For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

शुभांशू शुक्ला सुखरुप पृथ्वीवर

06:58 AM Jul 16, 2025 IST | Tarun Bharat Portal
शुभांशू शुक्ला सुखरुप पृथ्वीवर
Advertisement

पंतप्रधान मोदी यांच्याकडून अभिनंदन, भारताला होणार लाभ

Advertisement

वृत्तसंस्था / नवी दिल्ली, वॉशिंग्टन डीसी

भारताचा अंतराळवीर शुभांशू शुक्ला अंतराळ स्थानकातील त्याच्या वास्तव्यानंतर सुखरुपपणे, त्याच्या तीन सहकाऱ्यांसह पृथ्वीवर परतला आहे. त्यामुळे गेले 20 दिवस चाललेल्या या अंतराळ अभियानाची यशस्वी सांगता झाली आहे. त्याच्या या यशामुळे सारा भारत आनंदित झाला असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्याचे आणि त्याच्या सहकाऱ्यांचे अभिनंदन केले आहे. शुभांशू शुक्ला याने 140 कोटी भारतीयांच्या आकांक्षांना नवे बळ दिले आहे, असे भावपूर्ण  उद्गार त्यांनी काढले.

Advertisement

‘अॅक्झियोम-4’ या नावाने हे अभियान ओळखले जात आहे. शुक्ला आणि त्याचे तीन सहकारी यांना अंतराळ स्थानकातून घेऊन येणारे ‘ड्रॅगन’ हे यान भारतीय प्रमाणवेळेनुसार बुधवारी दुपारी 3 वाजून 2 मिनिटांनी अमेरिकेच्या कॅलिफोर्निया प्रांताच्या नजीक सॅन दियागो येथील समुद्रात अवतीर्ण झाले. त्यानंतर या यानातून या सर्व अंतराळवीरांना बाहेर काढण्यात आले आणि नौकेमधून तटावर आणण्यात आले. आता त्यांना काही दिवसांसाठी विलगीकरणात रहावे लागणार आहे. त्यानंतर ते त्यांच्या नित्यकामांना प्रारंभ करणार आहेत.

कुपीचे नाव ‘ग्रेस’

ड्रॅगन नामक यानातून त्याचा हा अंतराळ प्रवास झाला. या यानाच्या ‘ग्रेस’ नामक कुपीत शुभांशू शुक्ला आणि त्याचे सहकारी पेगी व्हिटसन, स्लावोत्झ उझनान्स्की आणि तिबोर कापू यांचे वास्तव्य होते. ही कुपीतूनच त्यांचा परतीचा प्रवास पार पडला. परतीच्या प्रवासाला त्यांना साडेबावीस तास लागले आहेत.

25 जूनला अभियान प्रारंभ

25 जून 2025 या दिवशी अमेरिकेतील फ्लोरिडा येथील प्रक्षेपण तळावरुन शुभांशू शुक्ला आणि त्याच्या सहकाऱ्यांनी त्यांच्या अंतराळ अभियानास प्रारंभ केला होता. त्यांच्या ड्रॅगन या यानाला ‘स्पेसएक्स’ नामक अग्निबाणाच्या साहाय्याने अवकाशात प्रक्षेपित करण्यात आले. त्यानंतर 22 तासांनी, अर्थात 26 जूनला हे यान अमेरिका आणि रशिया या दोन देशांनी संयुक्तरित्या निर्मिलेल्या अंतराळ स्थानकाला जोडले गेले. 26 जून ते 13 जुलै असे 18 दिवस या अंतराळवीरांचे वास्तव्य अंतराळ स्थानकात होते. काल मंगळवारी त्यांनी या अंतराळ स्थानकातून पुन्हा यानात प्रवेश केला आणि त्यांच्या परतीच्या प्रवासास प्रारंभ झाला.

