शुभमन गिलचे नाबाद शतक
इंग्लंडविरुद्ध दुसरी कसोटी : यशस्वी जैस्वालचे हुकले
वृत्तसंस्था/ बर्मिंगहॅम
एजबस्टन येथे सुरु झालेल्या इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीत कर्णधार शुभमन गिलचे नाबाद शतक तर यशस्वी जैस्वालच्या शानदार अर्धशतकी खेळीच्या जोरावर टीम इंडियाने पहिल्या दिवशी 5 गडी गमावत 310 धावापर्यंत मजल मारली आहे. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा कर्णधार गिल 114 तर रविंद्र जडेजा 14 धावांवर खेळत होते. विशेष म्हणजे, कर्णधार झाल्यानंतर गिलने सलग दुसऱ्या सामन्यात शतक झळकावले. हे त्याच्या कारकिर्दीतील 7 वे शतक आहे.
प्रारंभी, इंग्लंडने नाणेफेक जिंकत गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यातही भारतीय संघाला पहिल्या डावात फलंदाजीला येण्याची संधी मिळाली. त्यामुळे यशस्वी जैस्वाल आणि केएल राहुल या जोडीकडून या डावातही चांगल्या सुरूवातीची अपेक्षा होती. मात्र, तसे झालं नाही. केएल राहुल अवघ्या 2 धावांवर माघारी परतला आणि अवघ्या 15 धावांवर भारतीय संघाला पहिला धक्का बसला. त्यानंतर जैस्वाल आणि करुण नायरने मिळून भारतीय संघाचा डाव सांभाळला. दोघांनी मिळून अर्धशतकी भागीदारी केली. आठ वर्षांनी कमबॅक करणाऱ्या नायरला या सामन्यातही मोठी खेळी साकारता आली नाही. 5 चौकारासह त्याने 31 धावा केल्या अन् कार्सेच्या गोलंदाजीवर तो बाद झाला. करुण नायर बाद झाल्यानंतर कर्णधार गिल आणि जैस्वालने मिळून अर्धशतकी भागीदारी केली.
जैस्वालचे हुकले शतक
जैस्वालने इंग्लंडच्या गोलंदाजांची डोकेदुखी वाढवली होती. कारण तो बाहेर जाणारे चेंडू सोडत होता. तर ज्या चेंडूवर धावा गोळा करण्याची संधी मिळत होती, त्या चेंडूवर तो धावा करत होता. या डावातही त्याला शतक झळकावण्याची संधी होती. पण स्टोक्सच्या गोलंदाजीवर तो 87 धावा करत माघारी परतला. त्याने 107 चेंडूत 87 धावांची खेळी साकारताना 13 चौकार लगावले. शतकाच्या उंबरठ्यावर असताना त्याला स्टोक्सने तंबूचा रस्ता दाखवला.
गिलचे सातवे कसोटी शतक
यशस्वी जैस्वाल बाद झाल्यानंतर ऋषभ पंतने काही काळ गिलला चांगली साथ दिली. पण, पंतला मोठी खेळी मात्र साकारता आली नाही. त्याला 25 धावांवर शोएब बशीरने तंबूचा रस्ता दाखवला. नितीश कुमार रे•ाrलाही फारसा करिश्मा दाखवता आला नाही. वोक्सने त्याला क्लीन बोल्ड करत माघारी पाठवले. यानंतर मात्र, कर्णधार गिलने रवींद्र जडेजाला सोबतील घेत संघाला त्रिशतकी मजल मारुन दिली. या जोडीने महत्वपूर्ण 99 धावांची भागीदारी साकारली. दरम्यान, गिलने कसोटीतील सातवे तर कर्णधार म्हणून दुसरे शतक साजरे करताना 12 चौकारासह नाबाद 114 धावांची खेळी साकारली. जडेजाने त्याला चांगली साथ देताना नाबाद 41 धावांचे योगदान दिले. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारताने 85 षटकात 5 गडी गमावत 310 धावा केल्या होत्या.
संक्षिप्त धावफलक
भारतीय संघ 85 षटकांत 5 बाद 310 (यशस्वी जैस्वाल 87, केएल राहुल 2, करुण नायर 31, शुभमन गिल खेळत आहे 114, ऋषभ पंत 25, नितीश कुमार रे•ाr 1, रवींद्र जडेजा खेळत आहे 41, ख्रिस वोक्स 2 बळी, बेन स्टोक्स शोएब बशीर आणि कार्से प्रत्येकी 1 बळी).
जैस्वाल-स्टोक्समध्ये राडा
इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीत जैस्वालने आपला दमदार फॉर्म कायम ठेवताना शानदार अर्धशतकी खेळी साकारली. जैस्वाल बेन स्टोक्स यांच्यात मैदानावर राडा पाहायला मिळाला. जैस्वाल दमदार फलंदाजी करत इंग्लंडच्या गोलंदाजीवर फटकेबाजी करत होता. यादरम्यान बेन स्टोक्स गोलंदाजी करण्यासाठी आला. तेव्हा या दोन्ही खेळाडूंमध्ये वादावादी पाहायला मिळाली. भारताच्या डावातील 17 वे षटक टाकण्यासाठी स्टोक्स आला. स्टोक्सच्या षटकातील चौथ्या चेंडूवर जैस्वालने एक शानदार चौकार खेचला. यानंतर स्टोक्स आणि जैस्वालमध्ये ही वादावादी पाहायला मिळाली. दोन्ही खेळाडू एकमेकांना डोळे दाखवत काहीतरी बोलताना दिसले. शाब्दिक चकमकही झाली. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे.
गिलचे सलग दुसरे शतक
भारतीय कसोटी संघाचे नेतृत्व करताना सलग दुसऱ्या सामन्यात त्याच्या बॅटमधून शतक पाहायला मिळाले. अशी कामगिरी करणारा तो चौथा भारतीय कॅप्टन ठरलाय. याआधी विजय हजारे, सुनील गावसकर आणि विराट कोहली यांनी हा पराक्रम करून दाखवला होता. यंदाच्या इंग्लंड दौऱ्यात पहिल्या कसोटीत गिलने शतकी खेळी साकारली होती. यानंतर दुसऱ्या कसोटीतही त्याने नाबाद शतक झळकावले आहे. या शतकी खेळीसह त्याने हा अनोखा विक्रमही केला आहे.
पहिल्या दोन सामन्यात लागोपाठ शतके झळकावणारे कर्णधार
- विराट कोहली-3 शतके
- विजय हजारे-2 शतके
- सुनील गावसकर-2 शतके
- शुभमन गिल-2 शतके