For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

शुभमन गिलचा ‘डबल’ धमाका

06:10 AM Jul 04, 2025 IST | Tarun Bharat Portal
शुभमन गिलचा ‘डबल’ धमाका
Advertisement

 इंग्लंडविरुद्ध दुसरी कसोटी, दुसरा दिवस : साहेबांविरुद्ध जबरदस्त द्विशतकी खेळी : टीम इंडियाचा 587 धावांचा डोंगर : जडेजाचे अर्धशतक : इंग्लंड 3 बाद 77

Advertisement

वृत्तसंस्था/बर्मिंगहॅम

पहिल्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी भारतीय फलंदाजांनी विशेषत: कर्णधार शुभमन गिलने वर्चस्व गाजवले. पण अखेरच्या टप्प्यात गोलंदाजांनी अचूक मारा करीत यजमान इंग्लंडची आघाडीची फळी तंबूत पाठविली. भारताच्या 587 धावांना प्रत्युत्तर देताना 20 षटकांत 3 बाद 77 धावा जमविल्या. ते अद्याप भारतापेक्षा 510 धावांनी मागे आहेत. जो रूट 18 व हॅरी ब्रुक 30 धावांवर दिवसअखेर खेळत होते. गिलने सुरुवातीला यशस्वी जैस्वाल, ऋषभ पंत, रवींद्र जडेजा आणि त्यानंतर वॉशिंग्टन सुंदर यांच्यासोबत भागीदारी करत टीम इंडियाला दुसऱ्या दिवशी पाचशेपार नेले. गिलने 269 धावांची शानदार खेळी साकारली.

Advertisement

गिल बाद झाल्यानंतर भारतीय संघ 151 षटकांत 587 धावांवर ऑलआऊट झाला. त्यानंतर भारताच्या अननुभवी गोलंदाजांनी भेदक मारा करीत इंग्लंडची स्थिती 3 बाद 25 अशी करीत यजमानांच्या गोटात अस्वस्थता निर्माण केली. पण रूट व ब्रुक यांनी अर्धशतकी भागीदारी करीत आणखी पडझड होऊ दिली नाही. इंग्लंडच्या गोलंदाजांना फारशी मदत मिळाली नव्हती. पण भारतीय गोलंदाजांनी कमी अनुभव असूनही इंग्लंडला धक्के दिले. मालिकेत पहिलाच सामना खेळणाऱ्या आकाश दीपने लागोपाठच्या चेंडूवर बेन डकेट व ऑली पोप यांना शून्यावर बाद करून यजमानांवर दडपण आणले. तर सिराजने क्रॉलीला 19 धावांवर बाद करून इंग्लंडची स्थिती 7.1 षटकांत 3 बाद 25 अशी केली होती.

गिलचे द्विशतकी भागीदारीसह द्विशतक

प्रारंभी, भारतीय संघाने 5 बाद 310 धावसंख्येवरुन दुसऱ्या दिवशीच्या खेळाला सुरुवात केली. कर्णधार शुभमन गिल आणि रविंद्र जडेजा या जोडीने संयमी तसेच प्रसंगी एकेरी-दुहेरी धावांवर भर देत संघाच्या धावसंख्येला आकार दिला. या जोडीने विक्रमी 203 धावांची भागीदारी साकारली. या भागीदारीमुळे भारतीय संघ मजबूत स्थितीत पोहोचला. दरम्यान, जडेजाने 137 चेंडूत 10 चौकार आणि 1 षटकारासह 89 धावांची महत्वपूर्ण खेळी साकारली. शतकाच्या उंबरठ्यावर पोहचला होता, मात्र इंग्लंडचे गोलंदाज यशस्वी जैस्वालनंतर जडेजालाही शतक करण्यापासून रोखण्यात यशस्वी ठरले. जडेजाला शतकासाठी 11 धावांची गरज होती. तेव्हा जोश टंग याने जडेजाला जेमी स्मिथ याच्या हाती कॅच आऊट केले.

