गुवाहाटी कसोटीत शुभमन गिल खेळण्याची शक्यता कमी
रिषभ पंतकडे नेतृत्वाची शक्यता : कुलदीपही वैयक्तिक कारणास्तव राहणार बाहेर
वृत्तसंस्था/ मुंबई, गुवाहाटी
भारताला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिल्या सामन्यात 30 धावांनी पराभव पत्करावा लागला. आता मालिकेतील दुसरा सामना 22 नोव्हेंबरपासून गुवाहाटी येथे खेळला जाणार आहे. हा सामना जिंकून मालिका 1-1 ने बरोबरी करण्याचा टीम इंडियाचा प्रयत्न असेल. कोलकाता कसोटीत शुभमन गिलच्या मानेला दुखापत झाली होती. त्यामुळे त्याला मैदान सोडावे लागले. रविवारी रात्री त्याला रुग्णलयातून डिस्चार्ज मिळाला आहे. पण सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार तो दुसऱ्या कसोटी सामन्यातून बाहेर होऊ शकतो.
पहिली कसोटी केवळ अडीच दिवसांत संपल्याने टीम इंडियातील दिग्गज खेळाडूसह गौतम गंभीर, निवड समिती प्रमुख अजित आगरकर यांच्यावर जोरदार टीका केली जात आहे. दरम्यान, दुसऱ्या सामन्यासाठी काही महत्त्वाचे बदल दिसू शकतात. कर्णधार शुभमन गिलच्या खेळण्यावर शंका कायम आहे. पहिल्या कसोटीदरम्यान त्याच्या मानेला दुखापत झाली, ज्यामुळे हॉस्पिटलमध्ये दाखल करावे लागले. दुसऱ्या कसोटीसाठी पाच दिवस बाकी असल्याने तो खेळणार की नाही, याबाबत साशंकता आहे. याशिवाय, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कुलदीप यादवचे लग्न नोव्हेंबरच्या अखेरीस होणार असून यासाठी त्याने बीसीसीआयकडे रजा मागितल्याची माहिती आहे. यामुळे त्याच्या खेळण्याबाबतही सांशकता व्यक्त केली जात आहे. संघ व्यवस्थापनाने त्यांच्या सहभागाबाबत अद्याप काही निर्णय घेतलेला नाही.
रिषभ पंतकडे नेतृत्वाची धुरा
शुभमन गिल गुवाहाटी कसोटीत खेळू शकला नाही, तर उपकर्णधार रिषभ पंत संघाचे नेतृत्व करताना दिसेल. गिल कोलकाता कसोटीतून बाहेर पडल्यानंतर पंतने संघाची जबाबदारीही स्वीकारली. कर्णधाराच्या अनुपस्थितीत, उपकर्णधार संघाचे नेतृत्व करतो. दरम्यान, गिलच्या जागी डावखुरा फलंदाज साई सुदर्शनला संधी दिली जाऊ शकते. यासह देवदत्त पडिक्कलचा पर्याय देखील उपलब्ध असणार आहे. गिलला रुग्णालयातूनत डिस्चार्ज तर मिळाला आहे, पण तो किती दिवसांनंतर मैदानावर परतणार, याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही. ऑलराउंडर म्हणून रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर आणि अक्षर पटेल हे तिन्ही स्पिन पर्याय असतील. वेगवान गोलंदाजांचे नेतृत्व जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज करतील.
दुसऱ्या कसोटीसाठी संभाव्य प्लेईंग 11 : यशस्वी जैस्वाल, केएल राहुल (यष्टीरक्षक), साई सुदर्शन, देवदत्त पडिक्कल/नितीश कुमार रे•ाr, रिषभ पंत (यष्टीरक्षक, कर्णधार), ध्रुव जुरेल, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.
मानेला पट्टा अन् हॉस्पिटलमधून डिस्चार्ज
शुभमन गिलला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. कोलकात्यात झालेल्या पहिल्या कसोटीत त्याला अचानक ‘नेक स्पॅझम’ झाल्याने तातडीने वैद्यकीय उपचारासाठी रुग्णालयात दाखल करावे लागले होते. सध्या त्याची प्रकृती स्थिर आहे, मात्र गुवाहाटी कसोटीत तो खेळेल की नाही, यावर प्रश्नचिन्ह कायम आहे. याबाबत बोलताना गंभीर म्हणाला, बीसीसीआयची टीम आणि फिजीओ त्याच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहे.
टीम इंडियाच्या पराभवानंतर दादा भडकला
अवघ्या तीन दिवसांत भारताला 30 धावांनी पराभव पत्करावा लागल्यानंतर ईडनच्या पिचवर प्रश्नचिन्ह उभे राहिले, मात्र क्रिकेट असोसिएशन ऑफ बंगालचे अध्यक्ष आणि भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने पिचवरील सर्व आरोप फेटाळून लावत टीम इंडियाला कडक सल्ला दिला आहे. ईडन गार्डन्सची खेळपट्टी भारतीय संघाने जशी मागणी केली होती तशीच तयार करण्यात आली. पण घरच्या मैदानावर वर्चस्व मिळवण्यासाठी पिचमध्ये जाणीवपूर्वक छेडछाड करणे आता बंद केले पाहिजे. खेळपट्टी ही फलंदाज आणि गोलंदाज दोघांसाठीही पोषक असायला हवी. पण, कोलकाता कसोटीत असे झाले नाही. याचा दोष दुसऱ्यांना देणे योग्य नाही, असे गांगुली यावेळी म्हणाला. याशिवाय, बुमराह आणि सिराज चांगली गोलंदाजी करत आहेतच, पण मोहम्मद शमीसारखा अनुभवी गोलंदाज संघात असणे गरजेचे आहे. शमीमध्ये भारताला एकहाती सामना जिंकवण्याची ताकद आहे, त्यामुळे त्यालाही संधी देणे आवश्यक आहे, असेही तो यावेळी म्हणाला.
गौतम गंभीर मुख्य प्रशिक्षक झाल्यापासून भारताची कसोटीतील कामगिरी सातत्याने चर्चेत आहे. कसोटी क्रिकेटमध्ये भारताने गंभीरच्या मार्गदर्शनात 18 पैकी फक्त 7 सामने जिंकले, 9 गमावले आणि 2 अनिर्णित राहिले. संघात ठोस योजनेशिवाय सतत बदल केले जात आहेत आणि त्यामुळे संघातील स्थैर्य ढासळत आहे.
वेंकटेश प्रसाद, माजी क्रिकेटपटू
ईडन गार्डन्सचा इतिहास पाहिला तर कित्येक कसोटी सामने झाले आहेत. पण तीन दिवसांत इतका बदल झालेली खेळपट्टी मी कधीच पाहिली नाही. गौतम गंभीर काय म्हणाला ते मी ऐकलं. त्याने सांगितलं की संघालाच अशा प्रकारची खेळपट्टी हवी होती. पण हे ऐकून मी गोंधळलो.
अनिल कुंबळे, माजी क्रिकेटपटू