शुभांशू शुक्लाचे उद्या अंतराळात उड्डाण
आयएसएस’वर पोहोचण्यासाठी 28 तास लागणार : ‘अॅक्सिओम-4’ अंतर्गत अवकाश मोहीम
वृत्तसंस्था/ फ्लोरिडा
भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला आणि इतर तीन जण मंगळवार, 10 जून रोजी अॅक्सिओम स्पेसच्या चौथ्या मानवी अंतराळ उड्डाणासाठी फ्लोरिडा येथील नासाच्या केनेडी स्पेस सेंटरमधून उड्डाण करणार आहेत. सुमारे 28 तासांच्या प्रवासानंतर हे अंतराळवीर बुधवार, 11 जून रोजी भारतीय वेळेनुसार रात्री 10 वाजता आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात (आयएसएस) पोहोचतील. ही मोहीम व्यावसायिक अंतराळ उड्डाणासाठी हे एक मैलाचा दगड ठरेल.
शुभांशू शुक्ला यांच्यासोबत मिशन कमांडर पेगी व्हिटसन, हंगेरीचे तज्ञ टिबोर कापू आणि पोलंडचे स्लावोज उजनांस्की-विस्निव्स्की हे ‘आयएसएस’च्या अॅक्सिओम-4 (एएक्स4) व्यावसायिक मोहिमेत सहभागी असतील. चारही अंतराळवीर एलोन मस्कच्या कंपनी स्पेसएक्सच्या ड्रॅगन कॅप्सूलमधून उ•ाण करतील. अॅक्सिओम-4 मिशन फाल्कन-9 रॉकेटमधून प्रक्षेपित केले जाईल. इस्रोचे अध्यक्ष व्ही. नारायणन यांनी गेल्या आठवड्यात अॅक्सिओम स्पेसला भेट देऊन अंतराळ उ•ाणाच्या तयारीचा आढावा घेतला होता.
पंतप्रधान मोदींशीही बोलण्याची अपेक्षा
‘आयएसएस’मधील 14 दिवसांच्या मुक्कामादरम्यान, शुभांशू शुक्ला आणि इतर सदस्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह शालेय विद्यार्थी आणि अंतराळ उद्योगातील शास्त्रज्ञांशी संवाद साधण्याची अपेक्षा आहे. मागील आठवड्यात अंतराळवीरांनी प्रक्षेपणपूर्व प्रशिक्षणाची माहिती देण्यासाठी पत्रकार परिषद घेतली होती. याप्रसंगी आम्ही सर्व प्रशिक्षण पूर्ण केले असून आमच्या टीममध्ये चांगला समन्वय असल्याचे शुभांशूने सांगितले. तसेच अंतराळ उ•ाणासाठी वर्षभर चालणाऱ्या प्रशिक्षणाचे वर्णन परिवर्तनकारी म्हणूनही केले होते.
अॅक्सिओम मोहिमेअंतर्गत आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर (आयएसएस) जाण्यापूर्वी सर्व अंतराळवीर गेल्या दहा-बारा दिवसांपासून क्वारंटाईनमध्ये गेले आहेत. अंतराळात जाण्यापूर्वी क्वारंटाईन हा एक आवश्यक टप्पा आहे. यामध्ये, सर्व अंतराळवीरांना आयसोलेशनमध्ये ठेवले जाते, जेणेकरून ते पूर्णपणे निरोगी राहतील. मोहिमेदरम्यान त्यांना कोणताही संसर्ग होऊ नये यासाठी ही विशेष काळजी घेतली जाते. सुरुवातीला अॅक्सिओम-4 हे अभियान 29 मे रोजी होणार होते पण आता प्रक्षेपण वेळापत्रकात बदल करण्यात आल्याचे नासाने ‘एक्स’वर स्पष्ट केले आहे. अंतराळ स्थानकाच्या उ•ाण वेळापत्रकाचा आढावा घेतल्यानंतर अनेक मोहिमांच्या प्रक्षेपण तारखा बदलण्यात आल्या आहेत.
14 दिवसांचे वास्तव्य
अॅक्सिओम मिशन-4 मध्ये चार देशांतील चार अंतराळवीर 14 दिवसांसाठी अंतराळ स्थानकात जाणार आहेत. या 14 दिवसांच्या मोहिमेदरम्यान अंतराळवीर अनेक प्रयोग करतील. नासा आणि इस्रो यांच्यातील करारानुसार भारतातील ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला यांची या मोहिमेसाठी निवड करण्यात आली आहे. शुभांशू शुक्ला मूळचे उत्तर प्रदेशातील लखनौचे रहिवासी आहेत. त्यांचे सुरुवातीचे शिक्षण लखनौमधील अलीगंज येथील सिटी मॉन्टेसरी स्कूलमधून पूर्ण झाले. बारावीनंतर त्यांनी राष्ट्रीय संरक्षण अकादमीची (एनडीए) प्रवेश परीक्षा उत्तीर्ण केली. त्यानंतर तेथून पदवी प्राप्त केली. एनडीए ही भारतातील सशस्त्र दलांसाठी (सेना, नौदल आणि हवाई दल) ऑफिसर कॅडेट्सना प्रशिक्षण देणारी एक प्रमुख संस्था आहे. प्रशिक्षणाव्यतिरिक्त ते शैक्षणिक पदव्या देखील प्रदान करते.
राकेश शर्मानंतर आता शुभांशू शुक्ला
शुभांशूच्या मोहिमेतील एन्ट्रीसाठी इस्रोने 550 कोटी रुपये दिले आहेत. शुभांशू हे ‘आयएसएस’ला जाणारे पहिले भारतीय असतील. शुभांशू शुक्लांच्या अगोदर तब्बल 41 वर्षांपूर्वी 1984 मध्ये भारतीय अंतराळवीर राकेश शर्मा हे रशियाच्या सोयुझ मोहिमेतून अंतराळात गेले होते. राकेश शर्मा हे भारताचे पहिले अंतराळवीर आहेत.