गिलचे विक्रमी द्विशतकी

जडेजा बाद झाल्यानंतर गिलने वॉशिंग्टन सुंदरला सोबतीला घेत संघाला पाचशेपार नेले. दरम्यान, शुभमनने 122 व्या ओव्हरमधील पहिल्या चेंडूवर एकेरी धाव घेत 200 धावा पूर्ण केल्या. या द्विशतकासाठी त्याने 311 चेंडूचा सामना केला. आपल्या द्वितशकी खेळी त्याने 21 चौकार आणि 2 षटकार लगावले. या द्विशतक खेळीसह शुभमन इंग्लंडमध्ये द्विशतक करणारा पहिला भारतीय कर्णधार ठरला आहे. इंग्लंडमध्ये आतापर्यंत कोणत्याही आशियाई कर्णधाराला कसोटीत द्विशतक करता आले नव्हते. इंग्लंडमध्ये याआधी भारताकडून कर्णधार म्हणून मोहम्मद अझहरुद्दीन यांनी 179 धावा केल्या होत्या. अझहरुद्दीन यांनी 1990 साली मँचेस्टरमध्ये 179 धावा केल्या होत्या.

दरम्यान, गिलने वॉशिंग्टन सुंदरसोबत 144 धावांची भागीदारी साकारली. सुंदरनेही शानदार खेळी साकारताना 103 चेंडूत 3 चौकार व 1 षटकारासह 42 धावांचे योगदान दिले. यावेळी गिलने आपल्या 250 धावांचा टप्पाही पूर्ण केला. मैदानात जमलेल्या या जोडीला रुटने फोडले. रुटने सुंदरला 42 धावांवर तंबूचा रस्ता दाखवला. चहापानानंतर कर्णधार गिलला 269 धावांवर टंगने बाद करत इंग्लंडला मोठे यश मिळवून दिले. गिलने 387 चेंडूचा सामना करताना 30 चौकार आणि 3 षटकारासह 269 धावांची खेळी साकारली. गिल बाद झाल्यानंतर भारतीय संघाचा पहिला डावही 587 धावांवर आटोपला. इंग्लंडकडून शोएब बशीरने 3 तर जोश टंग, ख्रिस वोक्सने प्रत्येकी 2 बळी घेतले.

संक्षिप्त धावफलक

भारत 151 षटकांत सर्वबाद 587 (यशस्वी जैस्वाल 87, करुण नायर 31, शुभमन गिल 387 चेंडूत 269 धावा, ऋषभ पंत 25, रविंद्र जडेजा 137 चेंडूत 10 चौकार व 1 षटकारासह 89, वॉशिंग्टन सुंदर 42, आकाशदीप 6, मोहम्मद सिराज 8, ख्रिस वोक्स, जोश टंग प्रत्येकी 2 बळी, शोएब बशीर 3 बळी). इंग्लंड प,डाव 20 षटकांत 3 बाद 77 : क्रॉली 19, डकेट व पोप 0, रूट खेळत आहे 18, ब्रुक खेळत आहे 30, अवांतर 10. आकाश दीप 2-36, सिराज 1-21.

द्वितशकी खेळीसह गिलची द्रविड-गावसकरांच्या क्लबमध्ये एंट्री

इंग्लंडच्या मैदानात द्विशतकी खेळी करणारा गिल हा तिसरा भारतीय फलंदाज आहे. 1979 मध्ये ओव्हलच्या मैदानात लिटल मास्टर सुनील गावसकर यांनी 221 धावांची खेळी केली होती. ओव्हलच्या मैदानातच 2002 च्या इंग्लंड दौऱ्यात राहुल द्रविडच्या भात्यातून 217 धावांची खेळी पाहायला मिळाली होती. या दिग्गजांच्या यादीत आता गिलने एन्ट्री मारली आहे. एवढेच नाही गावसकरांना मागे टाकत इंग्लंडच्या मैदानातील सर्वोच्च धावसंख्या उभारण्याचा विक्रमही आता त्याच्या नावे झाला आहे.

पहिला आशियाई कर्णधार

शुभमन इंग्लंडमध्ये द्विशतक करणारा पहिला भारतीय कर्णधार ठरला आहे. इंग्लंडमध्ये आतापर्यंत कोणत्याही आशियाई कर्णधाराला कसोटीत द्विशतक करता आले नव्हते. इंग्लंडमध्ये याआधी भारताकडून कर्णधार म्हणून मोहम्मद अझहरुद्दीनने 179 धावा केल्या होत्या. तर आशियाई कर्णधार म्हणून इंग्लंडमध्ये सर्वाधिक 193 धावांचा विक्रम हा श्रीलंकेचा माजी कर्णधार तिलकरत्ने दिलशान याच्या नावावर होता. दिलशानने 2011 साली लॉर्ड्समध्ये ही कामगिरी केली होती. हा विक्रम आता गिलच्या नावे जमा झाला आहे.

Advertisement
Tags :

.