MP राऊतांविषयी सवाल, MP Shrikant Shinde यांनी स्पष्टच केलं, कोण Sanjay Raut?
कोल्हापूरसाठी महायुती सरकारने आतापर्यंत 3200 कोटी रुपये मंजूर केले
कोल्हापूर : पायाला भिंगरी बांधून विकासकामे करणारा मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेंकडे पाहिले जाते. विधानसभेत शिवसेनेचे 70 पैकी 60 आमदार जनतेने निवडून दिलेत. आता कार्यकर्त्यांनाही जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपालिकेत येण्यासाठी प्रयत्न करा, असे आवाहन खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केले.
नागाळा पार्क, खानविलकर चौक, कोल्हापूर येथील शिवसेना संपर्क कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण तथा पालकमंत्री प्रकाश आबिटकर, आमदार राजेश क्षीरसागर, खासदार धैर्यशील माने, माजी खासदार संजय मंडलिक, आमदार चंद्रदीप नरके, आमदार अशोकराव माने, माजी आमदार डॉ. सुजित मिणचेकर, माजी आमदार जयश्रीताई जाधव आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी खा. डॉ. शिंदे यांनी केलेल्या विकासकामावर चित्रफित दाखवण्यात आली.
डॉ. शिंदे म्हणाले, कोल्हापूरसाठी महायुती सरकारने आतापर्यंत 3200 कोटी रुपये मंजूर केले. रस्ते, राजर्षी शाहू समाधी स्थळ, आयटी पार्क अशी विविध विकासकामे करायची आहेत. त्यासाठी येणाऱ्या निवडणुकीत महायुतीचे उमेदवार निवडूण द्या.
कोल्हापुरात महायुतीमध्ये शिवसेना सर्वात मोठा पक्ष : आबिटकर
कोल्हापुरात महायुतीमध्ये शिवसेना हाच सर्वात मोठा पक्ष असल्याचे पालकमंत्री आबिटकर यांनी ठणकावून सांगितले. ते म्हणाले, पाच वर्षांपूर्वी सहा आमदार, दोन खासदार होते. नंतर मी कसाबसा निवडूण आलो. त्यावेळी चंद्रदीप नरके, राजेश क्षीरसागर, सुजित मिणचेकर यांची बिकट अवस्था होती.
एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर सर्वात मोठा पक्ष म्हणून शिवसेना समोर आला. पाच आमदार, एक खासदार, माजी खासदार, माजी आमदारही शिवसेनेचे आहेत. पालकमंत्रीही शिवसेनेचाच आहेत. शिवसेनेच्या संपर्क कार्यालयात लोकप्रतिनिधींनी उपस्थित राहून लोकांचे प्रश्न सोडवावेत, असे आबीटकर यांनी सांगितले.
खासदार माने म्हणाले, आपल्याला कार्यकर्त्यांनी निवडूण दिले. आता आपली जबाबदारी आहे स्थानिक स्वराज्य संस्था निवडुणुकीत त्यांना निवडूण देण्याची. क्षीरसागर म्हणाले, महानगरपालिका, जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत सवार्धिक सदस्य निवडूण आणत महापौर व जिल्हा परिषदेचा अध्यक्ष आपला असावा, यासाठी कार्यकर्त्यांनी प्रयत्न करावेत.
मंडलिक म्हणाले, या कार्यालयाचा फायदा घेत कार्यकर्त्यांच्या समस्या सोडवून आगामी निवडणुकीत हातात हात देत विजय संपादन करू. नरके म्हणाले, जिह्यात सर्वाधिक मतदार आपल्याकडे आहेत. त्यामुळे येणाऱ्या सर्व निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार असतील यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे.
यावेळी जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण, रवींद्र माने, जैन अल्पसंख्याक महामंडळाचे अध्यक्ष ललित गांधी, शिवसेना समन्वयक सत्यजित कदम, शारगंधर देशमुख, युवा सेनेचे ऋतूराज क्षीरसागर, शिवसेना प्रणित शेतकरी संघटनेचे प्रा. जालंदर पाटील, आदी मान्यवर उपस्थित होते.
लोकसभेत खा. माने यांच्यासाठी शेवटचे दोन दिवस काय केले?
खासदार माने यांच्या प्रचारासाठी आम्ही आणि एकनाथ शिंदे यांनी काय केले, हे सर्वांना माहिती आहे. हे सर्वांच्यासमोर सांगता येत नाही. मात्र, कार्यकर्त्यांच्यासाठी नेता काय असू शकतो, हे दाखवून देण्याचे काम या निवडणुकीत झाले, असे सांगत खा. डॉ. शिंदे यांनी लोकसभा निवडणुकीची आठवण करून दिली.
एकजण जखमी
मंडपातील एक खांब पडल्याने शिवसेना कार्यकर्ता जखमी झाला. डोक्याला दुखापत झाल्याने त्यांना तातडीने रुग्णालयामध्ये नेले.
11 चा कार्यक्रम दीडला सुरु
खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या दौऱ्यात विविध कार्यक्रम होते. यामुळे शिवसेना संपर्क कार्यालयासमोर असणाऱ्या सभेसाठी शिवसैनिक तब्बल साडेतीन तास वाट बघत ताटकळत बसले होते. 11 वाजता कार्यक्रमाची वेळ होती. दुपारी दीड वाजता सुरू झाला.
कोण संजय राऊत
शिवसेना उबाठाचे खासदार संजय राऊत यांनी 800 कोटी रुग्णवाहिका घोटाळा असा प्रश्न विचारल्यावर खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी कोण संजय राऊत असा उलट सवाल केला. संजय राऊत यांनी पुराव्याशिवाय काही प्रश्न उपस्थित केल्यावर त्यांच्या प्रश्नांचे उत्तर देण्यास आपण बांधील नसल्याचेही शिंदे यांनी सांगितले.
इच्छुक उमेदवारांसह कार्यकर्त्यांचीही गर्दी
शिवसेना कार्यालयाच्या शुभारंभाप्रसंगी जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपालिका निवडणुकीसाठी इच्छुकांसह कार्यकर्ते मेळाव्यात आले होते. सभामंडपात पाऊस सुऊ असतानाही कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती.