शुभांशू शुक्लाच्या पृथ्वीप्रवासास प्रारंभ
आगमनास लागणार 22 तास, आज दुपारी दाखल होणार
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
अंतराळ स्थानकात वास्तव्य करणारा भारताचा पहिला अंतराळवीर शुभांशू शुक्ला याच्या पृथ्वीप्रवासाला प्रारंभ झाला आहे. सोमवारी भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी 4 वाजून 50 मिनिटांनी त्याने आपल्या अन्य तीन सहकाऱ्यांसमवेत नासाच्या अंतराळ स्थानकाचा निरोप घेऊन पृथ्वीकडे येण्याच्या प्रवासास प्रारंभ केला. या त्याच्या अंतराळ अभियानातील आतापर्यंतचे सर्व टप्पे व्यवस्थित पार पडले आहेत.
तो आपल्या सहकाऱ्यांसह भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी 3 वाजून 1 मिनिटांनी पृथ्वीवर अवतीर्ण होणार आहेत. तो ड्रॅगन नामक अवकाश यानातून पृथ्वीवर येत आहे. त्याचे यान मंगळवारी पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करणार आहे. हा टप्पा अत्यंत महत्वाचा मानण्यात येतो. पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश केल्यानंतर वायूच्या घर्षणाने यानाचे बाह्या आवरण 1,700 डिग्री सेल्सिअसपर्यंत तापू शकते. तथापि, या उष्णतेला परिणाम यानातील अंतराळवीरांना जाणवणार नाही, अशी व्यवस्था करण्यात आलेली असते. वातावरणात प्रवेश केल्यानंतर यानाचे पॅरेशूट्स उघडले जातात, जेणेकरुन त्याचे हळुवारपणे पृथ्वीवर आगमन होऊ शकणार आहे.
निरोप समारंभ
अंतराळ स्थानकामध्ये शुभांशू शुक्ला आणि त्याच्या सहकाऱ्यांसाठी सोमवारी निरोप समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. आपण लवकरच धरतीवर येत असून त्यानंतर आपला संवाद होईल, असा संदेश त्याने भारताच्या नागरिकांना दिला आहे. या संपूर्ण अवकाश प्रवासात आपल्याला जे अद्भूत आणि आनंददायक अनुभव आले, त्यांचे शब्दांमध्ये वर्णन करता येणे अशक्यच आहे. तरीही मी ते कथन करण्याचा प्रयत्न करेन, असे भावपूर्ण उद्गार त्याने काढले.
भारत महत्वाकांक्षी, निर्भय
भारताचा पहिला अंतराळवीर राकेश शर्मा याने 1984 मध्ये अंतराळ प्रवास केला होता. तेव्हा त्याने अंतराळातून जो भारत पाहिला असेल, त्यापेक्षा आजचा भारत खूपच महत्वाकांक्षी, निर्भय, प्रगत आणि आत्मविश्वासमय असा मला दिसत आहे. मला अंतराळातून गर्वोन्नत भारताचे दर्शन घडत आहे. हे दृष्य अविस्मरणीय आहे, असे सूचक गौरवोद्गार त्याने आपल्या परतीच्या प्रवासाच्या वेळी काढले आहेत.
अभियानात भारताचीही गुंतवणूक
ड्रॅगन या अंतराळ यानाच्या या अभियानात भारतानेही आपली गुंतवणूक केली आहे. ती 550 कोटी रुपयांची आहे. आणखी दोन वर्षांनी भारत ‘गगनयान’ नामक अंतराळ अभियान हाती घेणार आहे. मानवाला अंतरात नेणे आणि परत आणणे हे या अभियानाचे स्वरुप आहे. या अभियानाची पूर्वसज्जता करण्यासाठी भारताने अमेरिकेच्या या यान अभियानात गुंतवणूक केली आहे. शुभांशू शुक्लाचा अंतराळ अनुभव भारताला आपल्या अभियानासाठी उपयुक्त सिद्ध होणार आहे.
कॅलिफोर्नियानजीक समुद्रात अवतरण
ड्रॅगन या यानाचे अवतरण मंगळवारी दुपारी भारतीय प्रमाणसमयानुसार अमेरिकेतील कॅलिफोर्निया प्रांतानजीकच्या समुद्रात होणार आहे. या स्थानी या अवतरणासाठी पूर्ण सज्जता करण्यात आली आहे. यान समुद्रात आल्यानंतर अंतराळवीरांना विशेष नौकेमधून भूमीवर आणण्यात येणार आहे. नंतर काही काळ त्यांना विलगीकरणात ठेवले जाणार असून त्यांच्या प्रकृतीचे परीक्षण झाल्यानंतर त्यांना घरी जाऊ देण्यात येणार आहे, अशी माहिती देण्यात आली आहे. शुभांशू शुक्ला याचा हा अंतराळ प्रवास आणि त्याचे अंतराळ स्थानकातील वास्तव्य यामुळे भारताची मान विश्वाच्या अंतराळ संशोधन क्षेत्रात अधिकच उंचावणार आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोच्या गेल्या साठ दशकांच्या यशस्वी प्रयत्नांमुळे भारताने आज अंतराळ संशोधन क्षेत्रात मानाचे स्थान मिळविले आहे.
स्वागतासाठी भारत उत्सुक...
ड आज मंगळवारी दुपारी होणार शुभांशू शुक्ला याचे पृथ्वीतलावर आगमन
ड सारा भारत त्याचे स्वागत करण्यासाठी उत्सुक, लोकांमध्ये मोठी उत्कंठा
ड त्याचा अनुभव भारताला आपल्या अंतराळ मानव मोहिमेसाठी उपयुक्त