शुक्ल व कृष्ण गती
अध्याय सातवा
उपासना म्हणजे आपल्या इष्टदेवतेच्या मूर्तीजवळ बसून तिचं स्मरण, पूजन करणे. आपल्यापैकी प्रत्येकजण देवपूजा करत असतो आणि त्यातून किती समाधान मिळते हेही सगळ्यांना माहित आहे. या अध्यायात बाप्पा आपल्याला उपासनेची मुख्य अंगे म्हणजे बाह्य पूजा, मानस पूजा याबाबत सविस्तर माहिती देणार आहेत. उपासना यथाक्रम कशी करावी, उपासनेने मोक्षप्राप्ती कशी होते, मुक्ती कशी मिळते इत्यादि बाबी स्पष्ट करून सांगणार आहेत. आत्तापर्यंत आपण कुणितरी सांगितलंय म्हणून, कुठंतरी वाचलंय म्हणून व आपल्याला सुचेल तशी उपासना करत होतो पण आता प्रत्यक्ष बाप्पा आपल्याला उपासना कशी करावी याबद्दल मार्गदर्शन करणार आहेत. त्यानुसार उपासना करून आपण मुक्ती मिळवू शकतो. बाप्पांवर आपली श्रद्धा आहेच. या अध्यायाच्या अभ्यासातून ती आणखीन दृढ होईल. बाप्पांनी दाखवलेल्या उपासना मार्गावरून चालायचा प्रयत्न आपण करूयात.
मागील अध्यायाच्या शेवटी मृत्यूनंतर पुढील गतीसाठी उजेड आणि अंधार असलेले दोन मार्ग बाप्पानी सांगितले होते. उजेडाच्या मार्गाने म्हणजे सुर्यमार्गाने गेलेला माणूस ब्रह्मपदी पोहोचतो आणि अंधाराच्या मार्गाने म्हणजे चंद्रमार्गाने गेलेला मनुष्य संसारात परत येतो असं बाप्पानी सांगितलं. यावर आणखी सविस्तर जाणून घ्यावं म्हणून वरेण्य महाराज बाप्पाना पुढील प्रश्न विचारत आहेत.
का शुक्ला गतिरुद्दिष्टा का च कृष्णा गजानन ।
किं ब्रह्म संसृतिऽ का मे वत्तुमर्हस्यनुग्रहात् ।। 1 ।।
अर्थ- हे गजानना, शुक्ल गती कशाला म्हणतात? कृष्ण गती कोणती? ब्रह्म कोणते? संसार कोणता? हे सांगण्याला तूच योग्य आहेस.
विवरण- वरेण्य महाराज आणि बाप्पा यांच्यात इतकी जवळीक होती की, ते आपलेपणाच्या भावनेतून बाप्पांशी अरे तुरेची भाषा करतात. भक्तही जेव्हा आर्ततेने देवाची प्रार्थना करतो तेव्हाही तो देवाशी आपलेपणाच्या भावनेतून देवा मला पाव आणि मला सोडव अशी अरेतुरेची भाषा करतो. वरेण्य महाराज त्याच आर्ततेने बाप्पाना प्रश्न विचारत आहेत. एकप्रकारे ते आपल्याच मनातील प्रश्न विचारत आहेत असं म्हंटलं तरी चालेल. कारण मृत्यूनंतर आपलं काय होणार हे जाणून घ्यायची प्रत्येकाला उत्सुकता असते.
मृत्यूसमयी परमेश्वराचे चिंतन कोणत्या साधनाने व कोणत्या स्वरूपात करावे आणि मृत्यूनंतर पुन्हा जन्ममृत्युच्या फेऱ्यात न सापडता, मोक्षप्राप्ती कशी करून घ्यावी याचे सविस्तर ज्ञान होण्यासाठी वरेण्य राजाने वरील प्रश्न विचारला आहे. राजाच्या प्रश्नाचे उत्तर बाप्पा पुढील काही श्लोकातून देत आहेत. ते म्हणाले,
अग्निर्ज्योतिरहऽ शुक्ला कर्मार्हमयनं गतीऽ ।
चान्द्रं ज्योतिस्तथा धूमो रात्रिश्च दक्षिणायनम् ।।2।।
कृष्णैते ब्रह्मसंसृत्योरवाप्तेऽ कारणं गती ।
दृश्यादृश्यमिदं सर्वं ब्रह्मैवेत्यवधारय ।। 3 ।।
अर्थ- अग्नि, सूर्यप्रकाश, दिवस आणि कर्म करण्याला योग्य असे अयन म्हणजे उत्तरायण. ही शुक्ल गती होय. कृष्णपक्ष, चंद्रप्रकाश, धूमयुक्त अग्नि, रात्र आणि दक्षिणायन ही कृष्ण गती होय. या दोन गती अनुक्रमे ब्रह्म आणि संसार यांना कारणे आहेत. सर्व दृश्य व अदृश्य जग ब्रह्ममय आहे असे जाण.
केव्हा मृत्यू आला असता मोक्ष मिळतो आणि केव्हा मरण आले असता पुनर्जन्म मिळतो याचा उल्लेख या श्लोकात आलेला आहे. उत्तरायणाच्या सहा महिन्यात, शुक्ल पक्षात, दिवसाच्या वेळी जे ब्रह्मज्ञानी देह सोडतात ते सरळ ब्रह्माला प्राप्त होतात. दक्षिणायनाच्या सहा महिन्यात रात्रीच्या वेळी जे देह सोडतात ते चंद्रलोकात जाऊन परत फिरतात. या दोन्ही गती सनातन कालपासून चालू आहेत. सविस्तर पाहुयात पुढील भागात.
क्रमश: