शुभमन गिल नवा कसोटी कर्णधार
इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिकेसाठी टीम इंडिया जाहीर : ऋषभ पंतकडे उपकर्णधारपदाची धुरा : करुण नायरचे कमबॅक, शार्दुललाही स्थान
वृत्तसंस्था/मुंबई
आयपीएलनंतर भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर जाणार असून यावेळी पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळवण्यात येणार आहे. बीसीसीआयच्या निवड समितीद्वारे आज भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. 18 सदस्यीय संघाची कमान शुभमन गिलकडे सोपवण्यात आली असून यष्टीरक्षक ऋषभ पंतला उपकर्णधार बनवण्यात आले आहे. रोहित शर्माच्या निवृत्तीनंतर गिलची कर्णधारपदी नियुक्ती भारतीय क्रिकेटमध्ये एका नवीन युगाची सुरुवात आहे, हे विशेष.
फेब्रुवारी 2022 पासून टीम इंडियाचे नेतृत्व करणाऱ्या रोहितसोबतच, त्याचे सहकारी विराट कोहली आणि रविचंद्रन अश्विन यांनी कसोटी क्रिकेटला निरोप दिला आहे. यानंतर भारताच्या कर्णधारपदी कोण वारसदार ठरणार, यासंदर्भातच अनेक नावे पुढे आली. बीसीसीआयने अखेर इंग्लंड दौऱ्यापूर्वी भारताचा कसोटी कर्णधार जाहीर केला. 25 वर्षीय शुभमनकडे संघाच्या नेतृत्वाची धुरा सोपवताना इंग्लंड दौऱ्यासाठी युवा संघ देखील जाहीर केला आहे.
करुण नायरचे कमबॅक
अखेर, अनुभवी फलंदाज करुण नायर भारतीय संघात पुनरागमन झाले आहे. करुणची भारतीय संघात परतण्याची नऊ वर्षांची प्रतीक्षा संपली आहे. त्यानेइंग्लंडविरुद्ध 2016 ला त्रिशतक मारले होते. या इतक्या उल्लेखनीय कामगिरीनंतरही त्याला भारतीय संघातून ड्रॉप करण्यात आले होते. आता पुन्हा इंग्लंडविरुद्धच त्याला संघात स्थान मिळाले आहे. मागील दोन वर्षात देशांतर्गत क्रिकेट स्पर्धेत त्याने शानदार कामगिरी करताना निवड समितीचे लक्ष वेधून घेतले होते. याशिवाय, वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूरचेही टीम इंडियात पुनरागमन झाले आहे. शार्दुल 2023 मध्ये द.आफ्रिकेविरुद्ध आपला शेवटचा सामना खेळला होता, त्यानंतर मात्र त्याला संघातून बाहेर बसवण्यात आले होते. मात्र, रणजी हंगामात मुंबईसाठी सातत्यपूर्ण कामगिरी व आयपीएलमधील धमाकेदार प्रदर्शनानंतर निवड समितीने त्याला संधी दिली आहे.
साई सुदर्शन, अशदीप प्रथमच कसोटी संघात
याशिवाय, आयपीएल 2025 मध्ये चमकदार कामगिरी करणाऱ्या साई सुदर्शन आणि वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग यांना पहिल्यांदाच कसोटी संघात स्थान मिळाले आहे. साई सुदर्शनने देशांतर्गत क्रिकेटसह आयपीएलमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी करत आपले लक्ष वेधून घेतल्याने निवड समितीने त्याच्यावर विश्वास दाखवला आहे. वनडे व टी 20 क्रिकेटमध्ये शानदार कामगिरी करणाऱ्या अर्शदीपला कसोटी संघात लॉटरी लागली आहे.
इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघ -
शुभमन गिल (कर्णधार), ऋषभ पंत (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, केएल राहुल, साई सुदर्शन, अभिमन्यु ईश्वरन, करुण नायर, नितीश कुमार रे•ाr, रवींद्र जडेजा, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, शार्दूल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, आकाश दीप, अर्शदीप सिंह, कुलदीप यादव.
कसोटी मालिकेचे वेळापत्रक
20 जूनपासून भारत आणि इंग्लंड संघात 5 सामन्यांची कसोटी मालिका खेळवण्यात येणार आहे. यापैकी पहिली कसोटी 20-24 जून (लॉर्ड्स), दुसरा कसोटी सामना 2 ते 6 जुलै (बर्मिंगहॅम), तिसरा कसोटी सामना 10 ते 14 जुलै (लॉर्ड्स), चौथा कसोटी सामना 23 ते 27 जुलै (मँचेस्टर) आणि पाचवा कसोटी सामना 31 जुलै ते 4 ऑगस्टदरम्यान (ओव्हल, लंडन) खेळवला जाणार आहे.
