार केला. याप्रसंगी संचालक गिरीश हळ्ळूर, भुतप्पा गोडेर, महादेवप्पा भोवी, माळप्पा जागनूर, लक्ष्मण गणगोळप्पा, शिवलिंगप्पा पुजेरी, जगदीश बंड्रोळी, विनीत पाटील, अरुण महारेड्डी, शिवनगौडा पाटील (शिवापूर), अरिफ पीरजादे, यल्लव्वा सारापूर, लक्कव्वा बेळगली, लेखा परीक्षक सय्यदप्पा गदाडी, कार्यालयाचे अधीक्षक इरण्णा जंबगी उपस्थित होते.