अभियानात भारताची गुंतवणूक

या अंतराळ अभियानात भारतानेही आपली 550 कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती. भारताची जगप्रसिद्ध अवकाश संशोधन संस्था इस्रोच्या माध्यमातून ही गुंतवणूक करण्यात आली होती. भारताचा अंतराळवीर शुभांशू शुक्ला हा या अभियानाचा प्रमुख कप्तान होता. त्यामुळे त्याचे विशेष उत्तरदायित्व होते. ते त्याने उत्तमरित्या निभावल्याने भारतीय अंतराळात वास्तव्य करण्यास सक्षम आहेत, ही बाब जगासमोर पुन्हा एकदा सिद्ध झाली आहे. शुभांशू शुक्ला हा अंतराळ प्रवास करणारा द्वितीय, तर अंतराळ स्थानकात वास्तव्य करणारा प्रथम भारतीय अंतराळवीर ठरला आहे. त्याच्या या देदिप्यमान यशामुळे भारताची मान अधिकच उंचावली आहे. आता त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षावर केला जात आहे.

पंतप्रधान मोदी यांचा भावपूर्ण संदेश

अभियान यशस्वी करुन शुभांशू शुक्ला याच्या यशामुळे आनंदित झालेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचा भावपूर्ण संदेश ‘एक्स’वर प्रसारित केला आहे. गटनेता शुभांशू शुक्ला याचे स्वागत करण्यात साऱ्या देशासमवेत मीही सहभागी आहे. अंतराळ स्थानकात वास्तव्य करणारा भारताचा प्रथम अंतराळवीर या नात्याने त्याने अब्जावधी नागरीकांच्या स्वप्नांना प्रेरणा दिली आहे. त्याचे साहस, निष्ठा आणि चैतन्य अभिमानास्पद आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली आहे.

सारे काही पूर्वनिर्धारित कार्यक्रमानुसार...

भारताची अवकाश संशोधन संस्था इस्रोच्या वतीने अंतराळवीर आणि या अभियानाचा गटप्रमुख शुभांशू शुक्ला याचे मन:पूर्वक अभिनंदन करण्यात आले. इस्रोने त्याच्यावर जे उत्तरदायित्व सोपविले होते, ते त्याने पूर्वनिर्धारित कार्यक्रमानुसार परिपूर्णरित्या पार पाडले आहे, अशी भलावण संस्थेकडून करण्यात आली. या अंतराळ स्थानक वास्तव्यात त्याने जे प्रयोग केले आणि जे अनुभव घेतले त्यांचे इस्रोला तिच्या भविष्यकालीन अंतराळ अभियानात मोलाचे योगदान राहणार आहे. आणखी दोन वर्षांनी इस्रो स्वबळावर मानव अंतराळात नेण्याचे अभियान हाती घेणार आहे. त्यामुळे त्याचे अभियान यशस्वी होणे, ही इस्रोसाठी अत्यंत अभिमानास्पद आणि उत्साहवर्धक घटना आहे, अशी प्रतिक्रिया संस्थेच्या वतीने देण्यात आली आहे. स्वत: शुक्ला इस्रोच्या या अभियानात सहभागी होणार आहे.

कसा परतला शुभांशू शुक्ला...

ड सोमवार दुपारी 4 : या भारतीय प्रमाणवेळेनुसार ड्रॅगन हे यान अंतराळ स्थानकाला जोडले गेले. शुक्ला याने सहकाऱ्यांसमवेत यानाच्या कुपीत प्रवेश केला.

ड सोमवार दुपारी 4.30 : यान अंतराळ स्थानकापासून विभक्त झाले. त्याच्या पृथ्वीच्या दिशेने प्रवासाला प्रारंभ झाला. ताशी 50 हजार किलोमीटर वेग गाठला.

ड सोमवार रात्री 12 : यानाते पृथ्वीभोवती भ्रमण करत पृथ्वीच्या कक्षेत प्रवेश केला. त्यानंतर अवतरण होण्याच्या महत्वाच्या आणि अवघड टप्प्याचा प्रारंभ झाला.