मोहम्मद शमी, सरफराज खानला संधी नाही
वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीला फिटनेसशी संबंधित कारणांमुळे संघात स्थान मिळालेले नाही. त्याच वेळी, चॅम्पियन्स ट्रॉफीत टीम इंडियाच्या विजयात मोठे योगदान असलेला श्रेयस अय्यर या संघाचा भाग नाही. तर सरफराज खानलाही स्थान मिळालेले नाही. गतवर्षी कसोटीत पदार्पण करणाऱ्या सरफराजने सहा कसोटीत शानदार कामगिरी केली आहे. इंग्लंडविरुद्ध मालिकेसाठी त्याने जोरदार तयारी केली होती, पण संघात त्याला संघात स्थान मिळवता आलेली नाही. या तीन स्टार शिवाय हर्षित राणा, इशान किशन, मानव सुथार, तनुष कोटियन, मुकेश कुमार, अंशुल कंबोज, खलील अहमद, ऋतुराज गायकवाड, तुषार देशपांडे आणि हर्ष दुबे हे खेळाडू आहेत, ज्यांना भारतीय वरिष्ठ संघात स्थान मिळालेले नाही.
शुभमन गिल पाचवा युवा कसोटी कर्णधार
वयाच्या पंचवीशीत शुभमन गिल कसोटीत भारताचे नेतृत्व करणारा पाचवा सर्वात तरुण क्रिकेटपटू ठरला आहे. त्याच्या आधी मन्सूर अली खान पतौडी (21 वर्षे 77 दिवस), सचिन तेंडुलकर (23 वर्षे 169 दिवस), कपिल देव (24 वर्षे 48 दिवस) आणि रवी शास्त्राr (25 वर्षे 229 दिवस) आहेत. भारतीय क्रिकेट संघाने 1932 मध्ये पहिला कसोटी सामना खेळला. तेव्हापासून एकूण 36 खेळाडूंनी भारतीय कसोटी संघाचे नेतृत्व केले आहे. आता शुभमन गिलला 37 वा कर्णधार म्हणून ही जबाबदारी देण्यात आली आहे. आता 20 जूनपासून सुरू होणाऱ्या इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत शुभमन गिल 37 वा कर्णधार म्हणून भारतीय संघाची जबाबदारी स्वीकारेल.
बुमराह दावेदर पण तंदुरुस्तीची समस्या
जसप्रीत बुमराहने ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर दोन कसोटी सामन्यांमध्ये नेतृत्व केले. पर्थमध्ये टीम इंडिया जिंकली, पण ऑस्ट्रेलियाने सिडनी कसोटी जिंकली. सामन्याच्या पहिल्या डावात बुमराहला दुखापत झाली, त्याने पाठीच्या दुखापतीची तक्रार केली. त्यानंतर तो सामन्यात पुन्हा गोलंदाजी करू शकला नाही, ज्यामुळे भारत दुसऱ्या डावात दबाव निर्माण करू शकला नाही. बुमराह अनेकदा तंदुरुस्तीशी झुंजताना दिसून आला आहे, 2022 मध्ये शेवटच्या वेळी दुखापत झाल्यानंतर तो सुमारे 15 महिने क्रिकेटपासून दूर होता. एका दीर्घ कसोटी मालिकेत त्याला 1-2 सामन्यांची विश्रांती देणे देखील आवश्यक आहे. त्यामुळे, त्याला कायमचा कर्णधार बनणे कठीण आहे.
सातत्य राखण्यात केएल अपयशी
केएल राहुल 10 वर्षांपासून कसोटी क्रिकेटमध्ये आहे, पण कसोटी संघातील अद्याप आपले स्थान अबाधित राखू शकलेला नाही. त्याची संघात आत बाहेर अशी स्थिती मागील काही वर्षे राहिली आहे. कधी त्याला सलामीवीर म्हणून, कधी मधल्या फळीत तर कधी यष्टीरक्षक म्हणून आजमावले जाते. निवड समितीने यंदा त्याच्यावर विश्वास दाखवताना इंग्लंड दौऱ्यासाठी संधी दिली आहे. यामुळे या दौऱ्यात त्याची कामगिरी कशी होते, हे पाहणे महत्वाचे ठरेल. राहुलला इंग्लंड द्रौयावर चांगली कामगिरी करावी लागेल.