महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

काँग्रेस नको असल्यास भाजपला मत द्या!

05:31 AM Nov 11, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

राजस्थानात काँग्रेस उमेदवाराचे अजब आवाहन : पक्षातील बंडखोरांना धडा शिकविण्याचा विचार

Advertisement

राजस्थान विधानसभा निवडणुकीकरता प्रचाराला मोठा वेग आला आहे. याचदरम्यान काँग्रेसच्या एका आमदाराने प्रचारादरम्यान केलेल्या एका वक्तव्यामुळे पक्षश्रेष्ठींपासून काँग्रेस कार्यकर्ते देखील अवाक् झाले आहेत. काँग्रेसचे वरिष्ठ आमदार अमीन खान यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अमीन खान हे सलग 5 वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. यावेळी ते बाडमेर जिल्ह्यातील शिव मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार आहेत.

Advertisement

जर जनता आमच्यावर नाराज असेल तर तुम्ही कुठल्याही अपक्षाला मतदान करू नका, भाजपला मत द्या, असे 84 वर्षीय अमीन खान हे प्रचारादरम्यान म्हणत असल्याचे एका व्हिडिओत दिसून येते. हे वक्तव्य आता काँग्रेसची कोंडी करणारे ठरले आहे. अमीन खान यांच्यावर नाराज असलेले बाडमेर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष फतेह खान हे अपक्ष म्हणून निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. याच विधानसभा मतदारसंघातून रविंद्र सिंह भाटी हे देखील अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहेत.

काँग्रेसचे सर्वात वरिष्ठ आमदार अमीन खान हे शिव मतदारसंघातून दहाव्यांदा निवडणूक लढवत आहेत. यावेळी उमेदवारी मिळविण्यासाठी अमीन खान यांना मोठी कसरत करावी लागली आहे. जयपूरपासून दिल्लीपर्यंत धाव घ्यावी लागली आहे. या मतदारसंघात काँग्रेस जिल्हाध्यक्ष फतेह खान देखील प्रमुख दावेदार होते.

अमीन खान 5 वेळा आमदार आणि एकदा मंत्री राहिले आहेत. अमीन यांच्यासमोर पहिल्यांदाच काँग्रेसच्या नेत्याने बंडखोरी केली आहे. याचमुळे अमीन खान हे नाराज आहेत. फतेह खान यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न झाला, परंतु ते अद्याप निवडणुकीच्या मैदानात आहेत. याचमुळे अमीन खान हे स्वत:च्या प्रचारादरम्यान 5 वर्षांमध्ये काँग्रेस सरकारने जोरदार काम केले आहे, परंतु हे काम पसंत नसल्यास भाजपला मत द्या, पण अपक्षाला मत देऊ नका असे म्हणत आहेत.

रोखठोक बोलणारे नेते

आमदार अमीन खान हे स्वत:च्या रोखठोक बोलण्यासाठी ओळखले जातात. अनेकदा त्यांनी वादग्रस्त वक्तव्ये केली आहेत. एका वक्तव्यामुळे त्यांना मंत्रिपद गमवावे लागले होते. त्यांनी राष्ट्रपतींसंबंधीच आक्षेपार्ह टिप्पणी केली होती.

34 वर्षांपासून राजकारणात सक्रीय

फतेह खान हे मागील 34 वर्षापासून काँग्रेसमध्ये कार्यरत आहेत. यावेळी फतेह खान हे काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढविण्याची तयारी करत होते. तसेच फतेह खान यांचे तिकीट जवळपास निश्चित असल्याचे मानले जात होते, परंतु ऐनवेळी काँग्रेस नेतृत्वाने अमीन खान यांनाच पुन्हा उमेदवारी दिली. यामुळे नाराज फतेह खान यांनी बंड करत अपक्ष म्हणून निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे.

शिव मतदारसंघ चर्चेत

पूर्ण राजस्थानात शिव मतदारसंघाची चर्चा आहे. युवांचा आवाज ठरलेले रविंद्र सिंह भाटी यांचा हा मतदारसंघ आहे. भाटी यांनी भाजपकडून उमेदवारी न मिळाल्याने अपक्ष म्हणून मैदानात उडी घेतली आहे. भाटी यांनी जयनारायण व्यास विद्यापीठाच्या 57 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच अपक्ष म्हणून निवडणूक जिंकली होती. गेहलोत सरकारच्या विरोधात अनेक आंदोलने केल्यामुळे भाटी हे युवांचा आवाज मानले जातात. याच मतदारसंघाचे भाजपचे माजी आमदार जालमसिंह रावलोत यांनी भाजपला रामराम ठोकून राष्ट्रीय लोकतांत्रिक पक्षात प्रवेश केला आहे. जालमसिंह हे रालोपचे उमेदवार आहेत.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article