ड मंगळवार दुपारी 2.45 : 27,000 किलोमीटर प्रती तास या वेगाने यानाचा पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश. घर्षणाने बाह्या कवचाचे तापमान 2,500 डिग्रीपर्यंत.

ड मंगळवार दुपारी 3.02 : वातावरण प्रवेशाचा निर्णायक टप्पा पूर्ण करुन यान कॅलिफोर्निया नजीकच्या समुद्रात अवतीर्ण झाले. अंतराळवीरांना बाहेर काढले गेले.

भारताला या अभियानाचा लाभ

ड 2027 मध्ये भारत स्वत:चे ‘गगनयान’ हे मानवसहित अंतराळ अभियान हाती घेणार आहे. त्यामुळे शुक्ला याच्या अनुभवाचा भारताला लाभ होणार आहे.

ड भारताच्या ‘गगनयान’ अभियानात शुभांशू शुक्लाचाही सहभाग असेल. तो या गगनयान अभियानाच्या माध्यमातून पुन्हा एकदा अंतराळ प्रवास करणार आहे.

ड अॅक्झियोम-4 अभियानात भारतीयाच्या सहभागामुळे भारताच्या अंतराळ क्षमतेविषयी विश्वास निर्माण झाला आहे. हा भारतासाठी भावनिक लाभ आहे.

अंतराळ स्थानकात शुक्लाने काय केले...

ड शुभांशू शुक्लावर अंतराळ स्थानकातील वास्तव्याच्या काळात एकंदर सात प्रयोग करण्याचे उत्तरदायित्व सोपविण्यात आले होते. ते त्याने पूर्णत: पार पाडले.

ड हे सात प्रयोग ‘अत्यल्पगुरुत्वाकर्षण प्रयोग’ (मायक्रोग्रॅव्हिटी एक्स्परिमेंटस्) म्हणून ओळखले गेले. कारण अंतराळात गुरुत्वाकर्षण जवळपास शून्य असते.

ड अंतराळात भारतीय कडधान्ये मेथी आणि मूग यांची उगवण करण्याचा प्रयोग महत्वाचा होता. शुक्ला याने 18 दिवसांमध्ये हा प्रयोग यशस्वी केला आहे.

ड त्याने सूक्ष्म अष्टपाद जीव, (टार्डिग्रेडस्), तसेच मोयोजिनेसिस, सायनोजीवाणू, सूक्ष्मशेवाळ यांची अंतराळात वाढ कशी होते, यावरचे प्रयोगही त्याने केले.

ड व्हॉयेजल डिस्प्लेचा प्रयोगही त्याने अंतराळात यशस्वी होतो हे सिद्ध केले. सूक्ष्म जीवांवर अत्यल्पगुरुत्वाकर्षणीय स्थितीला काय परिणाम होतो, हे पाहिले.

ड मानवी किंवा सजीवांच्या स्नायूंची अंतराळात झीज किती प्रमाणात आणि कशी होते, याचे निरीक्षण करुन निष्कर्ष नोंदविण्याचा महत्वाचा प्रयोग केला.

ड सूक्ष्मशेवाळ आणि इतर सूक्ष्म उपयोगी जीवाणूंपासून अंतराळात प्राणवायू, अन्न आणि ऊर्जा कशी प्राप्त करता येईल, यावर त्याने यशस्वी प्रयोग केले.

ड अत्यल्पगुरुत्वाकर्षणीय स्थितीत सूक्ष्म मानवोपयोगी जीवाणूंची वाढ कशी होते. त्यांच्या क्षमतेवर या स्थितीचा कसा परिणाम होतो, याचे निरीक्षणही त्याने केले.

ड सूक्ष्मदर्शक यंत्रांच्या साहाय्याने त्याने अत्यल्पगुरुत्वाकर्षणीय स्थितीत स्नायू निर्माण करणाऱ्या पेशींची वाढ कशी होते, यासंबंधी महत्वाचे प्रयोग केले आहेत.

Advertisement
Tags :

.